मांडवीवरील ‘केबल स्टेड’ पुलाचे काम ७५% पूर्ण

0
118

>> पूर्ण होण्यास निर्धारित वेळेपेक्षा थोडा विलंब लागणार

पणजीतील मांडवी नदीवर उभारण्यात येत असलेल्या नव्या ‘केबल स्टेड’ पुलाचे सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. मात्र, ह्या पुलाचे काम पूर्ण होण्यास निर्धारित वेळेपेक्षा थोडासा विलंब होण्याची शक्यता आहे, असे गोवा साधनसुविधा विकास महामंडळातील सूत्रांनी काल सांगितले.

ह्या पुलाचे काम येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण होणे थोडेसे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट ऐवजी काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. मध्यंतरीच्या काळात काही तांत्रिक अडचणींमुळे कामाचा वेग थोडासा मंदावला होता. त्यामुळे निर्धारीत वेळेत म्हणजेच ऑगस्टपर्यंत ह्या पुलाचे काम पूर्ण होणे कठीण दिसत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. ह्या पुलाच्या खांबांचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. तर पुलाच्या कमानींचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. तर एकूण पुलाचे काम ७५ टक्के एवढे पूर्ण झाले आहे असे सूत्रांनी सांगितले.

ऑगस्ट २०१८ पर्यंत ह्या पुलाचे काम पूर्ण होणार असून ऑगस्ट महिन्यातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या पुलाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. आता उद्घाटन लांबणीवर पडले असले तरी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते होणार असल्याचे जीएस्‌आयडीतील सूत्रांनी सांगितले.