धिरयोतील उधळलेल्या बैलाने एका इसमावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. राजेश निस्तानी (42, रा. गिरदोली चांदर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तसेच आणखी तीन जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी 11:30 च्या सुमारास माजोर्डा येथे घडली.
सविस्तर माहितीनुसार, माजोर्डा येथे धिरयो आयोजित केल्या होत्या. त्या धिरयोतील एक बैल उधळला आणि धावत सुटला. त्याने धिरयो पाहण्यासाठी आलेल्या राजेश निस्तानी यांच्यावर हल्ला चढविल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्या बैलाने आणखी तिघांवर हल्ला केला. त्यात त्यांनाही दुखापत झाली; पण त्यांनी पळ काढल्याने ते बचावले. गंभीर झालेल्या राजेश यांना आधी खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उधळलेला बैल कुडतरी येथील माजी पंच रूई मिनेझिस यांच्या मालकीचा असून, राजेश हा त्यांच्याकडे कामाला होता. माजोर्डा येथील धिरयोवेळी एकाच्या मृत्यू प्रकरणी आयोजकांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यामुळे रूई मिनेझिस हे अडचणीत आले आहेत. त्यांनीच या धिरयोचे आयोजन केले होते.