महाराष्ट्रातून येणार्‍यांसाठी एसओपीत बदलाचा विचार

0
131

>> मुख्यमंत्री ः गोव्याकडून रेल्वे, विमान वाहतूक मंत्रालयाला माहिती

गोव्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण महाराष्ट्रातून आलेले असून त्यामुळे गोव्याला महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाशांची जास्त भीती आहे. म्हणूनच गोवा सरकारने केंद्रीय रेल्वे तसेच विमान वाहतूक मंत्रालयाला गोव्याला महाराष्ट्राकडून कोरोनाची जास्त भीती असल्याची जाणीव करून दिलेली आहे. गोव्यात येण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रक्रियेत (एसओपी) महाराष्ट्रासाठी काही नियमात बदल करण्याचा विचार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

सुमारे ४२ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या दाबोळी विमानतळावरील ग्रेड सेपरेटरचे काल मंगळवारी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, आमदार कार्लूस आल्मेदा, श्रीमती एलिना साल्ढाणा, म्हापसाचे आमदार जोसुआ डिसोजा, दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादिप राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे सावंत म्हणाले की ग्रेड सेपरेटर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते. ते आज पूर्ण झाले याचा मला आनंद होत आहे. दाबोळी विमानतळावर येणार्‍या वाहतुकीला अडथळा होऊ नये तसेच चांगली सुविधा मिळावी यासाठी ४२ कोटी रुपये खर्च करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे एक किलोमीटरहून अधिक पल्ल्‌याचा बांधण्यात आलेले ग्रेड सेपरेटरमुळे वाहतूक कोंडी दूर होईल. महामारीच्या काळात दोन तीन महिने आम्ही विकास कामे पुढे नेऊ शकलो नाही. यात आर्थिक अडचणीही उद्भवल्या. आता या सर्व गोष्टीवर मात करून, जे प्रकल्प अर्धवट आहे ते दीड ते दोन वर्षात पूर्ण करण्यात येतील. यासाठी आर्थिक व्यवस्थेची तयारी चालू असल्याचे ते म्हणाले. वास्कोच्या कदंब बसस्थानकाचे काम, सांकवाळ येथील कलाभवन, कुठ्ठाळीचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम लवकरच पूर्णत्वाकडे नेणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यात आले. मंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी सांगितले की २०१४ यावर्षी ग्रेड सेपरेटरच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. पण तांत्रिक अडचणीमुळे काम पाच वर्षे लांबले. हा प्रकल्प पूर्ण झाल्याने दाबोळी विमानतळावरील वाहतुकीचा प्रश्‍न सुटणार आहे. तसेच हा प्रकल्प दाबोळीतीलच नव्हे तर गोव्यातील एक वैशिष्ट्य ठरणार आहे असे ते म्हणाले.

म्हादईचा विसर पडलेला नाही
म्हादईप्रश्‍नी आम्ही निद्रिस्त नसून मला म्हादईचा विसर पडलेला नाही अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संदर्भातील एका प्रश्‍नावर काल केली. म्हादईसंदर्भात सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.