पुन्हा द्विशतक :  रोहितने रचला इतिहास

0
96

भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांत दोन द्विशतके लगावणारा फलंदाज म्हणून काल इडन गार्डन मैदानात इतिहास रचला. शिवाय एका सामन्यात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाजही तो ठरला आहे. कालच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शैलीदार खेळ करत त्याने २४६ धावा काढल्या. २७ वर्षीय रोहितने गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात २०९ धावा करत आपले पहिले एकदिवसीय द्विशतक नोंदवले होते. काल त्याने भारतीय संघाच्याच विरेंद्र सेहवाग याने केलेला २१९ धावांचा विक्रम मोडला. सेहवागने २०११ साली वेस्ट इंडिजविरुद्ध हा विक्रम नोंदवला होता.
रोहित शर्माचे विक्रमी द्विशतक
भारताची श्रीलंकेवर १५३ धावांनी मात
दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर सलामीवीर रोहित शर्माने केलेल्या विस्फोटक आणि विश्वविक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर चौथ्या वन-डे सामन्यात १५३ धावांनी पराभव करीत मालिकेत ४-० अशी निर्भेळ आघाडी मिळविली आहे. रोहितची विश्वविक्रमी खेळी ही या सामन्याचे वैशिष्ठ्य ठरले. आता भारताचे लक्ष्य असेल ते श्रीलंकेला ५-० अशा क्लीन स्वीपचे.
भारताकडून मिळालेले ४०५ धावांचे विजयी लक्ष्य श्रीलंकन फलंदाजांना पेलवले नाही आणि लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा डाव ४३.१ षट्‌कांत २५१ धावांत संपुष्टात आले. कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (७५) आणि लाहिरू थिरिमाने (५९) यांनी अर्धशतके नोंदवित संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. तिलकरत्ने दिल्शान (३४) व थिसारा परेरा (२९) हे दोघे फलंदाज सोडल्यास इतर सर्व फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांना जेमतेम अडीजशेपर्यंत मजल मारता आली. भारतातर्फे धवल कुलकर्णी सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३४ धावांत ४ गडी बाद केले. तर त्याला चांगली साथ देताना उमेश यादव, अक्षर पटेल आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
तत्पूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरविताना रोहित शर्माने केलेल्या विस्फोटक आणि विक्रमी द्विशतकाच्या जोरावर ५ गड्यांच्या मोबदल्यात ४०४ अशी विशाल धावसंख्या उभी केली. अजिंक्य रहाणे (२८) आणि अंबाती रायडू (८) हे झटपट तंबूत परतल्यानंतर सलामीवीर रोहित शर्माने विस्फोटक द्विशतकी खेळी करीत कर्णधार विराट कोहलीच्या साथीत (६६) तिसर्‍या विकेटसाठी २०२ धावांची भागिदारी करीत भारताला विशाल धावसंख्या उभारून दिली. नुवान कुलसेकराच्या डावातील शेवटच्या चेंडूवर बाद झालेल्या रोहितने श्रीलंकन गोलंदाजीची पिसे कापून काढताना १७३ चेंडूत ३३ चौकार आणि ९ षट्‌कारांची आतषबाजी करीत २६४ धावांची विक्रमी द्विशतकी खेळी केली. वन-डे क्रिकेटमधील त्याचे हे दुसरे द्विशतक ठरले. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट विश्वातील पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी रोहित शर्मा याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले द्विशतक ठोकले होते.
याचबरोबर, या अविस्मरणीय खेळीमुळे रोहितने वन-डे सामन्यांच्या इतिहासामध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडीत काढला. याआधी, माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने २१९ धावांचा उच्चांक केला होता. आजपर्यंत वन-डे क्रिकेटच्या इतिहासात चारच द्विशतकांची नोंद झाली आहे आणि विशेष म्हणजे ही चारही द्विशतके भारतीय फलंदाजांच्या नावे नोंद आहेत. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांनी द्विशतकी पल्ला गाठला होता. रोहितला आणखी एक विक्रम प्रस्थापित करण्याची संधी होती. परंतु त्या विक्रमाने त्याला थोडक्यात हुलकावणी दिली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात वैयक्तिक सर्वाधिक २६८ धावांच्या विक्रमाची नोंद इंग्लंडमधील ङ्गलंदाज अली ब्राऊन याच्या नावावर आहे. रोहितला हा विक्रम मोडित काढण्यासाठी केवळ ४ धावा कमी पडल्या.