गोवा खाणप्रश्‍नी अमित शहा लक्ष घालणार : गडकरी लवकरच गोव्यात

0
105

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गोव्याच्या खाण प्रश्‍नात वैयक्तिक लक्ष घालून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन भाजपच्या खासदारांना काल दिले. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री तथा गोवा प्रभारी नितीन गडकरी खाणप्रश्‍नी जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी तसेच तोडगा काढण्यासाठी येत्या आठ दिवसात गोव्यात येणार आहेत, अशी माहिती राज्यसभा खासदार तथा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचे राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आयुष मंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोवा खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी नवी दिल्ली येथे मंगळवारी भेट घेतली.
राज्यातील खाण बंदीमुळे निर्माण होणार्‍या एकंदर परिस्थितीची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्यासमोर मांडण्यात आली. या खाण प्रश्‍नात वेळीच लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदारांनी केली.

राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांनी खाण प्रश्‍नी संबंधितांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. राज्यातील खाणी सुरू ठेवण्यासाठी पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे भाजप गोवा प्रभारी तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय खाण मंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेऊन खाण प्रश्‍नात लक्ष घालण्याची विनंती केली. खाण व्यवसाय बंद झाल्यास राज्याचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. खाण व्यावसायिकांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. तसेच लाखो लोकांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होणार आहे, असे केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. खाण बंदीबाबत स्थानिक नागरिक, व्यावसायिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी गोव्यात दौरा करण्याची विनंती करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानुसार खाण व्यवसाय तात्पुरता बंद ठेवला जाणार आहे. खाण व्यवसाय त्वरित पुन्हा सुरू करण्यावर विचार विनिमय केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात पुनःआढावा याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे, असे खासदार तेंडुलकर यांनी सांगितले. खाण खात्याकडून खाण लिजधारकांनी उत्खनन केलेल्या खनिज मालाला १५ मार्चनंतर वाहतुकीसाठी मान्यता देण्याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे.

मंत्रिमंडळ सल्लागार
समितीची आज बैठक
राज्यातील खाण व्यवसाय बंदीच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सल्लागार समितीची बैठक बुधवार १४ रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील खाण व्यवसायावर या बैठकीत चर्चा करून आवश्यक सूचना केली जाणार आहे. राज्यातील खाण व्यावसायिकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, कायदा मंत्री फ्रान्सीस डिसोझा, नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना सादर केलेल्या निवेदनावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.