महिलांचे अर्थार्जन

0
151
  • नीना नाईक

दोन वर्षांत यश-अपयश, बेरीज-वजाबाकी यात प्रेम, द्वेष, आत्मीयता हे उघड झाले. कुठलाही व्यवसाय करताना… कोरोनाने हे शिकवलं. मला जगायचे आहे. ‘लोक काय म्हणतील’- हा शब्द शब्दकोशातून बाहेर पडला.

गाडी रुळावर लागली. मुलांची नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा चांगला चाललाय. ‘सेटल झाले मुलं..’ म्हणून पालक निर्धास्त झालेत… त्यावेळी काळाने घाव घालावा तसा कोविड अवतरला. सर्वच होत्याचं नव्हतं होऊन गेलं. कालपरवा पाहिलेली स्वप्न आता अपुरी राहणार हे दिसायला लागलं. कुणाला नोकर्‍यांवरून तडकाफडकी काढले तर काहींना महिनाभराची नोटीस देऊन कामाला रामराम ठोकावा लागलेला. अधांतरित असल्याचा भास झाला. त्यातून ‘डिप्रेशन’आलं. अपुर्‍या जागेत ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झालं. मुलांच्या शिक्षणाचा बट्‌ट्याबोळ झाला. सुट्‌ट्यांचाही कंटाळा आला. संकटे चारी बाजूंनी आली. मात्र ‘पोट’ तिथंच राहिलं. दोन वेळच्या जेवणाचे वांधे. पार्सल मागवायचं तर अर्थार्जनाची चणचण. ताटात पडेल ते पवित्र झाले. दिवसेंदिवस काळजी सतावत राहिली. जे काही मिळत होतं त्यातच कुटुंबाच्या गरजा भागवायचा प्रयत्न होता. तरी ओझं होतंच.

घरातून बाहेर पडायला मिळू लागताच जगण्याची धडपड सुरू झाली. गृहिणींनी जेवण दे, न्याहारी दे, जिन्नस बनवून विकले आणि पैसा उभारायला सुरुवात केली. दुर्मीळ झालेल्या गोष्टी आणण्यापेक्षा किराणा, दूध, पाव, अंडी आणून विकायला सुरुवात केली. घरोघर ते सामान पोहोचवण्यासाठी थोडीफार यंत्रणा उभी केली. औषधं पोचवण्यापासून ते पर्यायी व्यवस्था वा पेशंट्‌सना ने-आण, त्यांना खाणे द्या, त्यांच्याबरोबर राहता येणे शक्य नव्हते म्हणून हॉस्पिटललाच जागा मिळेल तिथे पडून राहणे, त्यांचे कुटुंबीय व पेशंटमधील दुवा अशा अर्थाने त्यांनी पर्यायी व्यवसाय केला. डॉक्टरांनी न तपासताच ऑनलाइन सेवा द्यायला प्रारंभ केला. वेगवेगळ्या स्पर्धांना वाव नव्हता. अशावेळी वेबिनारच्या अंतर्गत कवितांपासून व्याख्यानांपर्यंत संपर्कात राहिले. ‘मी सुशिक्षित आहे, मला अमुकच नोकरी हवी’चा आग्रह संपला. आता आपण पडेल ते काम करू… या निर्णयावर सगळे यायला लागले.
निवारा, अन्नाची सोय झाली. कपड्यांची दुकाने, दागिन्यांची दुकाने ओस पडली. होता-नव्हता तो माल कमी दरात विकून टाकला. अशावेळी होलसेलकडे खूप माल होता. त्यांनी नवीन युक्ती काढली. त्यांनी.. जे नियमित या साइटला भेटी देतात त्यांनाच हा माल विकत घेता का.. ही विचारणा केली. सध्याची परिस्थिती पाहता, आहे तो माल विकून टाकण्यात शहाणपण आहे.. हे त्यांना उमगले. एक, दोन वस्तू न घेता अटी घातल्या की किमान दहाच्या वरती वस्तू खरेदी कराव्या लागतील तरच निम्म्या किमतीत वस्तू विकू. व्यवहार महत्त्वाचा. महिलांनी विचार केला- ठीक आहे.

शेजारीपाजारी, मित्रमैत्रिणींना विचारू या आणि सामान आणू या. हजार- दीड हजाराची वस्तू चारशे रुपयात मिळाली. माल गावोगावी पोचला. पन्नास-शंभरचा फायदा होऊ लागला. ‘क्लियरन्स सेल’च्या नावाखाली घरात नको असलेल्या वस्तूही विकल्या गेल्या. चार पैसे गाठीला लागले. घरगुती तूप, लोणची, पापड विकणार्‍यांना उधाण आले. दारासमोर गाई-म्हशी नसूनही घरगुती साजूक तूप, खवा, पनीर, चिकाचं दूध मुबलक प्रमाणात येऊ लागले. हळूहळू बाजारपेठा फुलल्या. तरीही कोविडची भीती. वयस्कर असोत अथवा तरुण, त्यांनी ऑनलाइन वस्तू मागवणे चालूच ठेवले.

काही प्रतिष्ठित वस्तीत तर फॅडच झालं, असा माझा गैरसमज होता. भ्रमाचा भोपळा फुटलाही लगेच. माझ्या मैत्रिणीच्या घरी पार्सलच्या पार्सल दाराबाहेर पाहिली. तिला विचारले, ‘अगं, अजूनही तू सामान ऑनलाइन मागवतेस ते का?’ ती हसत हसत म्हणाली, ‘‘मी बाजारात गेले तर नको असलेल्या वस्तू, गरजेबाहेर जाऊन आणते. पूर्वी दराचे कोष्टक बनवत नव्हते. आता ऑनलाइनमुळे दरपत्रक डोळ्यादेखत असतं. गरज आणि आर्थिक याचा ताळमेळ लावावा लागतो. पेट्रोलचे कडाडलेले दर पाहता घरी येऊन देताना थोडासा रिलीफ मिळतो. गरजूंना मदत होते. जाण्यायेण्याचा त्रास वाचतो.’’
इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच मोबाइल, इन्डक्शनसारख्या वस्तू बंद पडलेल्या, त्या दुरुस्त करून वापरणे, त्यासाठी मेकॅनिक लागू लागले. एकमेकांना मदत करता-करता त्यातूनही व्यवसाय करून काहींनी सेवा देणे सुरू केले. पार्लरची बंदी झाली. त्यात पार्लर तुमच्या दारीच येऊन पोहचू लागले. कमी दरात, स्वच्छता, घरच्या घरी सेवा.. प्राप्त झाल्या. टाकाउतून टिकाऊ करायचे उद्योग मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. कधी भुरकटलेल्या जीन्समधून बॅगा तर कमी कपड्यात ‘मॅच अँड मिक्स’ करत नावीन्यपूर्ण कपडे शिवून विकू लागले. घरगुती प्रकारे सण असो अथवा सोहळे असोत, व्हायला लागल्याने डेकोरेशनचे सामान बनवणे यावर भर यायला लागला. खर्चाला आळा आला परंतु देवाणघेवाण, शेजारीपाजारी यात संवाद वाढला. मदतीचा हात एकमेकांसाठी समोर आला. त्यामुळे घरगुती व्यवसायांना चालना मिळाली. बाळंतविडेही ह्या दरम्यान खूप खपले. आजीबाईच्या बटव्याची किंमत वधारली.
आता सरकारी कर्मचारी कामावर आले. सर्व परिस्थिती हाताळायची किमया घराघरांतून आली. दोन वर्षांत यश-अपयश, बेरीज-वजाबाकी यात प्रेम, द्वेष, आत्मीयता हे उघड झाले. सर्वांचे जीवन सुरळीत लागो, गाड्या रुळावरून समतोल राखत जावोत हीच ईशचरणी प्रार्थना!
कुठलाही व्यवसाय करताना कोरोनाने हे शिकवलं, मला जगायचे आहे. ‘लोक काय म्हणतील’.. हा शब्द शब्दकोशातून बाहेर पडला.