महिला टी-ट्वेंटी विश्‍वचषक आजपासून

0
128

आयसीसी महिला टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धा आजपासून खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ गटात बहुतांशी बलाढ्य संघांचा भरणा असून तुलनेने ‘ब’ गटातील संघांसाठीची वाटचाल सोपी असेल. उभय गटातील केवळ आघाडीचे दोन संघच बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यातील लढतीने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १.३० वाजता हा सामना सुरु होईल.

स्पर्धेेत आपले नशीब आजमावणारे संघ

गट ‘अ’
ऑस्ट्रेलिया
अपेक्षांचे ओझे घेऊन यजमान संघ या स्पर्धेत उतरणार आहे. यजमान असल्याचा फायदा त्यांना होणार असून संभाव्य विजेत्यांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे. प्रशिक्षक मॅथ्यू मोट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या या संघाची गोलंदाजी वैविध्यपूर्ण आहे. एलिस पेरीची कलात्मकता, मेगन शूटची दाहकता व जेस जोनासनच्या कौशल्याला मनगटी तसेच पारंपरिक फिरकीपटूंची जोड लाभली आहे. खराब फॉर्ममधील एलिसा हिलीला लवकरात लवकर फॉर्म गवसण्याची अपेक्षा आहे. टायला व्लेमेनिकची दुखापत त्यांच्यासाठी जबर धक्का असला तरी सातत्यपूर्ण बेथ मूनी व अनुभवी मेग लेनिंग त्यांना बळकटी देण्यास पुरेशी आहे.

भारत
२००९, २०१० व २०१८ साली उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यानंतर टीम इंडिया यंदा एक किंवा दोन पावले अजून पुढे टाकण्याच्या अपेक्षेने स्पर्धेत उतरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली नव्या दमाची टीम इंडिया या स्पर्धेत दिसणार आहे. ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध १७३ धावांचा यशस्वी पाठलाग केलेल्या या संघाला विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये स्थान न देणे म्हणजे नवलच ठरेल. शफाली वर्मा, स्मृती मंधना, जेमिमा रॉड्रिगीस व हरमनप्रीत कौर यांच्या रुपात स्पर्धेतील सर्वांत स्फोटक चौकडी भारतीय संघात आहे. दीप्ती शर्मा व शिखा पांडे यांच्यामुळे संघ समतोल बनत असून बळी घेण्यासाठी फिरकी गोलंदाजांवर विसंबून असलेल्या टीम इंडियाकडून दमदार कामगिरी अपेक्षित आहे.

न्यूझीलंड
युवा व अनुभव यांची सरमिसळ म्हणजे न्यूझीलंडचा संघ. सोफी डिव्हाईनच्या रुपात नवीन कर्णधार या संघाला लाभला आहे. विश्‍वचषकापूर्वी न्यूझीलंडचा संघ भरात आहे. ‘हुकमी इक्का’ असलेली लिया ताहुहू परतल्यामुळे वेगवान गोलंदाजी विभागात त्यांची बाजू किंचित वरचढ झाली आहे. किशोरवयीन अमेलिया केरची लेगस्पिन गोलंदाजी ऑस्ट्रेलियातील वातावरणात प्रभावी ठरू शकते. टी-ट्वेंटी विश्‍वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावांची नोंद असलेली सुझी बेट्‌स तसेच फॉर्ममध्ये असलेल्या डिव्हाईनमुळे न्यूझीलंडला कमी लेखून चालणारे नाही.

श्रीलंका
सराव सामन्यांत इंग्लंड सारख्या बलाढ्य संघाला १० गड्यांनी धूळ चारून श्रीलंकेने आपली चुणूक दाखवली आहे. मुख्य स्पर्धेत त्यांचा हा फॉर्म कितपत टिकतो यावर ‘अ’ गटातील चुरस व धक्कादायक निकालांची संख्या अवलंबून आहे. चामरी अटापटू गोलंदाजी व फलंदाजीत दबावाखाली खेळण्यात वाकबगार असून शशिकला सिरीवर्धनेची जोड तिला लाभणार आहे. हसिनी परेराने आपल्या शैलीदार फटक्यांसाठी अल्पावधीत वेगळी ओळख निर्माण केली असून स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच ‘बाद फेरीत’ स्थान मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

बांगलादेश
बांगलादेश संघाने यापूर्वी कधीच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला नाही. त्यामुळे त्यांचा संघ प्रथमच कांगारूंच्या भूमीत खेळेल. टी-ट्वेंटीत त्यांचा संघ अजून एकदासुद्धा ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडविरुद्ध खेळलेला नाही. विश्‍वचषकात मात्र या दोघांविरुद्ध त्यांना खेळावे लागेल. २३ वर्षीय यष्टिरक्षक निगार सुलताना व अष्टपैलू रुमाना अहमद यांना महिलांच्या बिग बॅश स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे. नाहिदा अख्तरला फिरकी तर रितू मोनीला मध्यमगती मार्‍याचे नेतृत्व करावे लागणार आहे. २०१८च्या आशिया चषक स्पर्धेत त्यांनी दोनवेळा भारताला नमवून अचंबित करणारे निकाल नोंदविले होते. यावेळी मात्र ही शक्यता फार कमी आहे.

गट ‘ब’
प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व प्रस्थापित करून विशाल विजय मिळविण्यासाठी इंग्लंडचा संघ ओळखला जातो. हिथर नाईटच्या रुपात कल्पक नेता त्यांना लाभला आहे. संघाला वेगवान सुरुवात करून देण्यात डॅनी वायटचा हात धरणारा सध्या तरी कोणी नाही. मधल्या षटकांत धावा आटणार नाही याची दक्षता घेत आक्रमकता दाखवण्याचे काम नॅट सिवर व नाईट ही दुकली करत आलेली आहे. त्यामुळे टी-ट्वेंटीमध्ये १५० पेक्षा जास्त धावा या संघाने सर्वाधिक वेळा केल्या आहेत. ऍन्या श्रबसोल व कॅथरिन ब्रंट सारखे कल्पक मध्यमगती गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे ‘ब’ गटातून त्यांचा बाद फेरीतील प्रवेश नक्की मानला जात आहे.

दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेकडून या स्पर्धेत फारशी अपेक्षा नाही. त्यामुळे डॅन व्हॅन निएकर्कच्या या संघाला ‘डार्क हॉर्स हे बिरुद सोयीचे ठरेल. मागील वर्षी भारतीय संघाला ७० धावांत गुंडाळणारा हाच संघ होता. तर मागील आठवड्यात याच संघाने ऑस्ट्रेलियाची आघाडी फळी सहा षटकांत कापून काढली होती. सातत्य हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. व्हॅन निएकर्क, लिझेल ली व क्लो टायरॉन यांनी धावा फलकावर लगावल्या तर शबनम ईस्माइल, मरिझान काप व सुने लूस या गोलंदाजांचा काम अधिक सोपे होणार आहे.

वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीजचा संघ स्पर्धेतील सर्वांत धोकादायक मानला जात आहे. कर्णधार स्टेफानी टेलर व डिअँडा डॉटिन यांना मागील काही महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. त्यामुळे त्यांच्या फॉर्मबद्दल अनभिन्नता आहे. २०१६साली अंतिम फेरीत पराजित झालेल्या संघातील ८ व २०१८ साली विजेतेपदाला गवसणी घातलेल्या संघातील ११ खेळाडू विंडीजच्या संघात आहेत. त्यामुळे त्यांच्या फॉर्मबद्दल फारसे काही माहीत नसले तरी सर्वांत स्थिरावलेला हा त्यांचाच संघ आहे. डॉटिन गोलंदाजी करण्यास तंदुरुस्त झाली असून अनुभवी हेली मॅथ्यूज व नवोदित आलिया एलिन यांच्याकडून अपेक्षा आहेत.

थायलंड
नवोदित असला तरी थायलंडला टी-ट्वेंटी क्रिकेटचा खूप अनुभव आहे. मागील दोन कॅलेंडर वर्षांत थायलंडऐवढे टी-ट्वेंटी सामने कोणत्याही संघाने खेळलेले नाहीत. सोरनारिन त्रिपॉचचे नेतृत्व संघाला नवीन उंचीवर नेणारे ठरले आहे. खेळाडूंच्या पाठीशी उबे राहून, त्यांना प्रोत्साहन देत त्यांच्याकडून सर्वोत्तम प्रदर्शन घेण्याची कला तिला अवगत आहे. २०१९ साली नताया बोताचाम हिने टी-ट्वेंटीमध्ये अन्य कोणत्याही गोलंदाजापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. फलंदाजीत नाथाकन चांतम प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

पाकिस्तान
पाकिस्तानच्या गाठीशी आता सहा टी-ट्वेंटी विश्‍वचषकांचा अनुभव असणार आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर किमान काही सामने जिंकून प्रतिष्ठा राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ०-३ असा सपाटून मार खावा लागल्यानंतर त्यांच्या संघात घाऊक बदल झाले आहेत. १५ वर्षीय आयेशा नसीम अनुभवी झवेरिया खानसह डावाची सुरुवात करणे अपेक्षित आहे. १६ वर्षीय लेगस्पिनर सईदा अरुबा शाह हिच्याकडूनही संघाला बळींची अपेक्षा असेल.

भारताचे सामने
१ फेब्रुवारी ः वि. ऑस्ट्रेलिया, सिडनी, दुपारी १.३०, २४ फेब्रुवारी ः वि. बांगलादेश, पर्थ, संध्या. ४.३०, २७ फेब्रुवारी ः वि. न्यूझीलंड, मेलबर्न, सकाळी ८.३०, २९ फेब्रुवारी ः वि. श्रीलंका, मेलबर्न, दुपारी १.३०