माणसांचं जग- ५१ दुःखातही हसणारी मारिना

0
189

 

  • डॉ. जयंती नायक

तिच्या मनाची अन् भावनांची कुचंबणा होऊ लागली. घरात आता भावजया आल्या होत्या. तिला जगणं कठीण होऊ लागलं. तेव्हा आपला भार कुणावर नको म्हणून ती इथंतिथं कामाला जाऊ लागली.

 

ती माझ्या वडिलांकडे खूपदा आपल्या मुलासाठी कपडे शिवायला यायची. माझ्या वडिलांना ती दादा म्हणून हाक मारायची. वडिलांशी अदबीनं, एखाद्या बहिणीनं भावाशी बोलावं त्या स्नेहानं बोलायची. आईलाही वहिनी म्हणून हाक मारायची. माझंही पुतणी म्हणून हाक मारीत कौतुक करायची. माझ्या भावांना पुतणे म्हणायची.

आई तरी कमी परंतु वडीलच तिच्याशी खूप बोलायचे, तिची मायेनं चौकशी करायचे. आईला हाक मारून ती आल्याचे सांगत, तिला चहापाणी द्यायला सांगायचे. दुपारच्या वेळी आली तर जेवून जायचा आग्रह करायचे. ती आमच्याकडे चहा घ्यायची परंतु कधी जेवायला थांबायची नाही. आईनं कितीही नको म्हटलं तरी चहा प्यालेला आपला पेला आपणच धुवायची.

तिचा आवाज मोठा होता. ती खळखळत बोलायची. काही सांगताना हसत सांगायची. एकदा मी तिला हसता हसता डोळ्यांत अश्रू आणून रडताना बघितलं. मला आश्चर्य वाटलं. तसं ती बोलताना माझ्या मनात प्रश्‍न उभे राहायचे. हिची भाषा अशी कशी… ना धड हिंदूंची, ना धड ख्रिस्तांची… हिचं नाव मारी म्हणजे मारिना, पण ही दिसायला हिंदू वाटायची. ती कपाळाला कुंकू लावत नाही म्हणून हिला ख्रिस्ती म्हणायचं, नाहीतर ती पक्की हिंदू बाई वाटायची… अन् आई-पापा हिच्याशी इतक्या जवळिकेने का बोलतात… पापा तर तिच्याशी आमच्या गावच्या… आपल्या लहानपणीच्या आठवणी उगाळत का राहतात… तिला बघितलं म्हणजे आजोबा ‘काय नशीब देवा पोरीचं… नको ते केलं बाब पोरीनं…’ असं आपण एकटे बडबडत राहतात, ते का?…

माझ्या बालमनात असे कित्येक प्रश्‍न उठत होते, परंतु विचारलं तर आई कदाचित असल्या चौकश्या तुला लहान मुलीला कशाला म्हणून चिडेल या भयानं मी सगळं मनात दांबून ठेवलं होतं. परंतु एके दिवशी न राहवून ती येऊन गेल्यावर मी आईला प्रश्न केलाच. मी त्यावेळी सुमारे दहा वर्षांची होते. चौथीच्या वर्गात शिकत होते.

मी आईला तिच्यासंबंधी प्रश्न विचारला आणि नवल म्हणजे आई अजिबात चिडली नाही. मात्र काही क्षण गप्प माझ्याकडे बघत राहिली. मग म्हणाली, हो ती मूळची हिंदू… अमुक अमुकची ती बहीण… पण आता ती ख्रिस्ती बनली आहे… तिनं एका रेंदेराशी काजार केलं आहे…

आईनं मला एवढीच माहिती दिली अन् ती गप्प झाली. पुढचं काही तिनं मला सांगितलं नाही. आईनं तिचा गौप्यस्फोट केला होता, परंतु मला सविस्तर काही सांगितले नव्हते. माझं कुतूहल तितक्यानं क्षमलं नव्हतं. ते क्षमायला बराच काळ गेला.

दिसायला गोरी, मध्यम बांध्याची, नाकी-डोळी रेखीव, परंतु त्या रूपाची सारखी जोपासना न केल्यामुळे अन् परिस्थितीच्या फेर्‍यात अडकल्यामुळे तिचं रूप थोडं काळवंडलेलं, आकसलेलं होतं. मी बघत होते तेव्हापासून ती सहावारी लुगडं न्हेसायची. तिच्या गळ्यात एक बारीकशी सोनसाखळी अन् कानांत कर्णफुलं असायची. हातात काचेच्या बांगड्या. तिला मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा तिचं वय असेल त्यावेळी साधारणपणे पस्तिशीचं.

तिच्या त्या साधारण व्यक्तिमत्त्वात एक असाधारण गोष्ट समाविष्ट होती, ती म्हणजे, तिचं हसणं. ती बारीकसारीक एवढ्याशा कामासाठीही हसायची. तिला हसायला कारण लागायचं नाही, किंबहुना ती हसतच असायची. प्रत्येक शब्दाला, गोष्टीला ती हसतच जबाब द्यायची किंवा हसतच प्रश्‍न विचारायची. तिच्यासारखी पावलोपावली हसणारी बाई किंवा पुरुष मी आजतागायत माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही.

मला तिच्यासंबंधी नंतर जे कळलं त्याप्रमाणे ती आमच्या गावची, चार भावांच्या पाठीवर जन्माला आलेली. सात वर्षांची असताना तिचं लग्न झालं. नवरा मुलगा नात्यातलाच होता. लग्न होऊन वर्षभरात एका तापाच्या साथीत तिचा नवरा वारला. लग्न म्हणजे काय, हे कळायच्या आधीच ती विधवा झाली. दोन्हीकडची घरची परिस्थिती साधारणच होती. शेतीवरच पोटं भरायची. शेतीही त्यावेळी निसर्गाच्या भरवशावर पिकायची. अशा स्थितीत एक वाढतं तोंड घरात ठेवणं तिच्या सासू-सासर्‍याला परवडत नव्हतं. शिवाय तिचा पायगुण चांगला नाही असे लोक म्हणायचे. मग त्यांनी तिला माहेरी आणून सोडलं.

अबुद्ध पोर, तिला आपण विधवा आहोत हे समजतच नव्हतं. आईनं घरात बसायची तंबी दिली तरी ती घरातून बाहेर पडून आपल्या बरोबरच्या मुलांबरोबर खेळायला जायची (यात माझे वडील पण होते). इथं तिथं हिंडायची. ते बघून गावचे लोक काहीबाही बोलायचे. मग आई-वडील तिला भरपूर चोप द्यायचे…

अशा वातावरणात ती वयात आली. तिच्या मनाची अन् भावनांची कुचंबणा होऊ लागली. घरात आता भावजया आल्या होत्या. तिला जगणं कठीण होऊ लागलं. तेव्हा आपला भार कुणावर नको म्हणून ती इथंतिथं कामाला जाऊ लागली. यात ती शेजारगावच्या कायतान नावाच्या उमद्या रेंदेराच्या प्रेमात पडली. वडीलभावाला जेव्हा समजलं तेव्हा घरात मोठं कांड झालं. वडीलभावानं तिला गुरासारखं बदडलं. तिला घरात कोंडून ठेवलं. तसा हिने विद्रोह केला. ती एके रात्री घरातून पळून गेली अन् तिनं कायतानाशी काजार केलं. दुर्दैवानं इथंही तिची पाट सोडली नाही. तिला वर्षभरात मुलगा झाला पण तो जन्मःचा आंधळा होता.

एक मात्र, जीवनात कितीही वाईट प्रसंग आले तरी तिनं आपलं हसूं सोडलं नाही. पुढे तर तिच्यावर अधिकच मोठा दुर्दैवी प्रसंग आला होता. तिचा कायतान सूर काढताना माडावरून पाय घसरून पडला अन् हे जग सोडून गेला.

तरी ती हसत राहिली…

मला वाटतं ती आपल्या हसण्यातच दुःखाला वाट करून देत असावी.