राज्यात वीज टंचाई भासू देणार नाही

0
37

>> वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी गोमंतकीयांना केले आश्‍वस्त; प्रसंगी केंद्राशी चर्चा करणार

परराज्यांकडून गोव्याला होणार्‍या वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. राज्य सरकार गोव्यात विजेचा तुटवडा निर्माण होऊ देणार नाही. त्यामुळे गोमंतकीयांनी चिंता करू नये, असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल स्पष्ट केले. देशातील अनेक वीज निर्मिती केंद्रामध्ये सध्या कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नवी दिल्लीसह काही राज्यांवर विजेचे संकट ओढवलेले आहे, त्या पार्श्‍वभूमीवर काब्राल बोलत होते.

गोव्यात सध्या वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र भविष्यात वीज टंचाईची परिस्थिती निर्माण झालीच, तर राज्य सरकार केंद्र सरकारशी चर्चा करून तोडगा काढेल. गोवा जरी विजेसाठी परराज्यांवर अवलंबून असला, तरी ती राज्ये गोव्याचा वीजपुरवठा परस्पर बंद करू शकत नसल्याचेही काब्राल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्याला एकूण ६५० मेगावॅट एवढी वीज लागते. त्यापैकी ३९१.९५ मेगावॅट वीज पश्‍चिम ग्रीडमधून येते, तर ९९.९६ मेगावॅट एवढी वीज दक्षिण ग्रीडमधून मिळते. छत्तीसगढ व तेलंगणा येथील वीजनिर्मिती प्रकल्पांतूनही गोव्याला वीजपुरवठा होत असतो.

कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज टंचाईच्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे. जर राज्यात वीज टंचाई होऊ शकते असे आम्हाला दिसून आले, तर आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करून तोडगा काढू, असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.

वीज संकटाच्या पार्श्‍वभूमीवर अमित शहांनी घेतली बैठक

कोळशाची टंचाई आणि वीज संकटाबाबत राज्यांनी केंद्राकडे तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला ऊर्जामंत्री आर. के. सिंह, कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी आणि एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत अमित शहा यांनी देशातील वीजपुरवठा स्थितीचा आढावा घेतला. ही बैठक एक तास चालली. वीजनिर्मिती प्रकल्पांकडील कोळशाची उपलब्धता आणि विजेची वाढती मागणी यावर या बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, देशात कोळशावर चालणारी एकूण १३५ वीज निर्मिती केंद्रे असून, त्यापैकी २८ केंद्रांवर १ दिवस पुरेल इतका, तर १०७ केंद्रांवर ४ दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याने विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. तसेच कोळशाच्या खाणींमध्ये मुसळधार पावसामुळे कोळसा उत्पादन आणि वाहतुकीवर होणारा प्रतिकूल परिणाम, आयात कोळशाच्या किमतीत प्रचंड वाढ या कारणांमुळे कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे.