Home बातम्या मलेरिया सेवकांच्या प्रश्‍नावर तोडगा दृष्टिपथात

मलेरिया सेवकांच्या प्रश्‍नावर तोडगा दृष्टिपथात

0

काल बोलणी करायला गेलेल्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सर्व ६७ मलेयिा सेवकांना सेवेत कायम करण्यात येईल. ज्यांचे वय झाले आहे त्यांना वयोमर्यादेत शिथीलता दिली जाईल. वृत्तपत्रातून जाहिरात देऊन पदे भरली जातील. मात्र सेवेत कायम कधी केले जाईल ते सांगण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिल्याचे, गावकर म्हणाले.

पिळर्ण सिटीझन फोरमचे नेते ऍड. यतिश नाईक, स्वाती केरकर, ऍड. सुभाष सावंत व बांदोडकर यांच्या शिष्टमंडळाने मलेरिया सेवकांसाठी मुख्यमंत्र्याशी बोलणी केली. यावेळी ४ मलेरिया सेवकही शिष्टमंडळात होते.

दरम्यान, सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर बहुतेक करून आज आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.

गेल्या आठ दिवसांपासून मलेरिया सेवक त्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी परवा भाजप कार्यकर्त्यांनी आरोग्य संचालक डॉ. राजनंदा देसाई यांना घेराव घातला होता.

दरम्यान, उपोषणास बसलेल्या मलेरिया सेवकांना ६० दिवसांत सेवेत सामावून घेतले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांमध्ये मतभेदांमुळे अन्याय : भाजप

मुख्यमंत्री दिगंबर कामत व आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्यातील मतभेदांमुळेच मलेरिया कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करून परवा भाजप कार्यकर्त्यांना झालेली मारहाण व काल खाण समर्थकांवर झालेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करण्याची मागणी फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक व सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

सरकारने मलेरिया कामगारांना तीन वेळा आश्‍वासने दिली होती. परंतु ती फोल ठरली. त्यामुळेच कामगारांवर आंदोलन करण्याची पाळी आली, असे नाईक म्हणाले. गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात गोवा प्रत्येक प्रश्‍नावर पेटला असून हे कॉंग्रेस सरकारचे व गोमंतकीय जनतेचे दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले. मलेरिया कामगारांना ताबडतोब सेवेत कायम न केल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

खाण समर्थकांवर सरकारला नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचे सिध्द झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी भाजपच्या संस्कृतीची चिंता करू नये. ६७ कामगारांच्या कुटुंबाविषयी कळवळा असल्यानेच भाजपने त्यांना पाठिंबा दिल्याचे पर्वतकर यांनी सांगितले.