‘माझी बस’ योजना 1 जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर

0
2

>> कदंब महामंडळाने खासगी बसमालकांकडून मागवले अर्ज

गोवा कदंब वाहतूक महामंडळाकडून ‘माझी बस’ योजना प्रायोगिक तत्त्वावर येत्या 1 जुलै 2023 पासून सुरू केली जाणार आहे. मडगाव ते काणकोण, पणजी-फोंडा-सावर्डे आणि मडगाव-केपे-सांगे या तीन प्रमुख प्रवासी मार्गावर ही योजना सुरू केली जाणार आहे. कदंब महामंडळाने माझी बस योजनेसाठी खासगी बसमालकांकडून अर्ज मागविले असून येत्या 21 जून 2023 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

ही योजना पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यत राबविण्यात येणार आहे. या योजनेखाली तीन प्रमुख प्रवासी मार्गावरील खासगी बसगाड्या चालविण्यासाठी ताब्यात घेण्यात येणार आहेत. या योजनेखाली दरदिवशी किमान 180 किलोमीटर प्रवासी बस चालविण्यास मान्यता दिली जाणार आहे. कदंब महामंडळाकडून 24 ते 46 आसनी बसगाड्या भाडेपट्टीवर घेतल्या जाणार आहेत. त्यात 23 ते 26 आसनी बसगाड्यांनी प्रति किलोमीटर 29 रुपये, 27 ते 38 आसनी बसगाड्यांना प्रति किलोमीटर 34 रुपये आणि 39 ते 46 आसनी बसगाड्यांना प्रति किलोमीटर 36 रुपये भाडे दिले जाणार आहे.

या योजनेसाठी नियम व अटी तयार केल्या आहेत. या नियम व अटीची पूर्तता करणाऱ्या बसगाड्या चालविण्यासाठी ताब्यात घेतल्या जाणार आहेत. कदंब महामंडळाकडून बसगाडीवर वाहकाची (कंडक्टर) नियुक्ती केली जाणार आहे. बसमालकाला बसगाडीबाबत सविस्तर माहिती देणे बंधनकारक केले आहे. बसगाडी बंद पडल्यास बसगाडीची त्वरित दुरुस्ती करावी लागणार आहे. बसला अपघात झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही. बसमालकाला बसगाडीवर चालकाची (ड्रायव्हर) नियुक्ती करावी लागणार आहे. बसगाडीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी, आजारी चालकाची नियुक्ती करू नये, बसमालकाने बसगाडी स्वच्छ ठेवणे, बसगाडीचा रस्ता कर, प्रवासी कर भरला पाहिजे. बस चालकाची नोंदणी करून त्याला पीएफ, ईएसआयसी आदी सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे.

कदंब महामंडळाने बसगाडी चालविण्यासाठी घेतल्यानंतर बसमालकाने दर महिन्याच्या 3 आणि 18 तारखेला बिल सादर करावे लागणार आहे. बसमालकाला बिलाची रक्कम केवळ सात दिवसांत दिली जाणार आहे.

21 जूनपर्यंत अर्ज स्वीकारणार
कदंब महामंडळाने वेबसाइटवर माझी बस योजनेची माहिती जारी केली आहे. येत्या 21 जून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 22 जूनला अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. तसेच योजनेखालील 26 जूनला ताब्यात घेण्यात येणाऱ्या बसगाड्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. या बस योजनेबाबत बसमालकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या 15 जून 2023 रोजी बैठकीचे आयोजन केले आहे.