महापौर, उपमहापौरपदी मोन्सेरात गटाचे उमेदवार बिनविरोध

0
113

>> सिध्दार्थ कुंकळ्येकरांचे सहकार्य : बाबुश

महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतून भाजप समर्थक नगरसेवक गटाने माघार घेतल्याने माजी मंत्री बाबूश मोन्सेरात समर्थक गटाच्या विठ्ठल चोपडेकर यांची महापौरपदी आणि अस्मिता केरकर यांच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवडीचा मार्ग काल मोकळा झाला. यासंबंधी औपचारीक घोषणा बुधवार दि. १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता केली जाणार आहे.

महापौर सुरेंद्र फुर्तादो, उपमहापौर लता पारेख यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नवीन महापौर व उपमहापौर निवड करण्यासाठी आज बैठक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निर्धारित वेळेत मोन्सेरात समर्थक गटाचे विठ्ठल चोपडेकर यांनी महापौर आणि अस्मिता केरकर यांनी उपमहापौरपदासाठी निवडणूक अधिकार्‍याकडे अर्ज दाखल केले.
भाजप समर्थक गटाच्या उमेदवाराच्या सोमवारी घेण्यात आलेल्या बैठकीत दोन्ही पदांसाठीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा मंगळवारी करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत भाजप गटाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही.

माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी रविवारी महापौरपदासाठी विठ्ठल चोपडेकर आणि उपमहापौरपदासाठी अस्मिता केरकर यांच्या नावाची घोषणा केली होती. दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भाजपने सहकार्य करावे, असे आवाहन माजी मंत्री मोन्सेरात यांनी केले होते. महापौर व उपमहापौर निवडणूक न लढविण्याचा निर्णय भाजप गटाने एकमताने घेतला आहे, अशी माहिती माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी दिली. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी दिलेल्या वचननामा पूर्तीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. पणजी महानगरपालिका क्षेत्राच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी प्रामाणिकपणे कार्य करावे, असे आवाहन माजी मंत्री मोन्सेरात यांनी केले. महापौर व उपमहापौरपदी नवीन चेहर्‍याची आवश्यकता होता. ही दोन्ही पदे बिनविरोध निवडण्यासाठी भाजप गट आणि माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांचे साहाय्य लाभले, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.