मायकल लोबोच भाजप सोडण्याच्या तयारीत ः साळगावकरांचा आरोप

0
265

कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्याकडून सरकारच्या धोरणाविरोधात वक्तव्ये केली जातात. यावरून मंत्री लोबो भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप साळगावचे आमदार, माजी मंत्री जयेश साळगावकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
साळगावचे आमदार साळगावकर यांच्याकडून विकास कामाकडे दुर्लक्ष केला जात असून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप मंत्री मायकल लोबो यांनी बुधवारी केला होता.

त्यावर बोलताना साळगावकर यांनी, आपला गोवा फॉरवर्ड पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण पुन्हा एकदा दिले. मंत्री लोबो यांच्याकडून साळगाव मतदारसंघातील विकास कामांत अडथळा आणला जात आहे. आपण मंत्रिपदी असताना हाती घेण्यात आलेले नवीन २८ प्रकल्प, ग्रामीण विकास यंत्रणेची ५४ कामे बंद पाडली आहेत. तसेच केंद्रीय योजनेतील रूर्बन मिशनअंतर्गत १०० कोटी रुपयांचे काम बंद पाडले आहे. साळगाव मतदारसंघात एखादे विकासकाम हाती घेतल्यानंतर सदर काम बंद पाडण्यासाठी संबंधितांना फोन करतात, असा आरोप आमदार साळगावकर यांनी केला आहे.

मंत्री लोबो यांचा साळगाव मतदारसंघावर डोळा आहे. आगामी निवडणुकीत या मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी आपणावर निष्क्रियतेचा आरोप करून लोकांची दिशाभूल करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अफवा पसरविण्यात येत आहे, असा दावा आमदार साळगावकर यांनी केला.