महिलांना रात्रपाळीत काम ः विधेयक मंजूर

0
123

गोवा विधानसभेत महिलांना खासगी उद्योगांत रात्र पाळीत काम करण्यासाठी मान्यता देणारे कारखाने दुरूस्ती विधेयक २६ विरुद्ध ५ मतांनी काल मंजूर करण्यात आले. कारखाने व बाष्पक मंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सदर दुरुस्ती विधेयक मांडले. विरोधी कॉँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी हे विधेयक महिला विरोधी असल्याचा आरोप करून चिकित्सा समितीकडे पाठविण्याची मागणी केली. तथापि महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक १७ नियम तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री कवळेकर यांनी विधेयकाचे समर्थन करताना दिली.

या कारखाने दुरुस्ती विधेयकाला सभागृहातील २६ जणांनी पाठिंबा दिला. तर कॉँग्रेसचे ४ आणि मगोपचे ढवळीकर मिळून पाच जणांनी विरोध केला.
या दुरुस्ती विधेयकाबाबत विरोधी सदस्यांकडून अकारण चिंता व्यक्त केली जात आहे. खासगी उद्योगात रात्र पाळीत काम करणार्‍या महिलांच्या सुरक्षेसाठी खास नियमावली तयार केली जाणार आहे. महिलांना रात्रपाळीत कामावर नियुक्त करण्यासाठी खात्याकडून पूर्व परवानगी सक्तीची केली जाणार आहे. तसेच एक किंवा दोन महिलांना रात्र पाळीत काम करण्यास मान्यता दिली जाणार नाही. महिलांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्याची सक्ती केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या नियमानुसार गोवा सरकारकडून खास नियमावली तयार केली जाणार आहे, असे कवळेकर यांनी सांगितले.

विधेयक कामगार विरोधी ः रेजिनाल्ड
सरकारचे कारखाने दुरुस्ती विधेयक कामगार विरोधी आहे, अशी टीका आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केली. राज्यातील खासगी उद्योगात महिला कामगार किती आहेत. या महिला कामगारांची रात्रपाळीत काम करण्याची तयारी बाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे का? असे प्रश्‍न आमदार रेजिनाल्ड यांनी उपस्थित केले.
प्रतापसिंह राणे, रवी नाईक, सुदिन ढवळीकर यांनी रात्री पाळीत काम करणार्‍या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित करून विधेयक चिकित्सा समितीकडे पाठविण्याची मागणी केली.

एका विषयावर एकाची
दोन मते असू शकत नाही
मंत्री चंद्रकांत कवळेकर हे विरोधी पक्षनेतेपदी असताना त्यांनी या कारखाने दुरुस्ती विधेयकाबाबत व्यक्त केलेले मत तपासून पाहण्याची गरज आहे. एकाच व्यक्तीची एकाच विषयावर दोन मते असू शकत नाही, असे आमदार ढवळीकर यांनी सांगितले.