माणसांचं जग- 49 कोंडोयकान्न मांय

0
175

 

  • डॉ. जयंती नायक

 

तिला आमच्या घरात सगळीजणं ‘कोंडोयकान्न मांय’ म्हणून हाक मारायचे. परंतु तिचं खरं नाव काय होतं हे एकटी आई सोडल्यास दुसर्‍या कुणाला ठाऊक नव्हतं अन् आईला ते विचारायचं मला कधी सुचलं नाही.

तिचा अन् आमच्या घराचा संबंध अंदाजे चारपाच वर्षांचा असेल. पण ते नातं खूप जुनं असल्यासारखं खूप घट्ट झालं होतं. म्हणूनच तिचं आमच्या घराकडं येणं बंद झाल्यास आज पंचवीस वर्षांचा काळ लोटला तरी मला कित्येकदा तिची तीव्रतेनं आठवण येते अन् मग माझे डोळे नकळत पाणावतात. रक्ताचे कसलेच नाते-गोते नसताना, धर्म-जातसुद्धा एक नसताना आमच्यावर मनापासून माया करणारी ती बाई होती. आईच्या भल्यामोठ्या गोतावळ्यातल्या माणसांपैकी ती एक. वात्सल्य, माया या भावनांना जात-धर्म लागता नाही; त्यासाठी फक्त मनाच्या तारा जुळाव्या लागतात हे मी तिच्याकडून शिकले.

कोंडोयकान्न मांय म्हणजे कोंडोयो (तिसर्‍यासारखा एक प्रकार) विकायला घेऊन येणारी बाई. आईच्या निधनाच्या साधारणपणे तीन वर्षांआधी ती आमच्या गावात पहिल्यांदा आली. त्यावेळी आई मायस्थेनिया ग्रेवीससारख्या दुर्धर आजारांनं ग्रासली होती. औषधपाणी चालू होतं. तिला आराम मिळावा म्हणून मी, माझे भाऊ, पापा, आजोबा सारेच धडपडत होतो. घरातलं, गुराढोरांचं, शेतीचं… सगळी कामं आम्ही एकेकट्यानं वाटून घेतली होती. परंतु ती मात्र जरा बरं वाटलं की आमचा डोळा चुकवून कामं करायची. करायची म्हणण्यापेक्षा स्वतःसाठी कामं तयार करीत होती अन् मग पुनः आजारी पडत होती. तर असंच एक काम तिनं स्वतःला लावून घेतलं होतं, ते म्हणजे, कोंडोयो कल्लावण्याचं. (विळीनं अथवा सुरीनं त्या उघडून त्यांतील मांस काढण्याचं. कधीकधी मांस चिकटलेली एक शिंपी ठेवली जाते.)

कोंडोयकान्न मांय ज्यावेळी आमच्या गावात पहिल्यादां आली तेव्हा खालच्या वाड्यावरून हाळी देत आमच्या वाड्यावर पोहोचली. तिचा आवाज ऐकून अन् खास करून कोंडोयो हा शब्द ऐकून आईनं तिला लगेचंच मागीलदारी बोलावून घेतलं. ती आली अन् त्या पहिल्या भेटीतच आईचं अन् तिचं जिव्हाळ्याचं नातं जुळलं. याला दोन कारणं होती, पहिलं कारण म्हणजे ती आईच्या माहेरगावची- वेळ्ळी येथील होती. माझी आई असोळणे येथील. असोळणे-वेळ्ळी ही जुळी गावं. सासुरवाशिणी आपल्या माहेरगावचं कोणी माणूस भेटलं म्हणजे जशी हरखून जाते, तसं माझ्या आईचं घडलं. शिवाय माझी आई हे वेगळंच रसायन होतं. तिला माणसांचा जास्तच लळा होता. रस्त्यावरच्या भिकार्‍याशीसुद्धा ती मायेनं- आपुलकीनंच वागायची. ही तर तिच्या माहेरगावची होती. दुसरं कारण म्हणजे ती कोंडोयो घेऊन विकायला आलेली. त्या कोंडोयो बघून आईच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी तिच्या गावच्या खाडीत, हंगामात सुकतीच्या वेळी भरपूर कोंडोयो मिळायच्या. गावचे गाबीत तसेच इतर लोक त्या वेचायला जायच्या. आई पण तिच्या लहानपणी इतर मुलींबरोबर वेचायला जायची. टोकरी भरभरून अथवा परकराचे ओचे भरभरून ती कोंडोयो वेचून आणायची.

आता कोंडोयकान्न मांयला बघून तिच्या मागच्या-पुढच्या सार्‍या आठवणी उजाळून आल्या. तिच्याशी बोलताना आपण माहेरी असल्याचा तिला भास झाला. कोंडोयकान्न मांयची अवस्थासुद्धा काही वेगळी नव्हती. तिलासुद्धा आपल्या गावची मैत्रीण भेटल्याचा आनंद झाला. तसं बघता दोघांच्या स्वभावात आणि वयात मोठा फरक नव्हता. ती आईपेक्षा वयानं चार-पाच वर्षांनी मोठी असेल. तीसुद्धा बोलघेवडी होती. मायाळू तर खूपच होती. आईशी बोलता बोलता ती त्या दिवशी गावात कोंडोयो विकण्यासाठी पुढं जायचं विसरूनच गेली. त्या दिवशी तिच्याकडच्या सार्‍या कोंडोयो आईनं विकत घेतल्या. ती पैसे घ्यायला तयार नव्हती, पण आईनं तिला अट घातली. पाहिजे तर मूठभर जास्त टाक, पण पैसे घ्यायलाच हवेत, नाहीतर मी तुझ्या कोंडोयो घेणार नाही. एवढ्या दूरवरून डोक्यावर टोकरी घेऊन येतेस, ती काय मला फुकट वाटायला? तिनं आईची अट मानून घेतली.

त्या दिवशी आई जाम खूश होती. मला आल्याआल्या सगळी कथा सांगितली. त्यानंतर कोंडोयकान्न मांय आठवड्यातून बुधवार-रविवार अशी नियमित आठवड्यातून दोनदा आमच्या गावात कोंडोयो घेऊन यायची. दुसर्‍या रविवारी आली त्यावेळी ती मला भेटली. आई सांगत होती ते काही खोटं नव्हतं, ती खरंच खूप मायाळू बाई होती. दिसायला आईसारखीच लांब-रूंद बांद्याची होती. माझ्याशी बोलताना ती आईच्या प्रेमानं बोलली. आईच्या आजारपणाचं ऐकून तिला खूप दुःख झालं होतं.

साधारणपणे ऑक्टोबर ते जानेवारी असे चार महिने ती दरवर्षी नियमित येत होती. पूर्वी ती म्हणे मासे विकायला जात नव्हती, तिचा नवरा ते काम करायचा. तो वारला, मुला-सुनेनं वेगळं टाकलं. तेव्हा स्वतःचं जीवन स्वावलंबी जगण्याच्या हेतूनं ती मासे विकायला बाहेर पडली. आमच्या परिसरात कोंडोयांना गिर्‍हाईक जास्त आहे म्हणून तिचं आमच्या गावात येणं-जाणं झालं. त्याकाळात आम्हाला खरं तर कोंडोयो खाऊन खाऊन नकोपुरे झालं होतं.

आई गेली तो सप्टेंबर महिना होता. दोन महिन्यांनी ती गावात आली तेव्हा तिला ते समजलं. ती खूप रडली. मी पण खूप भावूक झाले. म्हटलं, आई नाही तरी आम्ही आहोत.

त्यानंतर ती सलग दोन वर्षे आली आणि मग तीसुद्धा यायची बंद झाली…