महायुद्धाचे ढग

0
98

उत्तर कोरियाने नुकतीच केलेली हायड्रोजन बॉम्बची चाचणी सफल ठरल्याने जगापुढे संभाव्य तिसर्‍या जागतिक महायुद्धाची वावटळ नकळत घोंगावू लागली आहे. उत्तर कोरियाचा नेता किम जॉँग -उन आणि त्याची देशाला अण्वस्त्रसज्ज करण्याची आक्रमक मनीषा यातून हे संकट निर्माण झालेले आहे. ही त्या देशाची सहावी चाचणी आहे. उत्तर कोरियाचा हा हायड्रोजन बॉम्ब त्यांनी नव्यानेच विकसित केलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राला जोडून त्याद्वारे कोणत्याही देशावर हल्ला चढवता येऊ शकतो. अगदी अमेरिका देखील या मार्‍याच्या टप्प्यात येऊ शकते. त्याहून लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या बॉम्बसंदर्भात इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स किंवा ईएमपीचा वापर करण्यात आला असल्याने एखाद्या शहराला लक्ष्य करण्याऐवजी पृथ्वीच्या वातावरणातच त्याचा स्फोट घडवून कैकपट मोठा विनाश त्यातून घडविता येऊ शकतो. हिरोशिमाच्या विनाशास कारणीभूत ठरलेल्या अणूबॉम्बच्या चौपट क्षमतेच्या या बॉम्बमुळे निःशस्त्रीकरणाच्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना फार मोठी खीळ बसली आहे. उत्तर कोरियाने वर्षभरापूर्वी केलेल्या दहा किलोटन बॉम्बच्या चाचणीहून पाच ते सहापट अधिक शक्तिशाली असा हा बॉम्ब असल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे, त्यावरून या धोक्याच्या व्याप्तीची कल्पना येते. उत्तर कोरिया सातत्याने अशा प्रकारची अण्वस्त्रे विकसित करीत आलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिका त्याने विलक्षण अस्वस्थ झालेली आहे. स्वतः ट्रम्प यांनी ‘उत्तर कोरिया समजावण्याच्या स्थितीत नाही; त्यांना फक्त एकच भाषा कळेल’ असे उद्गार काढले असल्याने या संघर्षातून काय निष्पन्न होणार याबाबत भीती निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या भूमीला धोका निर्माण होत असेल तर अशा देशावर अग्नीवर्षाव करण्याचा इशारा ट्रम्प यांनी यापूर्वीच दिलेला आहे. त्यामुळे उत्तर कोरियाच्या या बेटकुळ्या दाखवणार्‍या कृतीतून आंतरराष्ट्रीय शांतता भंग तर पावणार नाही ना या चिंतेने जगाला ग्रासले आहे. ‘सद्यस्थितीत आम्हाला युद्ध नको आहे, परंतु आमची सहनशीलताही अमर्यादित स्वरूपाची नाही’ ही अमेरिकेची प्रतिक्रिया बोलकी आहे. जागतिक अण्वस्त्रस्पर्धेची इतिश्री करण्याच्या आजवर चाललेल्या प्रयत्नांची मोठी हानी उत्तर कोरियाच्या या चिथावणीखोर पावलाने केलेली आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे चीनसारखा देश त्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन करीत आलेला आहे. उत्तर कोरियाच्या या उचापतींवर कडक निर्बंधांचे पाऊल संयुक्त राष्ट्रसंघ आता उचलेल, परंतु त्याची तमा बाळगण्याच्या स्थितीत तो देश नाही. उत्तर कोरियाचा हाडवैरी असलेल्या दक्षिण कोरियाने अमेरिकेशी चालवलेली चुंबाचुंबीच या सगळ्याला खरे तर जबाबदार आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने नुकताच संयुक्त लष्करी सरावही केला. अमेरिकेची ही दक्षिण कोरियाला चुचकारण्याची नीतीच उत्तर कोरियाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास व शस्त्रास्त्रस्पर्धेला चालना देण्यास कारणीभूत ठरलेली आहे. गेल्या जानेवारीत जेव्हा उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब बनवीत असल्याची हूल उठविली होती, तेव्हा त्या घोषणेच्या सत्यतेविषयी तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केलेली होती. अणुबॉम्बमध्येच काही हायड्रोजन आयझोटॉप्स वापरून त्यातून स्फोटाची तीव्रता वाढविलेली असू शकते असे त्यांचे म्हणणे होते, परंतु आता ह्या सहाव्या चाचणीमुळे पूर्वीपेक्षा दसपट जास्त क्षमतेचा हादरा जेव्हा परिसराला बसला, तेव्हा त्याचे गांभीर्य सर्वांना कळून चुकले आहे. अजूनही हा हायड्रोजन बॉम्बच आहे हे मानायला तज्ज्ञ तयार नाहीत, परंतु त्यामुळे जगापुढे उभी राहिलेली टांगती तलवार काही हटत नाही. दोन महिन्यांपूर्वी उत्तर कोरियाने दोन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली होती. ती तब्बल दहा हजार किलोमीटरचा पल्ला पार करू शकतात. म्हणजे उद्या त्या देशाने अमेरिकेच्या एका शहराला लक्ष्य करायचे ठरवले, तर त्यांना ते शक्य आहे. भारतानेही आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला हा धोका असून आपण चिंतित असल्याचे जाहीर केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या जवळिकीमुळेच भारताची एवढी तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील अमेरिका दौर्‍यावेळी काढल्या गेलेल्या संयुक्त घोषणापत्रातही किम जॉंग – उन यांच्या कारवायांविषयी निषेधोद्गार काढण्यात आले होते. उत्तर कोरियाचा सद्यस्थितीत एक महत्त्वाचा पाठीराखा आहे तो चीन. उत्तर कोरियाची पाठराखण करण्याच्या चीनच्या प्रयत्नांमुळेच ट्रम्प यांनी दिलेल्या इशार्‍यानुसार अमेरिका – चीन व्यापारी संबंधांना बाधा येऊ शकते आणि त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात. चीनने हा इशारा धुडकावून लावला आहे. अर्थातच, त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये दरी निर्माण झालेली आहे आणि धोरणात्मक विचार करता ते खरे तर भारतासाठी हितकारक आहे. विशेषतः चीनने पाकिस्तानाशी चालवलेली चुंबाचुंबी, डोकलामसारख्या विषयांत भारताची काढलेली कुरापत हे सगळे पाहता त्याचे महत्त्व कळून चुकते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियाच्या विषयात लक्ष घातले आहे. या पेचप्रसंगावर लवकरात लवकर शांततामय तोडगा काढण्याची आत्यंतिक गरज आहे. तिसरे महायुद्ध कोणालाही परवडणार नाही.