मिकी, आवेर्तान मंत्रीपदी निश्‍चित; उद्या विस्तार

0
73

राज्य मंत्रिमंडळाचा आज होऊ घातलेला विस्तार व खातेवाटप राज्यपाल मृदूला सिन्हा या गोव्याबाहेर असल्याने आज शुक्रवारी होऊ शकणार नसल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल संध्याकाळी पर्वरी येथे भाजप विधीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेवाटप उद्या शनिवारी होण्याची शक्यता पार्सेकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, मंत्रिमंडळात समावेशासाठी पूर्वी मंत्री राहिलेले आवेर्तान फुर्तादो, मिकी पाशेको यांची नावे निश्‍चित झाली आहेत. मंत्र्यांची जी दोन पदे रिक्त आहेत त्या जागी मनोहर पर्रीकर मंत्रिमंडळातील मच्छीमारी मंत्री आवेर्तान फुर्तादो व गोवा विकास पक्षाचे आमदार मिकी पाशेको यांची वर्णी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवेर्तान फुर्तादो व मिकी पाशेको यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर मंत्रिमंडळात अल्प संख्याकांचे प्रतिनिधीत्व ३० टक्के एवढे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फ्रान्सिस डिसोझा व एलिना साल्ढाणा हे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधीत्व करणारे मंत्रिमंडळातील आणखी दोन मंत्री आहेत.
गोव्याच्या राज्यपाल मृदूला सिन्हा या बिहारला गेलेल्या असून त्यांना तातडीने येण्याची सूचना करण्यात आलेली आहे. मात्र, त्या संध्याकाळी उशिरा गोव्यात पोचणार असून त्यामुळे शुक्रवारी मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेवाटप होणे शक्य नसल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. विस्तार व खातेवाटप व्हावा यासाठी प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप आमदार प्रमोद सावंत यांनी आपला मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी गेले दोन – तीन दिवस जोरदार प्रयत्न चालवले होते. दुसर्‍या बाजूने मिकी पाशेको यांचे नाव जवळ जवळ निश्‍चित झाले होते. त्यामुळे आवेर्तान फुर्तादो यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, काल शेवटी आवेर्तान फुर्तादो व मिकी पाशेको यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. माजी पर्यटनमंत्री असलेल्या मिकी पाशेको यांना कोणते खाते दिले जाते याकडे सर्वांचे आता लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे बुधवारी संध्याकाळी गोव्यात आल्यानंतर काल गुरुवारी दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला होता. काल सकाळी मनोहर पर्रीकर, नवनिर्वाचित मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा व दयानंद मांद्रेकर यांची मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी महत्वाची बैठक झाली. तद्नंतर संध्याकाळी पर्वरी येथे सचिवालयात भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. ही बैठक सुमारे साडेतीन तास चालली. तद्नंतर पत्रकारांशी बोलताना पार्सेकर यांनी आज शुक्रवारी विस्तार व खातेवाटप होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, मंत्र्यांच्या खात्यात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत काय असे विचारले असता ते लवकरच कळणार आहे चिंता कशाला करता असा प्रति प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी केला.
‘गृह’ नको; ‘अर्थ’ मिळाल्यास आनंद
उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना काल त्यांना कोणत्या महत्वाच्या खात्याची अपेक्षा आहे, असे विचारले असता ते म्हणाले की आपणाला गृह खात्यात रस नाही, मात्र, अर्थ खाते मिळाल्यास आपणास आनंद होईल, असे ते म्हणाले. डिसोझा यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते नाराज असल्याने त्यांना एखादे महत्वाचे खाते दिले जाणार असल्याची सध्या चर्चा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यानी वरील उत्तर दिले.