मिश्रा पिता-पुत्रावर कडक कारवाई करा

0
70

>> दिनेश गुंडू राव यांची मागणी; पणजीत कॉंग्रेसचे मौनव्रत आंदोलन

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे आंदोलक शेतकर्‍यांच्या कारणीभूत ठरलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा पुत्र आशिष मिश्रा याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी काल केली.
पणजी येथील आझाद मैदानावर गोवा कॉंग्रेसच्या वतीने मौनव्रत आंदोलन करून लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या विरोधातील नवे तीन कृषी कायदे मंजूर केले आहेत, ते मागे घ्यावेत यासाठी शेतकरी अहिंसक मार्गाने आंदोलन करत आहेत. मात्र त्या आंदोलक शेतकर्‍यांवर गाड्यांचा ताफा चालवून केंद्रीय मंत्र्यांच्या पुत्राने ८ शेतकर्‍यांचा बळी घेतला, असे राव म्हणाले.

यावेळी कॉंग्रेसचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम, प्रवक्त्या शमा मोहम्मद, खासदार फ्रान्सिस सार्दिन, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आलेक्स सिक्वेरा, रुडॉल्फ फर्नांडिस, बीना नाईक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, मौनव्रत आंदोलन असल्याने चिदंबरम यांनी कोणतेही भाष्य करणे टाळले.