लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दी

0
195
  • शंभू भाऊ बांदेकर

लोकशाहीर तथा जनगायक अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भरीव योगदान दिले होते. राष्ट्र कार्यात झोकून देतानाच समाजप्रबोधनासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली. छळवणूक आणि पिळवणूक झालेल्या माणसांच्या व्यथा वेदनांना त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून आवाज दिला.

लोकशाहीर सुप्रसिद्ध साहित्यिक आणि जनगायक, जननायक म्हणून ख्यातकीर्त पावलेले तुकाराम भाऊराव साठे तथा अण्णाभाऊ साठे यांची काल १ ऑगस्ट पासून जन्मशताब्दी विविध कार्यक्रमांनिशी साजरी करण्याचा निर्णय मराठी साहित्यिकांनी घेतला आहे. स्तुत्य अशीच ही गोष्टी म्हणावी लागेल. शंभर वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म मातंग जमातीतील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांना शिकण्याची खूप हौस होती, पण घरातील अठराविश्‍वे दारिद्—य आणि दीन-दलितांना शिकण्यासाठी असलेला मज्जाव यामुळे ते मोजून अगदी दीड दिवस शाळेत गेले. पुढे पोटाची भरण्यासाठी ते मुंबईत आले. तेथील कम्युनिस्ट चळवळीशी त्यांचा संबंध आला. त्या चळवळीत सक्रिय असलेले कार्यकर्ते, नेते यांच्या सहकार्याने ते हळूहळू मराठी भाषा शिकले व मराठी साहित्यातील अव्वल दर्जाचे कादंबरीकार व सुप्रसिद्ध लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध झाले.

अण्णाभाऊ साठेंच्या वेदना, त्यांचा विद्रोह, त्यांचा आक्रोश हा स्वानुभवातून आला होता. आपण जे भोगले ते आपल्या समाजाला भोगायला लागू नये, यासाठी जीवनभर त्यांनी आपली वाणी व लेखणी यांचा वापर केला. म्हणून केवळ दलित साहित्यिकांनीच नव्हे तर तमाम दलितांना त्यांच्या निधनाने एक तळपता सूर्य अस्तास गेल्याचे दु:ख झाले होते.

मानवतावादाचा खणखणीत आणि दणदणीत आवाज म्हणजे अण्णाभाऊ साठेंचे सर्व साहित्य होय. त्यामुळे अण्णाभाऊंच्या या तेजस्वी व ओजस्वी विचारांचा जागर जन्मशताब्दीच्या निमित्ताने सर्वदूर पसरविणे हेच त्यांचे खरेखुरे स्मरण ठरेल यात शंका नाही.

लोकशाहीर तथा जनगायक अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भरीव योगदान दिले होते. राष्ट्र कार्यात झोकून देतानाच समाजप्रबोधनासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली. छळवणूक आणि पिळवणूक झालेल्या माणसांच्या व्यथा वेदनांना त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून आवाज दिला. या आवाजाची किमया अशी झाली की, छळलेले, पिळलेले लोक आपल्याला जमेल तशा आपल्या व्यथा – वेदनांना वाणी व लेखणीद्वारे वाचा फोडू लागले. त्यांचे वास्तववादी साहित्य सर्वांना भारून आणि भारावून टाकणारे ठरले. येथे श्रेष्ठ दलित साहित्यिक ‘बलुतं’कार पद्मश्री दया पवार यांची आठवण होते. त्यांनी ‘बलुतं’ या आपल्या चरित्रात्मक पुस्तकात लिहिले होते, या पुस्तकातील सर्व पात्रे आणि प्रसंग हे सत्य आहेत. कुणाला ते काल्पनिक वाटले तर ते निव्वळ योगायोग समजावा. याउलट तथाकथित इतर श्रेष्ठ साहित्यिक आपल्या पुस्तकात लिहितात, या पुस्तकातील सर्व पात्रे आणि प्रसंग हे काल्पनिक आहेत. कुठे काही वास्तव आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा. अण्णाभाऊ साठेे हे ताकाला जाऊन भांड लपविणारे नव्हते. मानवजातीच्या सच्चा वेदनांना त्यांनी कवेत घेतले व ती पात्रे अजरामर केली. त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीच्या आतापर्यंत १९ आवृत्त्या निघालेल्या आहेत. इंग्रजांच्या जुलमी सत्तेशी टक्कर देणारा हा फकीर आहे. ‘वारणेच्या खोर्‍यात’ मधील नायिका मंगला म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामासाठी बलिदान देणारी नायिका आहे. तसेच त्यांच्या चित्रा या कादंबरीतील चित्रा ही अनेक संकटांना सामोरे जाणारी, शेवटपर्यंत पराभूत न होणारी नायिका आहे. त्यांच्या वैजयंता कादंबरीतील नायिका वैजयंता ही आपल्या पायातील घुंगरांची पवित्र कला जतन करणारी नायिका आहे. तसेच त्यांच्या रूपा, मथुत, रत्ना, आवडी, रानगंगा या कादंबर्‍यांतील पात्रांबद्दल सांगता येईल. स्त्री जातीबद्दल असलेला अपूर्व आदर त्यांच्या लेखणीतून प्रकट झाला आहे. त्यांच्या कादंबरीतील नायिका परिस्थितीशी दोन हात करतात, लढतात, जखमी होतात, नष्ट होतात पण पराभव न मानता पुरुषार्थ गाजवतात.

अण्णाभाऊ साठेंना उणेपुरे ४१ वर्षांचे आयुष्य लाभले. एवढ्या आयुष्यात त्यांनी तब्बल पाऊणशे ग्रंथांची निर्मिती केली. त्यांचे हे साहित्य विविध भारतीय आणि विदेशी भाषांत अनुवादित करण्यात आले आहे. साहित्य हे क्रांतीचे कूळ आणि बंडाचे मूळ समजले जाते. व सांस्कृतिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला हे नजरेआड करून चालणार नाही.

दलित साहित्याबद्दल अनेक प्रस्थापितांनी नाकं मुरडली असली, तरी भालचंद्र फडकेंसारख्या श्रेष्ठ साहित्यिकाने प्रस्थापित विरोधी दलित साहित्याच्या विद्रोहाचे स्वागत केले होते. व दलित उपेक्षित साहित्यकारांच्या अव्वल व स्वानुभवावर आधारित साहित्याची प्रशंसा केली होती. असे असले तरी समीक्षकांकडून अण्णाभाऊंची मात्र उपेक्षा झाल्याची खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतिनिमित्त आयोजित महाचर्चेच्या आयोजनाचे अध्यक्ष म्हणून व्यक्त केले हे मी या महाचर्चेतील एक सहभागी वक्ता होतो म्हणून ‘याची देही याची डोळा’ अनुभवता आले. यासंबंधीची थोडक्यात माहिती अशी, १८ जुलै २०१९ ही अण्णाभाऊ साठेंची ५० वी पुण्यतिथी होती. त्याचे औचित्य साधून पुणे येथील झोपडपट्टी सुरक्षादलाने एका महाचर्चेचे आयोजन केले होते. महाचर्चेचा विषय होता. ‘देशात धर्म जातिभेदाच्या ताणतणावात अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य मानवतेचा दीपस्तंभ आहे’ या महाचर्चेत महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाचे तज्ज्ञ सदस्य प्रा. डॉ. सर्जेराव निमसे, अण्णाभाऊ साठेंचे सहकारी व साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, शाहीर अमर शेख, प्रतिष्ठानचे समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, लक्ष्मण माने आदी नामांकित सहभागी झाले होते. या महाचर्चेचे अध्यक्ष म्हणून सुयोग्य मार्गदर्शन करताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सुमारे ३५ कादंबर्‍या लिहिल्या. त्यांच्या साहित्यावर आधारित १२ चित्रपट तयार झाले. ए. के. हंगल, बलराज साहनी यासारखे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार त्यांच्या साहित्याच्या प्रेमात होते; परंतु समीक्षकांनी अण्णाभाऊंच्या साहित्याची दखल घेतली नाही.

काही का असेना, पण अण्णाभाऊ वाटगावसारख्या खेड्यातून मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात आले व रोजच्या जगण्याच्या भाकरीसाठी कधी हमाली तर कधी बूट पॉलिश तर कधी श्रीमंत लोकांची कुत्री सांभाळण्याचे काम केले. जीवनभर श्रमिक, वंचित, शोषित लोकांचा हुंकार बनून साहित्य निर्मिती करीत राहिले. त्यांची विश्‍वसाहित्यकार म्हणून गणना होऊ लागली. यातच सर्व आले. अशा अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीस १ ऑगस्टपासून प्रारंभ होत असून वर्षभर त्यांच्या विचारांचा जागर जगभरातील विविध ठिकाणी होणार आहे. मॉस्कोमध्ये त्यांच्या साहित्यावर विचारमंथन होणार असून तेथे त्यांचा अर्धपुतळाही उभारला जाणार आहे. सप्टेंबरमध्ये रशियातील मॉस्कोमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये तेवीसहून अधिक देशांतील अभ्यासक संशोधक, सहभागी होणार आहेत. अशावेळी मराठी भाषा आणि साहित्याची आपापल्यापरीने सेवा करणार्‍या गोव्यातील गोमंतविद्या निकेतन, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, गोवा मराठी अकादमी, गोमंतक मराठी अकादमी, गोमंतक मराठी भाषा परिचय, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा आणि कला अकादमी आदी संस्थांनी या जागरात सामील व्हावे, अशी सूचना करावीशी वाटते.