Home Featured मारिओंचा गोवा कुठे हरवला?

मारिओंचा गोवा कुठे हरवला?

0

गोमंतकाचे श्रेष्ठ व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांची आज जन्मशताब्दी, परंतु त्यांचे चाहते सोडल्यास बाकी कोणाला त्याचे काही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही हे दुर्दैव आहे. मारिओ आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांनी गोव्याच्या शांत, सुशेगाद, सुखवस्तू जीवनशैलीचे आपल्या विशिष्ट रेखाटनशैलीतून केलेले चित्रण मात्र अजरामर झाले आहे. खरे तर मारिओ जन्माने गोवेकर नव्हेत. त्यांचा जन्म दमणचा, कारण त्यांची आई दमणची. वडील गोव्यातील खानदानी भाटकार. घरी पोर्तुगीज बोलली जाई. लोटलीच्या भव्य खानदानी घरात वाढलेला हा मुलगा आयएएस होण्यासाठी म्हणून मुंबईत गेला. मात्र, सनदी अधिकारी होण्याचा हव्यास न बाळगता व्यंगचित्रांच्या दुनियेत रमला. लहानपणी घरी भिंतीवर चित्रे काढणाऱ्या मारिओला आईने डायरीत चित्रे काढायला लावले होते. डायऱ्यांत रेखाचित्रे काढण्याचा हा छंद त्याला जडला तो कायमचा. ‘करंट’ कार्यालयात ह्याच डायऱ्या घेऊन तो संपादक दोस्यू कराकांच्या समोर जाऊन उभा राहिला, तेव्हा ही रेखाचित्रे पाहून त्यांनी त्याला व्यंगचित्रे काढायची संधी दिली. त्यातून एका श्रेष्ठ व्यंगचित्रकाराचा उदय झाला. मारिओंच्या रेखाचित्रांनी एक काळ गाजवला. व्यंगचित्रांबरोबरच महानगरी मुंबईतील कोलाहलाची संस्मरणीय रेखाटने मारिओंनी केली. तिथला तो गोंगाट, गर्दी, वाहनांनी आणि माणसांनी खच्चून भरून वाहणारे रस्ते ह्याचे प्रत्ययकारी चित्रण करणाऱ्या मारिओंचा जीव मात्र जडला होता तो त्यांच्या शांत, सुशेगाद गोव्यावर. गोव्याच्या ह्या संथ जीवनशैलीचे, निवांत गतकाळाचे दर्शन घडवणारी रेखाटने मारिओंनी केली. धोतर नेसून कोट घालून कापडी पिशवी घेऊन बाजारात गेलेला बाप्पा असो किंवा चर्चमधील मिस आटोपून परतणारा अंकल असो, मासळी बाजारातील उत्तान वक्षस्थळांची मासेवाली असो किंवा लक्षवेधी पार्श्वभागाची मोठ्या ओठांची टंच तरुणी. नाना नमुनेदार व्यक्ती मारिओंनी रेखाटल्या. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे आणि त्या चित्रांतील बारीकसारीक तपशीलांमुळे त्या पाहणाऱ्याच्या मनात रुतून बसल्या. अनेक व्यक्तिचित्रेही त्यांच्या चित्रशैलीतून निर्माण झाली आणि लोकप्रियही ठरली. ‘मिस फोन्सेका’, ‘मिस निंबुपानी’, ‘गोडबोले’, ‘बंडलदास’ आदी व्यक्तिरेखा त्यांच्या कल्पनेतून साकारल्या आणि तत्कालीन वृत्तपत्रीय स्तंभांची खुमारी वाढवून गेल्या. गोव्यातील युरोपीय शैलीची पोर्तुगीज वास्तुकलेचा बाज घेऊन उभी असलेली जुनी घरे, त्यांच्या त्या वैशिष्ट्यपूर्ण खिडक्या, बाहेरील बल्कांव, चर्च, मंदिरे यांचे सुंदर चित्रण मारिओंनी केले. त्याचबरोबर इथली सुशेगाद जीवनशैलीही रेखाटली. मारिओंच्या व्यंगचित्रातील प्रवाशांनी खच्चून भरलेली बस किंवा इथल्या फेरीबोटीतून प्रवासी घेऊन येत असलेले तऱ्हेतऱ्हेचे जिन्नस यांचे बारकाईने चित्रण करावे तर ते मारिओंनीच. दुसऱ्या कुठल्याही व्यंगचित्रकाराला दिसले नसतील एवढे बारीकसारीक तपशील मारिओंच्या सफाईदार रेषांतून प्रकटत असत. त्या वातावरणातील तो कोलाहल जणू त्यांच्या रेषांतून जिवंत होऊन ऐकू येई. छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील एक अत्यंत वेगळे आणि वैशिष्ट्यूपर्ण चित्र मारिओंनी रेखाटले आहे. खरे म्हणजे गोव्याच्या ह्या थोर चित्रकाराच्या शताब्दी वर्षात गोवा सरकारने त्यांच्या चित्रांचे एखादे संग्रहालय येथे उभारायला हरकत नव्हती. परंतु सरकारदरबारी मारिओ दुर्लक्षितच राहिले. नाही म्हणायला मारिओंच्या चित्रांचे व्यावसायिक स्वरूपात मोल जाणून त्यांच्या एका मित्राने मारिओ गॅलरीच्या माध्यमातून त्यांची ती चित्रे विविध रूपांत आणि पुस्तकांतून, इतर वस्तूंतून जिवंत ठेवली आहेत एवढाच दिलासा आहे. आजही ती त्यांची विशिष्ट ढबीतील चित्रे ह्या श्रेष्ठ व्यंगचित्रकाराची आठवण करून देतात. खरे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक चित्रमालिकाही त्यांनी केल्या आहेत. लिस्बन, लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क अशा अनेक शहरांवर त्यांनी चित्रमालिका रेखाटल्या, परंतु त्यांच्या रेषांतून गोवा जेवढ्या अस्सल रूपात प्रकटला आहे त्याची खुमारी काही औरच आहे. एकेकाळच्या शांत, निवांत गोव्याची आठवण आज केवळ ह्या चित्रांमधून उरली आहे. लाखो चौरस मीटरची राक्षसी भूरूपांतरणे, शहरी बकालपणा घेऊन बेफाम वाढत चाललेली येथली गावे, परप्रांतीयांचे ठिकठिकाणी दिसणारे लोंढे, त्यांच्याच हाती गेलेले पारंपरिक व्यवसाय ह्या सगळ्यातून मारिओंचा गोवा मात्र दिवसेंदिवस हरवत चालला आहे. ह्या महान व्यंगचित्रकाराच्या आजच्या जन्मशताब्दीनिमित्ताने तरी आपल्या हातून अळवाच्या पानावरील थेंबाप्रमाणे निसटून चाललेल्या गोव्याच्या जुन्या सलोखापूर्ण आणि शांततामय संस्कृतीला जपण्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार आपण करणार आहोत काय?