माझ्या शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’

0
23

(रंगतरंग)

  • गो. रा. ढवळीकर

आमच्या घरी मास्तर आलेत आणि शाळा सुरू होतेय ही बातमी गावात लगेच पसरली आणि गावात आनंदाचं वातावरण तयार झालं. पालकांमध्ये उत्साह निर्माण झाला व त्यांचे पाय आमच्या घराकडे वळू लागले.

मी पाच वर्षांचा झालो. साल १९४४-४५ असावे. शाळेत नाव दाखल करण्याचे ते वय. त्याकाळी बालवाडी, अंगणवाडी अथवा नर्सरी या संकल्पना गोव्यात अस्तित्वात नव्हत्या. ज्या घराला शिक्षणाचे पूर्वसंस्कार असत अशा घरात आई-वडील अथवा घरातील इतर माणसांकडून मुलांना अक्षर-ओळख होत असे व पाठांतराच्या माध्यमातून भाषेचा परिचय व्हायचा. गावात कोणी शिक्षक आले तर शाळा; नाहीतर हुंदडण्यातच बालपण जायचं. माझं तसंच चाललं होतं. पाच वर्षांचा झालो तरी अद्याप मला अक्षर-ओळख झाली नव्हती. वडील फार शिकलेले नसले तरी ते शिक्षणाचे महत्त्व जाणून होते. मुलांच्या शिक्षणासाठी घरातच शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने ते शिक्षकाच्या शोधात होते.

मे महिना उजाडला म्हणजे घरात आंब्या-फणसांच्या राशी पडत. फणसांची साठे, पापड यांसारखे अनेक उद्योग घरात सुरू होत. या उद्योगांकरिता माणसांची गरज भासे. ती ओळखून माझी मोठी बहीण (आम्ही तिला ‘गोमती अक्का’ म्हणत असू) माहेरपणाला येत असे. मला पाटीवर ‘श्रीगणेशा’ही काढता येत नाही हे तिने पाहिले आणि ती मला घेऊन बसू लागली. त्यावेळी शिक्षणाची सुरुवात ‘श्रीगणेशाय नमः’ ही अक्षरे गिरवण्यापासून होत असे. ती आमच्याकडे असेपर्यंत तिने माझ्याकडून मुळाक्षरे तयार करून घेतली. एकदा अशीच ती आमच्या घराच्या पडवीवर मला शिकवीत असता समोरून आमचे वडील येताना दिसले. त्यांच्याबरोबर एक गृहस्थही होते. शुभ्र धोतर, पांढरा सदरा व डोक्यावर काळी टोपी धारण केलेले ते गृहस्थ होते जोशी मास्तर. बर्‍याच दिवसांनंतर वडिलांचं शोधकार्य सफल झालं होतं व जोशी मास्तरांच्या मदतीने आता शाळा सुरू होणार होती.

काही दिवसांतच आमच्या घरात शाळा सुरू झाली. त्याकाळी अशा खाजगी शाळा गावातील एखाद्या मंदिरात अथवा गावातीलच एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरात भरत. पडवीत गोणपाटावर मुले बसत. आमच्या घरी मास्तर आलेत आणि शाळा सुरू होतेय ही बातमी गावात लगेच पसरली आणि गावात आनंदाचं वातावरण तयार झालं. पालकांमध्ये उत्साह निर्माण झाला व त्यांचे पाय आमच्या घराकडे वळू लागले. जोशी मास्तरांचा मुक्काम आमच्याचकडे होता. त्यांची उत्तम व्यवस्था वडिलांनी केली होती व त्यांना काहीही कमी पडू नये ही काळजी माझी आई घेत असे. शाळेत येणार्‍या मुलांना दोन आणे, चार आणे अशी जी फी आकारली होती, तोच जोशी मास्तरांचा पगार.

शाळेत येणारी बहुतेक मुलं ही अतिशय गरीब कुटुंबातली. आर्थिकदृष्ट्या मागास गटातील म्हणता येतील अशी. गावातल्या बहुतेक सर्व जमिनी ख्रिश्‍चन भाटकारांच्या मालकीच्या. आमच्या रासई गावात जी वस्ती होती ती या भाटकारांच्या जमिनी कसणार्‍या गरीब कूळ-मुंडकारांची. त्यामध्ये काही हिंदू कुटुंबेही होती. गावात जे व्यवसाय चालत त्यामध्ये दोन किराणा दुकाने, दोन-तीन चहाची दुकाने (हॉटेलं), काही मासळी विकणारे व काही खाजेकार (मिठाई विकणारे). अशा गरीब परिस्थितीत दिवस कंठणारे लोक शिक्षणाकरिता किती खर्च करणार?
पाचसहा किलोमीटर अंतरावर पोर्तुगीज माध्यमाची शाळा होती. क्वचितच काही मुले एवढी पायपीट करीत त्या शाळेत जात. त्यामुळे बहुतेक गरीब कुटुंबातली तीस-चाळीस मुले आमच्या शाळेत येऊ लागली. त्यांमध्ये जेवढी हिंदूंची मुले होती, तेवढीच ख्रिस्ती मुले पण होती. त्यातील काही मुलांची नावे मला अजूनही आठवतात- म्हादू, विनू, जानू, दुकळो, नारायण, सुमन, कलावती इ. हिंदू व जुवांव, फिलिप, फ्रान्सिस हे पहिलीत शिकणारे व किस्तोद हा दुसरीत शिकणारा थोराड ख्रिस्ती मुलगा. आमच्या घरातले मी व माझा वडीलबंधू नारायण, तसेच डिचोली (नायङिण) येथील आमच्या आत्याचा मुलगा गजानन खेडेकर व पैकूळ (सत्तरी) येथील माझ्या मावशीचा मुलगा कै. राम देसाई हे पण आमच्या घरी राहायला आले. आर्थिक ओढाताणीच्या काळात शिक्षकाचा, मुलांचा भार वडील कसा पेलीत कुणास ठाऊक! जोशी मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली माझा पहिलीचा अभ्यास सुरू झाला. माझे भाऊ व मावसभाऊ, आतेभाऊ यांना त्यांचे वय व तयारी पाहून त्यांना इ. ४ थीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला होता.
जोशी मास्तर खूप छान शिकवीत. तसाच छडीचाही छान वापर करीत. ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ याचा अनुभव मी वयाच्या पाचव्या वर्षी पहिलीत असतानाच घेतला. विद्या घमघम आली की नाही आठवत नाही; परंतु दोन्ही हातांवर छडी छमछम चाललेली मी अद्याप विसरलेलो नाही. त्या वर्षभरात हाताचे तळवे खूपच मजबूत झाले खरे! छडीबरोबर चिमटे काढणे, गालगुच्चे घेणे, पाठीवर धम्मक लाडू देणे, उठाबशा काढायला लावणे यांसारख्या काहीशा सौम्य शिक्षाही आम्हाला अनुभवायला मिळाल्या. त्याकाळी शिक्षकांवर तसे कोणतेच निर्बंध नव्हते. जणू मुलांना मन मानेल त्याप्रमाणे शिक्षा देण्याचे अधिकार त्यांना होते. पालकांनाही वाटे की शिक्षकांनी मुलांना मार दिलाच पाहिजे.

जोशी मास्तरांनी आम्हाला लिहिण्या-वाचण्याबरोबरच हुतूतू (कबड्डी), खो-खो, आट्यापाट्या यांसारखे देशी खेळही शिकवले. शाळेत अनेक उत्सव साजरे केले जात. त्यांपैकी सरस्वतीपूजन हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असे. त्यानिमित्त गाणी, गोष्टी, नाटकुली सादर केली जात. आमच्या शाळेत त्यावर्षी मास्तरांनी ‘गुरुदक्षिणा’ हे नाटक बसवले होते. त्यामध्ये माझा बंधू नारायण, मावसभाऊ राम, आतेभाई गजानन व गावातील काही मुलामुलींनी भूमिका साकारल्या होत्या. काही ख्रिस्ती मुलांनाही भूमिका देण्यात आल्या होत्या. ते आमचे पहिलेच नाटक पाहण्यासाठी सर्व गाव लोटला होता.
जोशी मास्तरांची आमच्या घरची शाळा वर्षभरच चालली. आमच्या वार्षिक परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांकरिता आपण कवळे येथे जाऊन येतो असे सांगून ते जे घरातून बाहेर पडले ते परत आलेच नाहीत. नंतर आम्हाला समजले की त्यांनी कवळे येथील एका शाळेत नोकरी परत्करली आहे. असा झाला माझ्या शिक्षणाचा ‘श्रीगणेशा!’
(क्रमशः)