- डॉ. भिकाजी घाणेकर
माझी नजर एका फ्लावरपॉटकडे गेली. त्यांत फक्त पाणी आणि तीन-चार फुलं. मी तो हातांत घेतला व दुसर्या हातावर त्यातले पाणी घेतले. त्या पाण्यात मोहरीसारखी दिसणारी डासांची अंडी होती. मी त्या मुलीला सांगितलं- ‘तुम्ही डासांना भरपूर जेवणखाण देऊन त्यांची चांगली देखभाल करीत आहांत’!
१९९१, १९९२ व १९९३ ही तीन वर्षे मी मलेरिया विभागात काम केले. त्यावेळी खुपशा लोकांना डास स्वच्छ पाण्यातही अंडी घालतात हे माहीत नव्हते.
१) एक दिवस सकाळी ११ वाजता एक अर्जंट नोट आली पणजी सेक्रेटेरीएटमधून- ‘इथं पुष्कळ डास झाले आहेत तेव्हा सावधगिरीची जी आवश्यक कामगिरी आहे ती लवकरांत लवकर करावी’ मी उठलो. कांपाल आरोग्य खात्यातून एक ड्रायव्हर घेतला व बरोबर एक एंटॉमॉलॉजिस्ट (डासांचा तज्ञ). आम्ही सेक्रेटरीयेटमध्ये गेलो. ज्या डिपार्टमेंटमधून नोट आली होती तिथे गेल्यावर बाहेर व आत पाहिले. इतक्यांत माझी नजर एक सुंदर मुलगी बसली होती तिच्या समोरील एका फ्लावरपॉटकडे गेली. त्यांत फक्त पाणी आणि तीन-चार फुलं. मी तो हातांत घेतला व दुसर्या हातावर त्यातले पाणी घेतले. त्यात पाण्यात मोहरीसारखी दिसणारी डासांची अंडी होती. ती दाखवून मी त्या मुलीला सांगितलं- ‘तुम्ही डासांना भरपूर जेवणखाण देऊन त्याची चांगली देखभाल करीत आहांत’. हें ऐकून ती मुलगी मला विचारते- ‘काय म्हणत आहांत तुम्ही?’ मी सांगितलं ‘ही डासांची अंडी. त्यांची आठ दिवसांत डास बनून उडून जातील. डासांची अंडी बघायला मायक्रोस्कोपची गरज नसते. ती अंडी साध्या नजरेला दिसतात’, हें सांगून मी मंत्री महोदयांच्या चेंबरमध्ये गेलो. त्यांच्या समोरच्या ग्लासात अंडी मी त्यांना दाखवली. ते जरासे घाबरले. मला म्हणाले. ‘ती अंडी जपानी मेंदूज्वरची नाहीत ना?’ ‘नाही, खात्रीनं नाही. कारण जपानी मेंदूज्वराचे डास आपली अंडी पावसाळ्यात साठवून असलेल्या पाण्यात घालतात’.
जी अंडी तिथे मिळाली होती. ती एडीस एजीप्तीची होती. ह्या डासांपासून डेंग्यूज्वर व चिकून गुनिया हे रोग होतात. त्याकाळात हे दोन्ही रोग गोव्यात नव्हते. अंडी असली आणि व्हायरस रोगजंतू नसला तर रोग होत नाही. हे पाणी काढून टाका व नुसती फुले ठेवा.
२) दुसरी एक मजेदार खबर. – एनआयओ (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी) त्यांच्या टेरेसवर पाणी होतं व त्यांत मच्छर झाले होते (अंडी व अळी लार्व्हे). मला एक फोन आला- ‘एनआयओ ऑफिसच्या टेरेसवर मच्छर आहेत. फवारे मारायला नाहींतर फॉगींग करायला तुमचे कामगार पाठवा’. मी सांगितले, ‘तुम्ही ते पाणी काढून टाका, ती मरून जातील’. ‘नाही, तुम्ही फॉगींग करणार्याला पाठवा. मी विचारले ‘तू कोण बोलतोस?’ ‘क्लार्क’. मी सांगितलं, ‘तुम्ही तुमच्या ऑफिसरला सांगा, मी बोलतो त्यांच्याकडे’. त्यानंतर पुन्हा फोन आलाच नाही.
३) एका संध्याकाळी तीन वाजता एक बातमी आली की गव्हर्नरच्या काबो राज निवासात गव्हर्नरच्या मुलाला (३०-३५ वर्षाच्या) मलेरिया झाला आहे. लिखित काहीच आलं नव्हतं. तरीपण मी स्वत: रक्त तपासाचे दोन बिडींग सेट आणि डासांनी अंडी घातली असतील तर तिथे अँटीलार्व्हल फवारे मारणे, रात्रीच्या वेळी फॉगींग करणे ही सगळी व्यवस्था केली.
मी जेव्हा स्वत: काबो राज निवासमध्ये गेलो होतो त्या वेळेस त्यांचा मुलगा झोपला होता. गव्हर्नरनी सांगितले, ‘तो झोपला आहे तेव्हां त्याला आता झोपू दे’. मी सांगितले की इतरांची रक्त तपासणी, डासांनी अंडी घातली असतील तर अँटिलार्व्हल फवारे व रात्री फॉगींगची सगळी तयारी केली आहे. गव्हर्नर खुश झाले. ते म्हणाले, ‘तुम्ही चला आता’. काबो राज निवासमध्ये एक मेडिकल ऑफिसर होती ती त्यांच्या पुत्राला बघणार होती.
मी ऑफीसमध्ये आल्यावर मला कळले की गव्हर्नरचा मुलगा त्याच दिवसी बनारसहून परतला होता. म्हणजेच त्याला मलेरियाची लागण झाली ती गोव्यात यायच्यापुर्वी १०-१४ दिवस आधीच. मादी मच्छर अंडी घालून आठ दिवसांनी डास होतो व तो १४ दिवसांनी चावल्यास त्याला मलेरिया होतो. बनारसहून ते मलेरिया घेऊन गोव्यात आले. पण काबो राज निवासमध्ये दुसर्यांना होण्याची शक्यता नव्हती.
४) आरोग्य खात्याच्या अंडर सेक्रेटरीचा संध्याकाळी ४ वाजता फोन – मी म्हापशाला राहते, तिथे डास पुष्कळ झाले आहेत. मोठे डास आहेत. तेव्हा आज रात्री तिथे फॉगिंग पाठवा. हे एकून मी शांतपणे सांगितले, ‘फॉगिंग फक्त मलेरिया फाल्सीफेरम झाला तर त्या भागातच करतात.’ तिने फोन ठेवला. नंतर त्यांना आरोग्य खात्याच्या डायरेक्टरनेही तेच सांगितले. दुसर्याच दिवशी एक मलेरिया इन्स्पेक्टर पाठवून दिला तर असे लक्षात आले की सेप्टीक टँक्स उघड्या होत्या.