मांडवीतील कॅसिनोंना वर्षभराची मुदतवाढ

0
34

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

>> राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मांडवी नदीतील सर्व सहाही तरंगत्या कॅसिनोंना वर्षभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत या कॅसिनो जहाजांना मांडवी नदीत राहू देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ही कॅसिनो जहाजे आम्हाला इतरत्र हलवायची आहेत पण त्यासाठी पर्यायी जागा अजून आम्हाला मिळालेली नाही. त्यासाठी जागेचा शोध जारी असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

स्टार्टअप धोरण मसुद्याला
मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

गोवा स्टार्टअप धोरण २०२२ च्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. या धोरणाचा मसुदा सरकारी वेबसाईटवर लोकांच्या शिफारशी व आक्षेप काय असतील ते जाणून घेण्यासाठी टाकण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या शिफारशी व आक्षेपानंतरच ह्या मसुद्याला अंतिम रुप देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. यापूर्वीचा मसुदा ह्या स्टार्टअपसाठी योग्य असा नव्हता. त्यामुळे त्यात दुरुस्त्या सुचवण्यात आल्या होत्या असे त्यांनी पुढे बोलताना नमूद केले.
यापूर्वीच्या धोरणात जशा चुका राहून गेल्या होत्या तशा नव्या धोरणात राहू नयेत यासाठी या नव्या धोरणाचा मसुदा सरकारी वेबसाईटवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गोवा स्टार्टअप धोरण २०१७ चा अवधी २०२० साली संपल्यानंतर त्याला दोनदा सहा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. शेवटची मुदत २७ सप्टेंबर २०२१ रोजी संपली होती असे सावंत म्हणाले.
दरम्यान, राज्यातील कला व स्थापत्यशास्त्र महाविद्यालयांच्या प्राचार्यपदासाठी कोकणी भाषेचे जे ज्ञान आवश्यक असल्याचा निकष आहे तो शिथिल केला जावा अशी ह्या महाविद्यालयांनी केलेली शिफारस मंत्रिमंडळ बैठकीत फेटाळण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.