मांद्रे मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदारांना दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान प्राप्त झाला आहे. सर्वात प्रथम महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार १९७२ साली या मतदारसंघातून दयानंद तथा भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री बनले. त्यानंतर आता ८ नोव्हेंबर २०१४ रोजी याच मतदारसंघाचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री झाल्याने दोनवेळा मांद्रे मतदारसंघाला मुख्यमंत्री पदाचा बहुमान मिळाला आहे.गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हे मांद्रे मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांना तो मान मिळाला, तब्बल ४२ वर्षांच्या काळानंतर पुन्हा मांद्रे मतदारसंघातील निवडून आलेल्या आमदाराला मुख्यमंत्री पदाचा मान मिळत आहे.
खलप, संगीता परब यांच्याकडून आनंद व्यक्त
माजी उपमुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आपल्याला आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली.
माजी शिक्षणमंत्री संगीता परब यांनी प्रतिक्रिया देताना या निवडीविषयी समाधान वाटत असून मांद्रे मतदारसंघातून आजपर्यंत निवडून आलेल्या आमदारांनी एक नवा अध्याय रचला असे सांगितले. भाऊसाहेब बांदोडकरानंतर याच मतदारसंघातून निवडून आलेले आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्रीपदी आरूढ होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. आता खर्या अर्थाने मांद्रे मतदारसंघाचा पर्यायाने पेडणे तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल, असे त्या म्हणाल्या.
शिक्षक ते मुख्यमंत्री
मुख्यमंत्री बनलेले प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे हरमल पंचक्रोशी हायस्कूलचे सुरुवातीला सहाय्यक शिक्षक, त्यानंतर मुख्याध्यापक, नंतर हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बनले. त्याशिवाय हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सभासद, सचिव व चेअरमनपदी निवड झाली. दोन वेळा भाजपा प्रदेश अध्यक्ष बनले. त्यांच्या भाजपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात दोन वेळा भाजपला राज्यात सत्ता प्राप्त झाली. मांद्रे मतदारसंघातून प्रथम निवडणुकीला उभे राहिले त्यावेळी पार्सेकर यांना फक्त ३६० मते मिळाली होती. मात्र त्यानंतर मतात जी आघाडी मिळत गेली ती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी.
पार्सेकरांचा राजकीय प्रवास
प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा जन्म
४ जुलै १९५६ साली हरमल येथे झाला.
* शिक्षण – एम.एस.सी. बी.एड
* राजकीय प्रवास – १९८९-९० भाजपाचे सरचिटणीस
* १९९४-१९९९ – सरचिटणीस
* मे २०००-२००३ – भाजपा प्रदेशाध्यक्ष
* २०१०-२०१२ – भाजपा प्रदेशाध्यक्ष
* २००२ – आमदारपदी निवड
* २००७ – आमदारपदी निवड
* २०१२ – आमदार व आरोग्यमंत्री