महिला पत्रकाराचे ट्रोलिंग; व्हाईट हाऊसकडून निषेध

0
15

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिका दौरा करून भारतात परतले. या दौऱ्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदही घेतली होती. या पत्रकार परिषदेत मोदींना प्रश्न विचारणाऱ्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरिना सिद्दीकी यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत असून, या ट्रोलिंगचा व्हाईट हाऊसने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. सिद्दीकी यांनी मोदींना भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण, मुस्लिमांचे हक्क आणि भाषण स्वातंत्र्याबाबत प्रश्न विचारला होता. मोदींनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिले होते; परंतु त्यानंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यासह अनेकांनी सिद्दीकी यांना ट्रोल केले. या ट्रोलिंगचा व्हाईट हाऊसने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. आम्ही कोणत्याही पत्रकाराला धमकावण्याच्या किंवा त्रास देण्याच्या प्रयत्नांचा निषेध करतो, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे म्हणाल्या.