मांगूर हिलमध्ये कोरोनाच्या स्थानिक संक्रमणाचा संशय

0
127

>> सहा रुग्ण सापडल्याने निर्बंधित क्षेत्र घोषित

मांगूर हिल वास्को येथील एका कुटुंबातील दोघांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे कोविड चाचणीत स्पष्ट झाल्याने मांगूर हिलमध्ये कोरोनाच्या स्थानिक संक्रमणाचा संशय व्यक्त केला जात आहे. या कोरोनाबाधित रुग्णाचे पाच कुटुंबीय आणि एका डॉक्टरची कोविड चाचणी केली जात आहे. दरम्यान, मांगूर हिल वास्को भागात कोरोना विषाणूचे सामाजिक संक्रमण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय हाती घेत मांगूर हिल भाग कंटेनमेंट विभाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात नाकाबंदी करण्यात आली असून सर्वांचे स्क्रिनिंग व कोविड चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

मांगूर हिल भागातील दोन कोरोना विषाणूबाधित रुग्णांमुळे कोरोना विषाणूचा सामाजिक फैलाव झाल्याचे प्राथमिक टप्प्यात म्हणणे योग्य होणार नाही, असा दावा आरोग्य सचिव मोहनन यांनी केला. आरोग्य खात्याकडून मांगूर हिल भागातील सर्वांचे स्क्रिनिंग व कोविड चाचणी केली जाणार आहे, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

मांगूर हिल वास्को येथील एका मच्छीमारी कुटुंबातील पाच जण आणि त्यांच्यावर उपचार करणार्‍या स्थानिक डॉक्टरला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरल्याने एकच खळबळ माजली. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी या वृत्ताला दुजोरा देऊन मांगूर हिल कंटेनमेंट विभाग घोषित करण्याची मागणी स्थानिक वृत्तवाहिन्यांवर याबाबतची प्रतिक्रिया व्यक्त करताना केली. तथापि, मांगूर हिल वास्को येथे दोघांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याने त्यांना उपचारार्थ मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य सचिव मोहनन यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. आरोग्यमंत्री राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास आरोग्य सचिवांनी नकार दिला. कोरोना विषाणूची दोघांना बाधा झालेली आहे. या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील सर्वांची कोविड चाचणी केली जात आहे. मांगूर हिल भागातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्वांची कोविड चाचणी केली जाणार आहे, असे मोहनन यांनी सांगितले.

मांगूर हिलमध्ये नाकाबंदी
मांगूर हिल वास्को येथील त्या मच्छीमारी कुटुंबातील व्यक्तींची सविस्तर माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. कोरोना विषाणूची बाधा झालेल्या कुटुंबाचा मासळी विक्रीचा व्यवसाय आहे. परराज्यातून येणार्‍या वाहनातून मासळी घेऊन तिची विक्री करीत होते. या कुटुंबातील व्यक्ती परराज्यात प्रवास केल्याबाबत अद्याप काही माहिती प्राप्त झालेली नाही, असे आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

मांगूर हिल भागातील पोलीस गस्त वाढवण्यात आली असून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांकडून या कुटुंबाच्या निवासाच्या आसपासच्या भागातील नागरिकांचे स्क्रिनिंग करण्याचे काम सुरू केले जाणार आहे.
मांगूर हिल या भागात मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती आहे. या भागात घरेसुद्धा दाटीवाटीने आहेत. स्थानिक उपजिल्हाधिकारी, पालिका मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी व इतरांनी मांगूर हिल भागातला भेट देऊन कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यास सुरुवात केली आहे.

मुलगा पोलीस शिपाई
वास्को येथील कोरोना विषाणूची बाधा झालेल्या नागरिकाचा एक मुलगा गोवा पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत आहे. या पोलीस शिपायाला कार्यालयीन काम देण्यात आले होते. त्याला गस्त घालण्याचे काम देण्यात आले नव्हते. या पोलीस शिपायाच्या संपर्कातील दोन पोलीस शिपायांची चाचणी केली जात आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी दिली.

कोरोना रुग्णसंख्या २९
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९ झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ७३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. त्यातील ४४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. जीएमसीच्या कोरोना खास वॉर्डात ८ जणांना काल दाखल करण्यात आले. जीएमसीमध्ये तपासण्यात आलेले १०३५ नमुने निगेटिव्ह आहेत. तर २ नमुने पॉझिटीव आढळून आले आहे. तसेच १०७८ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

ट्रूनेट चाचणीत सहाजण कोरोनाबाधित
असल्याचे उघड ः विश्‍वजीत
मांगूर हिल वास्को येथे एका मच्छीमारी कुटुंबातील पाच व्यक्ती आणि एक डॉक्टराला कोरोनाची बाधा झाल्याचे ट्रूनेट चाचणीत आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.
यात एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. या कुटुंबात एक पोलीस शिपाई असून दुसरा मुलगा वाळपई येथे फॅक्टरीत कामाला जात असल्याचे राणे यांनी सांगितले. पोलीस शिपाई असलेला मुलगा ज्या पोलीस स्थानकावर कामावर होता ते स्थानक सॅनिटाईझ करण्यात आले. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या दोघा पोलिसांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याचे यावेळी पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी सांगितले. बाधा झालेल्यांनी प्रवास केलेला नाही. राज्यातील पहिले कोरोनाच्या स्थानिक संक्रमणाचा प्रकार होण्याची शक्यता असून मांगूर हिल भागाला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
६ कोरोना रुग्ण बरे
दरम्यान, राज्यातील आणखी ६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून रुग्णांची संख्या २३ झाली आहे, अशी

कुटुंबातील सर्वांची चाचणी
मच्छिमारी कुटुंबातील एका व्यक्तीला गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. त्या व्यक्तीने स्थानिक डॉक्टरकडे तपासणी करून घेतली होती. सोमवारी त्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने त्याला कोविड चाचणी करण्याची सूचना करण्यात आली. त्यात त्या नागरिकाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर त्याच्या पत्नीची कोविड तपासणी करण्यात आली आहे. त्या व्यक्तीचे दोन मुलगे, तसेच गरोदर सुनेची तपासणी करण्यात आली आहे.