निर्नायकी

0
40

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील निर्नायकी स्थितीकडे पक्षातील ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा बोटे दाखवू लागले आहेत. कपिल सिब्बल यांनी नुकताच केलेला घणाघात बोलका आहे. ‘पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांचा कार्यकाळ केव्हाच संपला आहे. मग सध्या निर्णय कोण घेतेय?’ असा खोचक सवाल त्यांनी नुकताच राहुल – प्रियांकाच्या सध्याच्या लुडबुडीला उद्देशून उपस्थित केला. त्याची शिक्षा म्हणून काहींनी त्यांच्या घराची आणि वाहनाची मोडतोडही केली. परंतु म्हणून काही सिब्बल यांनी उपस्थित केलेला प्रश्न पडद्याआड ढकलता येणार नाही. हा प्रश्नही काही एकट्या सिब्बल यांचा नाही. पक्षातील जुनेजाणते नेतेही हाच प्रश्न विचारण्यास धजावताना दिसत आहेत. कॉंग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वहीनतेनेच आज देशभरामध्ये पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे राजकीय अस्तित्वही धोक्यात आलेले आहे हेच यामागचे खरे कारण आहे. गळ्याशी आल्यावर आता बोललेच पाहिजे नाही का?
खरे तर ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ची घोषणा नरेंद्र मोदींनी केलेली होती, परंतु ते काम स्वतः कॉंग्रेस नेतृत्वच अधिक इमानेइतबारे करीत आहे असेच गेली काही वर्षे दिसत आले आहे. निवडणुकांतील सातत्याने होणारे पराभव, जिथे थोडा जनाधार मिळाला तेथेही सत्ता हस्तगत करण्यात आलेले अपयश, पक्ष सोडून चाललेले बडे बडे दिग्गज नेते आणि ह्या सगळ्या पडझडीला थोपवणे दूरच, उलट उदासीन वृत्तीने निष्ठावंतांचीही उपेक्षा करणारे पोरकट नेतृत्व यामुळे कॉंग्रेसचे देशात आता हसे होऊ लागले आहे. संपूर्ण देशामध्ये मोदी लाट असताना पंजाबात एकहाती पक्षाला सत्ता मिळवून देणार्‍या कॅप्टन अमरिंदरसिंगांसारख्या कार्यक्षम नेत्यावर नवज्योतसिंग सिद्धूसारख्या उपर्‍याच्या सांगण्यावरून अविश्वास दर्शवून पक्ष सोडायला लावणार्‍या कॉंग्रेसला पंजाबात सध्या पस्तावण्याची पाळी आली आहे. छत्तीसगढमध्येही अशाच प्रकारे मुख्यमंत्री भूपेन बाघेल यांना हटविण्याची तयारी पक्षश्रेष्ठींनी चालवल्याचे दिसताच त्यांच्या समर्थकांनी दिल्लीत धाव घेत पक्षाला तेथे फुटीच्या उंबरठ्यावर उभे केले आहे. राज्या-राज्यामध्ये नेत्यांमध्ये बेदिली माजली आहे. बडे बडे नेते कंटाळून पक्ष सोडून चालले आहेत. हे सगळे होत असताना पक्षाच्या शीर्षस्थानी असलेले गांधी कुटुंब मात्र पक्षामध्ये लोकशाही आणण्याचा आपलाच वायदा गुंडाळून ठेवून पक्षावर बेकायदेशीर पकड ठेवून बसले आहे.
सातत्याने होणार्‍या पक्षाच्या पराभवाने राहुल गांधी पुरते खचले आणि सोनिया गांधींना अंतरिम अध्यक्ष म्हणून पुन्हा जबाबदारी पत्करावी लागली. परंतु ही व्यवस्था हंगामी स्वरुपाची आहे व पक्षाच्या रीतसर संघटनात्मक निवडणुका घेऊन नेतृत्वाची निवड केली जावी असे ठरले होते. पक्षातील २३ नेत्यांनी खरमरीत पत्र लिहून नेतृत्वाला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली, तेव्हा त्यांना इथे तिथे सामावून घेऊन बंड शमविण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तरीही पक्षनेतृत्वाची महाकाय पोकळी काही मिटलेली नाही आणि एकीकडे अधिकृत नेतृत्वपद न स्वीकारता, प्रॉक्सी नेता बनून राहुल आणि प्रियांकाची जोडी सध्या पक्षातील सर्व निर्णय घेताना दिसत आहे. हे निर्णय पावलोपावली त्यांच्या अपरिपक्वतेचे दर्शन घडवीत आहेत. निर्णय चुकत आहेत. त्याचा मोठा फटका पक्षाला बसतो आहे, परंतु तरीदेखील पक्षाला नवी उभारी देण्याच्या दिशेने काय करता येईल, नेतृत्वाची पोकळी कशी दूर करता येईल ह्यासंबंधी कोणताही खुलेपणा दिसत नाही. पक्ष दिवसागणिक रसातळाला चालला आहे. आजवर धीराने पक्षासोबत राहिलेल्यांचाही धीर आता सुटत चालल्याचे दिसत आहे.
पक्षातून निघून चाललेल्यांची यादी वाढतच चालली आहे. पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये दोन दोन सत्ताकेंद्रे एकमेकांविरुद्ध उभी राहिली आहेत. पक्षातील ज्येष्ठ ज्येष्ठ मंडळीही आता नेतृत्वाची पोकळी मिटवा असा टाहो फोडू लागली आहेत. ‘आम्ही हुजूर २३ नाही’ असे ठणकावू लागली आहेत. परंतु एवढे सगळे होत असूनही हे सुधारण्याच्या दृष्टीने काही पावले उचलण्याची कोणतीही घाई श्रेष्ठींना दिसत नाही. संघटनात्मक निवडणुका पुढे पुढे जात आहेत. पक्षाची केंद्रीय कार्यसमिती, अ. भा. कार्यकारिणी, प्रदेश कॉंग्रेस समित्या ह्या सगळीकडे मनमानीपणे समर्थकांच्या नियुक्त्या चालल्या आहेत. प्रश्न विचारणार्‍यांना एकीकडे बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे, तर दुसरीकडे भलभलत्या विचारधारांच्या तरुण तुर्कांना पक्षामध्ये प्रवेश सुरू आहे. ह्या सगळ्या अनागोंदीची किती किंमत चुकवावी लागेल ह्याचे भान नेतृत्वाला दिसत नाही आणि पक्षाचा पावलोपावली चाललेला र्‍हासही!