महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांनंतर महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांनी वाढीव मतदानाबाबत सातत्याने निवडणूक आयोगावर टीकाटिप्पणी चालवली आहे. त्यातच आता या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली असून, बुधवार दि. 25 जून रोजी निकाल जाहीर होईल.
गत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या 76 लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी काल मुंबई उच्च न्यायालयात पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. तसेच निवडणूक आयोग, केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी न्यायालयात आपली भूमिका मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर 25 जून रोजी निकाल जाहीर केला जाईल असे स्पष्ट केले.