मास्क, मुखवटे वगैरे वगैरे….

0
28
  • – मीना समुद्र

आजकालच्या काळात मास्क हे वैयक्तिक आणि सामूहिक, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वापरणे अतिशय गरजेचे आहे. या एका छोट्या कृतीने आपण स्वतःचे आणि इतरांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करू शकतो, आपला ‘खारीचा वाटा’ उचलू शकतो.

‘नाक दाबलं की तोंड उघडतं’ अशी एक म्हण किंवा वाक्प्रचार आपण नेहमी वापरतो. नाक दाबलं की श्‍वासच कोंडल्याने तोंड आपोआप उघडून श्‍वास घ्यावाच लागतो. वर्मावरच बोट ठेवलं की आपोआप खरं काय ते बाहेर येतं, असा त्याचा अर्थ. तसे तर नाक आणि तोंड हे दोन्ही जगण्यासाठी महत्त्वाचेच अवयव. नाकावाटे श्‍वास छातीत भरून घेऊन माणूस जिवंत राहतो आणि उदरभरणासाठी त्याला तोंडावरच अवलंबून राहावं लागतं. या दोन्हीमुळेच त्याचे जीव, जीवमान आणि आरोग्य टिकविले जाते. पण कोरोनाच्या या काळात या दोन्ही अवयवांची मुस्कटदाबीच झालेली आहे, आणि तीही उरल्यासुरल्या कापडाच्या तुकड्यामुळे- ज्याला आपण मुखावरण किंवा मुखपट्टी असे शुद्ध मराठी भाषेत म्हणतो. पण ते फक्त मुखाचे आवरण नसून नाकाचेही असणे अत्यंत जरूरीचे आहे. कारण कोरोनाचे सूक्ष्म संसर्गकारक विषाणू हवेतून नाकावाटे शरीरात प्रवेश मिळवून त्याला जायबंदी करतात; कधी जीवनच संपुष्टात आणतात. त्यामुळे हे मुखावरण ही काळाची गरज होऊन बसली आहे. ती काळाची मागणीही आहे; स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी. फक्त आपल्या देशातल्याच प्रत्येकाची नाही तर जगातल्या प्रत्येकाचीच ती एक जबाबदारी आहे, एक कर्तव्य आहे.

हा अगदी साधा, सोपा, सोयीचा, सुरक्षित, खबरदारीचा उपाय आहे हे सिद्ध झाले आहे; होते आहे. ते एक प्रकारचे बंधन जरूर आहे. नाकातोंडावर पट्टी किंवा सोयीस्कर आकाराचे कापड, आणि कानावर, डोक्यामागे ते ठेवण्यासाठी किंवा बांधण्यासाठी केलेली सोय आपल्याला व्यक्ती ओळखायला, खाता-पिताना आणि श्‍वास घेतानाही अडथळ्याची वाटते. मोकळा, खुला श्‍वास घेता न आल्याने गुदमरायलाही होते. अतिशय जाचक वाटते. पण तरीही घरात नाही तर गर्दीत ते अनिवार्य आहे हेही तितकेच खरे! त्यामुळे ‘मास्क इज मस्ट’ अशा भूमिकेतच आपण वावरायला हवे!
खरे तर ‘मास्क’ म्हणजे चेहर्‍यावरील अवगुंठन किंवा बुरखा असा अर्थ इंग्लिश-मराठी डिक्शनरीत सापडतो. हे अवगुंठन म्हणजे संपूर्ण चेहरा झाकणे किंवा बुरख्याआड लपवणे. येथे त्या अर्थाने न वापरता ‘मास्क’ हा मुखपट्टी, मुखावरण (नाकासकट) याच अर्थाने प्रचलित झाला आहे. पूर्वी ही नाटकवाल्यांची मिरासदारी होती. नर्सेस, डॉक्टर्स (विशेषतः रोगी तपासताना किंवा ऑपरेशनच्या वेळेला तर नक्कीच), तसेच शेतात काम करताना थंडीवार्‍यासाठी पंचा, टॉवेल, मफलरचा उपयोग केला जातो तो नाक-कान-तोंडावरून घेऊन सुरक्षेसाठी. ‘मास्क’चा अर्थ मुखवटा असा घेतला तर नाटक-सिनेमांत राक्षस, भूत, पिशाच्च, हडळ अशा जातकुळीची पात्रे दाखवण्यासाठी त्याचा उपयोग करीत.

आजकालचे जगच मुखवट्यांचे झाले आहे असे आपण म्हणतो ते फक्त ‘दिखावा करणे’ या अर्थी. निवडणुका जवळ आल्या की कधी राजकारणी, समाजकारणीही मुखवटे धारण करून सोज्वळता, सेवापरायणता, विनम्रपणाचे मुखवटे चढवतात आणि दिमाखाने वावरतात. हाती सत्ता आणि बुडाखाली खुर्ची आली की बर्‍याच जणांची मत्ता (बुद्धी, मती) बिघडते आणि ‘लबाड लांडगं ढ्वॉंग करतंय’ हे जनतेच्या उशिरा ध्यानात येतं. मुखवटा धारण न करता सच्चेपणाने काम करणारा मात्र जनतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान होतो. मुखवट्याची अन् बिनमुखवट्याची माणसे ओळखता यायला हवीत, मुखवटे टराटर फाडता यायला हवेत तरच माणूस सत्याच्या भूमीवर ठामपणे उभा राहून सुख-समाधान भोगू शकतो.

खाणी, धूळधुरळा, कोळशात काम करणार्‍या माणसांना मात्र ‘मास्क’ आवश्यकच. हृदयाशी, फुफ्फुसाशी, श्‍वासाशी संबंधित रोग होऊ नयेत म्हणून ही काळजी घेणे आवश्यकच. आजकाल कामाच्या जागी, घराबाहेरच्या संपर्कक्षेत्रात, गर्दीच्या जागी कोणत्याही व्यक्तीला मास्क बंधनकारकच आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडावेच लागते. परंतु आवश्यक कामासाठी आणि वातावरण थोडे निवळत असतानाही ‘मास्क’ अनिवार्य आहे. हॅल्टमेट स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक; पण आजकालच्या काळात मास्क हे वैयक्तिक आणि सामूहिक, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वापरणे अतिशय गरजेचे आहे. या एका छोट्या कृतीने आपण स्वतःचे आणि इतरांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करू शकतो, आपला ‘खारीचा वाटा’ उचलू शकतो. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे टाळू शकतो. आजकाल ‘मास्क’च्या बाबतीत बरीच सजगता दिसतेही. अगदी ‘इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले’च्या चालीवर ‘इकडे मास्क तिकडे मास्क, जिकडे तिकडे मास्कच मास्क’ अशी स्थितीही दिसते. तर कुठे कुठे ‘हॅ! काही नाही होत मास्क नाही लावला तर… जीव नुसता हैराण होतो’ असाही सूर ऐकू येतो आणि वागण्यातूनही तो दिसतो. पण हे सारे आवश्यक काळापर्यंत आपण करत राहिलो तर कायम करत राहण्याची गरज भासणार नाही. मास्क वापरून कुठेही टाकून कचर्‍याची भर करू नये.

मास्क, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग हे परभाषेतले शब्द आता सुशिक्षितांपासून अशिक्षित-अडाण्यांच्या तोंडीही चांगलेच रुळलेले आहेत. ऍमॅझॉन, फ्लिपकार्टसारख्या मोठमोठ्या कंपन्याही मास्क विक्री करत आहेत, आणि घरगुती शिलाईही होत आहे. योग्य आहार, खानपानाबरोबर या गोष्टी पाळल्या तर रोगबाधेची शक्यता कमी होते हेही लोकांच्या पचनी पडले आहे. लॉकडाऊनच्या काळातच नव्हे तर इतर काळातही लाटेवर लाट येत असतानाही ही आचारसंहिता पाळायला हवी याची जाणीवही होते आहे. एखादा दुकानदार, भाजीविक्रेता अथवा इतर कोणताही माणूस स्वतः मास्क घालून इतरांनी न घातल्यास विचारण्याचा हक्क बजावतो तेव्हा जनजागृती लक्षात येते. ‘मास्क’ घाईगडबडीत विसरण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे खिसा, पर्सेस, गाडी, पिशव्या अशा ठिकाणी विशेष सोयीसाठी ते ठेवले जातात. कधी रुमालही वापरला जातो. शिवाय घराबाहेर पाऊल पडलं की कोपर्‍याकोपर्‍यांवर ते मिळण्याची सोयही विक्रेत्यांनी केली आहे. अगदी सुरुवातीला मास्कचा पांढरा रंगच बरा वाटे; पण व्यावसायिक दृष्टीने त्यावरही मात करून निरनिराळ्या रंगाचे ‘मास्क’ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर घड्यांचे, चोचीचे, फक्त पट्टीवाले, जाळीदार, ‘यूज ऍॅण्ड थ्रो’वाले असे अनेक प्रकार उदयाला आले. बेकार हातांना काम मिळाले. हवा खेळती ठेवणारे, स्वच्छ धुवून परत वापरता येण्यासारखे हे मास्क खरेतर सुखद; पण ज्याची-त्याची आवड, मर्जी आणि वापरण्याची क्षमताही!

पट्‌ट्यांचे प्रकार तरी किती! मुलींच्या वेणीला लावतो ती रिबिन म्हणजे पट्टीच. ‘आंधळी कोशिंबीर’ खेळताना डोळ्यांवर पट्टी बांधली जाते. गांधारीने पतिनिष्ठेसाठी डोळ्यांवर जन्मभर पट्टी बांधली. हातापायाला खरचटले तर आपण औषध लावून पट्टी बांधतो, मलमपट्टी करतो. कपाळ, डोके ठणकत असेल, पाय दुखत-वळत असतील तर लांब पट्टी बांधतो. शिवण शिवताना गळ्याला त्या-त्या आकाराची ‘गळपट्टी’ लावली जाते. जैन साधू नेहमी पांढरी मुखपट्टी बांधतात. तशीच ‘मास्क’ ही पण एक मुखपट्टी. ओळखलंच नाही परिचितांनी तर थोडीशी बाजूला करून परिचय द्यावा. श्‍वास गुदमरला तर त्याला मोकळ्या जागी थोडी वाट करून द्यावी. मंदिरात तीर्थप्रसाद हातावर ठेवला तर ती हळूच बाजूला करून ते तोंडात टाकावे. शेजारीपाजारी, सोसायटीच्या जिन्यातून जाताना ती घालावी, कारण तिथे बर्‍याच जणांची ये-जा चालते. संक्रांतीची लूट म्हणूनही ती द्यावी-घ्यावी. माणूस नावाच्या अजब प्राण्याने ‘मास्क’ सकारात्मकतेने घेतला आणि लग्नकार्यात शालू-पैठणीच्या कापडाचे मॅचिंग मास्क, वेगवेगळ्या रंगाचे आणि डिझाइनचे तयार झाले. माणसाशी त्यांची दोस्तीच झाली.