महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकांचे वेध

0
125
  • देवेश कु. कडकडे
    डिचोली

इतर पक्षांच्या चिन्हांवर निवडून आलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन मतदारांच्या विश्‍वासाला तडा देण्यासाठी खतपाणी घालण्याचे काम सर्वप्रथम कॉंग्रेस आणि पवारांनी केले. आज त्यांच्याच पक्षातील दिग्गज नेते पक्ष सोडून सत्तेचे वारे ज्या दिशेने वाहते त्या दिशेने वाट धरत आहेत.

भारत हा निवडणुकांचा देश आहे. वर्षभर इथे सण-उत्सवांसारखे सतत निवडणुकांचे वातावरण असते. लोकसभा निवडणुकांची गरम हवा थंड होत असतानाच आता महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. सर्व पक्षांचे वाचाळवीर नेते आता बेलगाम भाषणे ठोकणार आहेत. त्यामुळे दिवाळी आधीच जनतेला राजकीय शिमगा अनुभवता येणार आहे. २०१४ साली महाराष्ट्रात कॉंग्रेसचे राज्य जाऊन भाजपाचे सरकार आले ही घटना त्या राज्यातील राजकारणात दीर्घकाळ परिणाम करणारी ठरली. या आधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सतत मिळत असलेले यश आणि विरोधी पक्षांचा होणारा फजितवडा यामुळे महाराष्ट्र हा कॉंग्रेस पक्षाचा अजिंक्य असा बालेकिल्ला आहे, असाच सर्वांचा समज होता, परंतु २०१४ साली कॉंग्रेस – राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत भाजपाने असा तडाखा दिला, जो दोन्ही पक्षांचा पायाच उखडणारा होता.
बुडत्याचा पाय अधिक खोलात अशी कॉंग्रेसची स्थिती झाली आहे. सोनिया गांधींची अध्यक्षपदी निवड होऊनही कॉंग्रेसपक्ष झोपलेल्या अवस्थेत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस कसाबसा लटपटत उभा आहे. या पक्षाचा पश्‍चिम महाराष्ट्राचा बालेकिल्ला ढासळतो की काय अशी परिस्थिती आहे. एकेकाळी बलवान असलेला कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रात दिमाखाने वावरत होता, परंतु हा डोलारा सत्तेच्या टेकूवर उभा होता. सत्ता गेली आणि पक्षाची स्थिती केविलवाणी झाली. नेत्यांमध्ये स्वार्थ आणि संधीसाधुपणाचा प्रत्यय हळूहळू येऊ लागला. कोणे एकेकाळी शरद पवार साहेबांची कृपा असावी म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये किती आटापिटा चालत असे. कारण याच पवारांनी अनेकदा भाजप-शिवसेनेच्या नेत्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. पवारांनी सदैव पुरोगामित्त्वाची वस्त्रे पांघरून सत्ता हस्तगत केली. यशवंतराव चव्हाणांनंतर महाराष्ट्रातून जर पंतप्रधान पदाचे दावेदार जर कोण असतील तर ते शरद पवार होते. आता मात्र एकूण राजकीय पारडेच उलट्या बाजूने फिरले आहे.

सध्या महाराष्ट्रात निवडणुका जाहीर होताच जिथे विजयाची खात्री आहे अशा पक्षात उड्या मारायचे सत्र सुरू झाले. खरेच आपल्या लोकशाहीचा महिमा अपरंपार आहे. इथे कोणीही, कधीही, कितीही वेळा या पक्षातून त्या पक्षात उड्या मारू शकतो. आज सातारचे उदयनराजे भोसले सोबत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील अनेक स्वयंघोषित राजे शिवसेना-भाजपात दाखल झाले आहेत. पाच वर्षांआधी यांच्या हातून सत्ता निसटल्याने त्यांच्या मतदासंघाच्या विकासाची प्रगती खुंटली. आता सत्ता येण्याची चिन्हे धुसर आहेत. अशाने ते सैरभैर झाले आणि जर एखादा सत्ताधारी पक्ष उदार मनाने प्रवेश देत असेल तर अशी संधी कोण वाया जाऊ देणार?
निवडणुकांमध्ये सत्ता-स्पर्धा अटळ आहे. तरीही सत्तेसाठी लाचार, भ्रष्ट आणि वादग्रस्त नेत्यांना पक्षात पावन करून घेणे निश्‍चितच समर्थनीय नाही. तसेच सदृढ लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्याच्या दृष्टीने चिंता करायला लावणारे आहे. आज भाजपा-शिवसेनेमध्ये बाहेरच्या नेत्यांनी गर्दी केल्यामुळे उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झालेली आहे. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्ते दुखावून पक्षात अंतर्गत बंडखोरीला वाव मिळताना दिसतो आहे. प्रत्येकाला आज सत्ता हवी. आमदार, खासदार, मंत्री ही पदे म्हणजे लोकप्रियतेची पावती आहे. त्यांच्यापुढे पक्षनिष्ठा, सभ्यता या दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आज शरद पवार फोडाफोडी, निष्ठा, विश्‍वास याची भाषा बोलतात, मात्र त्यांनी सर्वप्रथम आपले राजकीय गुरु वसंतदादा पाटील यांचा ४० वर्षांपूर्वी केलेला विश्‍वासघात महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही. ज्यांनी पवारांवर विश्‍वास ठेवला ते तोंडघशी पडले. पवारांनी शिवसेनेच्या छगन भुजबळांसह अठरा आमदारांना फोडले. नंतर गणेश नाईक, भास्कर जाधव यांनाही पक्षात घेतले. असे वेगवेगळ्या विरोधी पक्षांच्या बोटचेप्या माणसांना सत्तेचे प्रलोभन दाखवत कॉंग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीत ओढायचे, ही पवारांची नीती राहिली. त्यामुळे इतर पक्षांच्या चिन्हांवर निवडून आलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन मतदारांच्या विश्‍वासाला तडा देण्यासाठी खतपाणी घालण्याचे काम सर्वप्रथम कॉंग्रेस आणि पवारांनी केले. आज त्यांच्याच पक्षातील दिग्गज नेते पक्ष सोडून सत्तेचे वारे ज्या दिशेने वाहते त्या दिशेने वाट धरत आहेत.
पक्षातील अनेक सरदार गेले तरी मावळे सोबत आहेत या पवारांच्या वल्गना ऐकायला भारी असल्या तरी निवडणुकीच्या काळात पोकळ आहेत, कारण आपला सारा इतिहास फुटीरतेचा आहे. आपल्या लोकशाहीच्या दोन बाजू आहेत. एक बाजू नेते तर दुसरी बाजू मतदार सांभाळतात. म्हणजे या लोकशाहीतील फुटिरतेला नेत्यांइतके आपले मतदार तितकेच खतपाणी घालतात.

आज महाराष्ट्रात पक्षासाठी वणवण फिरायचे वय आता पवारांचे राहिलेले नाही. तब्येत साथ देत नाही. परिस्थितीही आता कालमानाने त्यांच्यावर रुसलेली आहे. पवारांचा चाणक्य आणि राजकारणातील मुत्सद्दी म्हणून बोलबाला आहे, परंतु पवार जी विधाने करतात ती कधीच प्रत्यक्षात उतरत नाहीत. त्यांची राजकीय भाकिते सदैव चुकलेली आहेत. त्यांनी मोदींनी पंतप्रधान होण्यासाठी खूप घाई केली असे विधान २०१४ साली केले होते. परंतु नरेंद्र मोदी हे आमदारकीच्या शर्यतीतही नव्हते तेव्हापासून म्हणजे १९९१ सालापासून पवार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. पण पवार काही पंतप्रधान बनले नाहीत. मोदींची पंतप्रधानपदाचा एक कार्यकाळ पूर्ण करून त्यांची दुसर्‍या कार्यकाळातील वाटचाल चालू आहे. तसेच आपल्या पक्षाला सलग दोनवेळा बहुमत मिळवून देण्याची किमया त्यांनी केली आहे. एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा अशी समस्त मराठी माणसांची इच्छा होती, परंतु पवारांनी आपली राजकीय विश्‍वासार्हता गमावली आहे. नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांत नवीन नेतृत्वाला संधी देऊन राजकारणातील भाजपाची नवीन पिढी तयार केली. भाजपाने देवेंद्र फडणवीस या नवख्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदावर बसविणे आश्चर्यकारक ठरले, कारण फडणवीसांकडे महापौरपद आणि आमदारकीशिवाय अन्य प्रशासकीय अनुभव नव्हता. तसेच विधानसभेत पूर्ण बहुमत नव्हते. शिवसेनेशी तडजोड ही तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना अशा स्वरुपाची होती. दोघांमध्ये मंत्रिपदांवरून धुसफूस चालू होती. अर्थात एक विचारधारा आणि राजकीय अपरिहार्यता यामुळे भाजप-शिवसेनेची युती झाली. अशा परिस्थितीत सत्तेचा गाडा हाकणे महाकठीण असते. तरीही फडणवीसांनी अनेक डावपेच अवलंबवत आणि तडजोडी करत सत्तेची पाच वर्षे पूर्ण केली. देवेंद्र फडणवीस हे सलग पाच वर्षे पूर्णकाळ मुख्यमंत्रीपद भूषविलेले पहिले बिगर कॉंग्रेसी मुख्यमंत्री ठरले आहेत. मराठा राजकारणाचे सदैव राजकारण करणार्‍यांच्या बालेकिल्ल्यात ब्राह्मण म्हटले की जातीवाद उरकून काढला जातो. तिथे एक ब्राह्मण मुख्यमंत्री पाच वर्षे टिकला. विदर्भाचे नेते देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे नेते बनले आहेत. निवडणुकीत विरोधी पक्षाचे नेतेच दिसणार नाहीत असे सांगत मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नीतिधैर्य खच्ची करीत आहेत. काही दिवसांत प्रचाराला रंग भरणार आहे. कोणाची सरशी होते हे निवडणूक निकाल सांगतीलच!