मानवाने चिंतन करण्याची गरज

0
249
  •  डॉ. सीताकांत घाणेकर

पण एक सत्य नाकारता येणार नाही- कोरोनामुळे स्वतःला फार हुशार व बुद्धिमान मानणारा मानवच आपल्या घरात, गावात बंदिस्त झालेला आहे. इतर सर्व पक्षी, प्राणी, जीव-जंतू मुक्तपणे फिरताहेत.

आज कुठेही जा एकच विषय- कोरोना. लहान मुले सोडून सर्वजण चिंतेत आहेत. विषय अनेक आहेत- मुलांचे शिक्षण, नोकरी, काम, पगार, पैसे, भविष्यकाळ…. ‘चिंता करत बसण्यापेक्षा चिंतन करून अशा परिस्थितीवर उत्तम उपाय, तोडगा शोधणेच श्रेयस्कर व आपल्या कल्याणाचे आहे. कारण म्हणतात ना-
चिता चिन्तासमा हि उक्तम् बिन्दुमात्रविशेषतः |
सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ॥

– चिता व चिंता हे शब्द सारखेच, फक्त एका बिंदूचा- अनुस्वाराचा फरक. पण चिता निर्जीवाला जाळते तर चिंता सजीवांना!
हल्ली सार्‍या जगात या चिंतेमुळेच अनेक महाभयंकर रोग वाढले आहेत. असेही म्हणता येईल की अनेकजण चिंतेमुळेच चितेच्या जवळ येतात म्हणजे त्यांचे आयुष्य कमी होते.

एक मानसोपचारतज्ज्ञ होते. त्यांच्याकडे तर बहुतेक रुग्ण हे चिंताग्रस्त होऊनच येतात. ते डॉक्टरांना म्हणायचे – ‘‘डॉक्टर, मला चिंता वाटते, भीती वाटते.’’ कसली? तर म्हणे ‘‘मला कुठलाही रोग झाला तर?’’
डॉक्टर म्हणाले, ‘‘रोग झाला तर दोन शक्यता आहेत. तुम्ही बरे होणार किंवा मरणार. बरे झाले तर चिंता करायची गरज नाही.’’
रुग्ण म्हणतो, ‘‘बरोबर आणि समजा मेलो तर?’’
डॉक्टर, ‘‘तुम्ही मेलात तर कर्मानुसार स्वर्गात किंवा नरकात जाणार. स्वर्गात गेलात तर चिंता नाही, आनंदच असेल.’’
रुग्ण, ‘‘पण नरकात गेलो तर?’’
डॉक्टर, ‘‘चिंता करू नका. कारण तिथे तुम्हाला तुमचे पुष्कळ मित्र, नातेवाईक भेटतील. मस्त गप्पागोष्टी होतील. मग चिंता करायला वेळच कुठे मिळेल? म्हणून तुम्ही चिंता करणे सोडून द्या. चिंतन करा. सकारात्मक विचार मनात आणा. लहान मुलासारखे व्हा – निरागस!’’
हल्लीच्या बातम्यांमध्ये सर्व प्रकारच्या – चांगल्या, वाईट बातम्या या असतातच. जसे – रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी, तिकिटे मिळवण्यासाठी रांगा.
– ट्रकने, टेम्पोने काहीजण गेले, त्यातले काहीजण अपघातात जागच्या जागीच ठार झालेत. नोकरीच्या जागेत पैसे नाहीत. जेवणखाण नाही. राहायला जागा नाही. त्याशिवाय गावातील कुटुंबाची चिंता म्हणून गावाला जायला निघालेले पण मृत्यूने त्यांना वाटेतच गाठले.
आणि चांगल्या म्हणजे – दिल्ली ते उत्तर प्रदेश सायकलने आपल्या कुटुंबाला व शेजार्‍याला घेऊन एक जण निघाला.
– एक तरुण मुलगी आपल्या सायकलने गावाला जायला निघाली.
– स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध उपाय
– अनेक विषयांवर मार्गदर्शनासाठी ‘ऑनलाईन वर्ग’ त्याचबरोबर काही गमतीदार व्हिडिओ.
– रस्त्यावर बसून काही ‘सिंह’ ‘लॉकडाऊन’ करतात, गाड्या परत जातात.
– शहरातून सर्व प्रकारचे पक्षी, जनावरे मुक्त संचार करतात.
खरें – खोटे.. कुणाला माहीत? आज फोटोग्राफी एवढी प्रगत झाली आहे की काहीही चित्रित करू शकतो. काही फोटो तर ऍनिमेशनचे असतात.

पण एक सत्य नाकारता येणार नाही- कोरोनामुळे स्वतःला फार हुशार व बुद्धिमान मानणारा मानवच आपल्या घरात, गावात बंदिस्त झालेला आहे. इतर सर्व पक्षी, प्राणी, जीव-जंतू मुक्तपणे फिरताहेत. आता मानवाला पोपटाचा पिंजरा, वाघ-सिंहाचा पिंजरा, माशांसाठी असलेले ऍक्वेरियम… यांचा अनुभव येईल. त्यात किती वेदना असतात याचा थोडातरी अनुभव येईल.
स्वतःच्या विरंगुळ्यासाठी असला दुष्टपणा तो थांबवेल का? त्याला त्यांची दया- माया येईल? हे प्रश्‍न अनुत्तरितच राहणार. अगदी थोड्यांनाच याची जाणीव असते किंवा होईल!
बुद्धिनिष्ठ मानव या विषयावर चिंतन करून विश्‍वकल्याणासाठी काही उपयुक्त उपाय करेल अशी अशा करुया.
पंचमहाभूतंसुद्धा रुसली आहेत असे मला केव्हा केव्हा वाटते- पृथ्वी-जल-वायु-तेज-आकाश. त्यामुळे भूकंप, वादळ-वारे चालू आहेत. आता पावसाळा सुरू होणार. त्यावेळी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहेच. पूर तर दरवर्षी कुठे ना कुठे येतोच. आता कोरोनाच्या राज्यात तो राजा-महाराजा किंवा सार्वभौम राजा कसा वागेल, कुणीही सांगू शकत नाही. मानवाची बुद्धी ती किती?
पंचमहाभूतं जी परमेश्‍वर निर्मित आहेत- सदासर्वकाळ. विश्‍व व सृष्टी, त्यातील सर्व घटकांना झाडंवेली- जीवजंतू- पशुपक्षीप्राणी व निश्‍चितच मानव या सगळ्यांना अत्यंत प्रेमाने सांभाळण्याचे सुंदर कार्य नियमितपणे करत असतात. फक्त त्यांच्यावर मालकी हक्क गाजवून ढवळाढवळ केली की ती खपवून घेतली जात नाही. हे सर्व ज्ञान भारतीय पूर्वसुरींना माहीत होते. म्हणून ते निसर्गाशी सहकार्याने, प्रेमाने वागत असत. मायेच्या प्रेमाने त्यांचे पालन करीत असत आणि आपण?? म्हणून त्यांनी अप्रत्यक्षपणे एक कडक इशाराच जणु आम्हाला दिलेला आहे.

* तुझ्यावाचून आमचे काही अडत नाही.
* आता परताल ना तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवा-
‘‘तुम्ही पाहुणे आहात, मालक नव्हे!’’
भारतीय इतिहास व संस्कृतीकडे नजर फिरवली तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. पंचमहाभूतांना ईश्‍वर मानून त्यांची हृदयापासून कृतज्ञता व्यक्त केली जात असे.. वेगवेगळ्या प्रकाराने – कधी प्रार्थना तर कधी पूजा, आरती…
१) पृथ्वी ः ही तर आपली माताच आहे. सकाळी उठल्याबरोबर तिच्यावर पाय ठेवण्याआधी हृदयगम्य प्रार्थना होती.
समुद्रवसने देवि पर्वत स्तनमंडले | विष्णुपत्नि ! नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे॥
– समुद्ररुपी वस्त्र धारण करणार्‍या, पर्वतरुपी स्तन असणार्‍या व भगवान विष्णूची पत्नी असलेल्या हे पृथ्वी देवी! तुला मी नमस्कार करतो. माझ्या पायांचा स्पर्श तुला होणार आहे याबद्दल तू मला क्षमा कर.
२) उंबरठा पूजन ः भारतात प्रत्येक घरात ही प्रथा चालू होती. अजूनही खेड्यात चालू आहे. शहरात काही घरात पूजन करतात. पू. पांडुरंगशास्त्री त्यामागची भूमिका सांगताना म्हणतात- उंबरठापूजन करतो म्हणजे आपण मानतो की तिथे देव आहे. दर वेळी आपण घराबाहेर जातो, तेव्हा देव विचारतो- कुठे जातोस? आणि परत घरी येतो तेव्हा विचारतो, कुठे गेला होतास?
यातील तत्त्वज्ञान व भाव समजणे आवश्यक आहे. आपण बहुतेक वेळा आपल्याच स्वार्थाच्या, व्यवहाराच्या कामासाठी जातो- पेशा, धंदा, समारंभ, पार्ट्या, प्रवास – मग देवाच्या कार्यासाठी केव्हा जातो? समाजसेवेसाठी जातो? अपवाद अर्थात आहेतच.
३) जल ः त्याला तर आपण देवच मानतो. पाणी तर प्रत्येक प्राण्याला प्राणासमानच आहे. जल नाही तर जीवन नाही. म्हणून मोठ्या जलाशयांना आपण मातेसमान, देवासमान मानले. त्यांची पूजा भक्तिभावाने केली. त्या सर्व नद्यांविषयी सुंदर श्‍लोक आहे….
‘‘गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा
कावेरी सरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गण्डकी
पूर्णाः पूर्णजलैः समुद्रसहिताः कुर्वन्तु मे मंगलम् ॥

– गंगा, सिन्धु, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेन्द्रतनया, चंबळा नदी, वेदिका, क्षिप्रा, वेत्रवती (माळव्यातील बेतवा नदी) प्रख्यात महासुरनदी, जया आणि गण्डकी या नद्या पवित्र जलाने परिपूर्ण होऊन समुद्रसहित माझे कल्याण करोत.
दुर्भाग्याने या नद्यांची काय दयनीय स्थिती झाली हे सर्वांना माहीतच आहे. त्यांच्या पाण्यात सर्व तर्‍हेची घाण, प्रेते (अर्धी जळलेली) दिसतात. पूर्वी त्या पाण्याचे आचमन करत असत, आता पाण्यात पाय घालायलादेखील धजणार नाही.
आनंदाची बातमी अशी आहे की कोरोनामुळे त्यांचे जल आता पुष्कळ स्वच्छ झाले आहे. ते आणखी स्वच्छ होऊन तसेच रहावे, अशी प्रार्थना आपण ईशचरणी करू या.
स्नान करताना एक छान श्‍लोक आपण म्हणतो-
गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति|
नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु॥
या श्‍लोकांवरून पाण्याचे व नद्यांचे महत्त्व कळते. काही नद्यांची नावेही आम्हाला माहीत नाहीत. कोरोनाचे आपण आभार मानायला हवेत कारण त्यामुळे आम्हाला हे सर्व ज्ञान झाले. पण शुष्क ज्ञान नको. ते आचरणात आणू या. सर्वांचे कल्याण होईल.