चुका सुधारण्याची वेळ

0
133

तिसर्‍या टप्प्यातील प्रदीर्घ लॉकडाऊनअंती देशाचे दळणवळण पुन्हा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न पूर्णतः अंगलट आला आहे. आजवर केवळ महानगरांमध्येच मोठ्या संख्येने दिसणारे कोरोना रुग्ण आता देशाच्या अन्य प्रांतांत आणि ग्रामीण भागांमध्येही वाढू लागले आहेत. स्थलांतरित मजुरांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘श्रमिक एक्सप्रेस’ रेलगाड्या, प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या पंचवीस ‘राजधानी’ व इतर रेलगाड्या यातून झुंडीच्या झुंडी देशाच्या विविध भागांत विखुरल्या गेल्याने आता देशातील ७३६ जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमण वाढल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याची आकडेवारी सांगते आहे. त्यामुळेच झालेली चूक लक्षात घेऊन केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला व विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय देखील तोवर लांबणीवर ढकलला, परंतु तोवर व्हायचे ते नुकसान होऊन गेले आहे.
आपल्या गोव्यामध्ये रुग्णांची संख्या आज कशी वाढत चालली आहे हे पाहिले तर एखाद्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम कसे भयावह होऊ शकतात त्याचा प्रत्यय येतो. गोव्याकडे येणार्‍या केवळ दोन रेलगाड्यांच्या फेर्‍यांमधून शेकडोंच्या संख्येने प्रवासी गोव्यात उतरले आहेत. त्यापैकी कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या केवळ काहीजणांच्या तपासण्या झाल्या, त्यात रुग्णांचा सध्याचा आकडा आढळला. सर्वच्या सर्व प्रवाशांचे तपासणी अहवाल येतील तेव्हा हा आकडा आजच्याहून कितीतरी मोठा असू शकतो हे लक्षात घेणे जरूरी आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्यांनाच या रेलगाड्यांत चढू दिले जाईल, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल वगैरे आश्वासने रेल्वे मंत्रालयाने या विशेष रेलगाड्या सुरू करण्यापूर्वी दिली होती, परंतु मुळामध्ये देशातील कोरोनाच्या लाल विभागांमधून या रेलगाड्या सुरू करणेच पूर्णपणे चुकीचे होते. सर्वांची तपासणी करून जर या प्रवाशांना रेलगाड्यांत बसवले होते, तर मग उतरताक्षणी ते कोरोनाने बाधित कसे काय आढळले? याचा अर्थ, केवळ थर्मल गनने अंगचे तापमान पाहण्याचा फार्स उरकून त्यांना रेल्वेत बसू दिले गेले होते.
नवी दिल्ली – थिरुवनंतपुरमची पहिली राजधानी जेव्हा आली तेव्हा केरळमध्ये सात कोरोनाबाधित उतरल्याचे आढळून आले होते, तेव्हाच आम्ही व्यक्तिशः मुख्यमंत्र्यांचे त्याकडे लक्ष वेधले होेते. त्याच रेलगाडीतून गोव्यात उतरलेल्या प्रवाशांमध्येही हा संसर्ग असेल हेही तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्यानुसार या प्रवाशांची तपासणी झाली तेव्हा त्यातून सत्यस्थिती बाहेर पडली. या रेलगाड्या मुळात कोणाच्या सोईसाठी सुरू करण्यात आल्या होत्या याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुरूप आता दिल्ली – थिरुवनंतपुरम राजधानीचा मडगाव थांबा काढला गेला ही दिलासादायक बाब आहे, परंतु गोव्यात येण्यासाठी दिल्लीचे प्रवासी रत्नागिरीला वा मंगळुरूला उतरून रस्तामार्गे गोव्यात येऊ शकतात. त्यामुळे गोव्यात कोणत्याही मार्गाने येणार्‍यांसंदर्भात कडक निर्बंध घालणे हीच आज अत्यावश्यक गोष्ट आहे. गोव्याची दारे एवढ्यात सरसकट सर्वांना खुली करणे स्थानिक लोकसंख्येसाठी घातक ठरेल. गोव्याच्या जनतेच्या जिवाशी त्यातून खेळ मांडला जाईल.
गोव्यातील रुग्णांची संख्या ही केवळ रेल्वेने आलेल्या प्रवाशांचीच नाही. खरे तर दुसर्‍या टप्प्यात सुरवातीला जे रुग्ण गोव्यात आढळून आले, त्यापैकी एकही रेल्वेने आलेला नव्हता. गुजरातहून एक कुटुंब स्वतःच्या वाहनाने गोव्यात प्रवेशले व कोरोनाबाधित आढळले. दोन मालवाहू वाहनांचे चालक थेट गोव्याच्या अंतर्भागात आल्यावर कोरोनाबाधित आढळले. तोपर्यंत ते आणखी किती जणांच्या संपर्कात आले आणि त्यांनी आणखी किती जणांमध्ये हा विषाणू पोहोचवला हे अजून गुलदस्त्यात आहे. कोरोनाचे राज्यात सामाजिक संक्रमण झालेले नसल्याचे जरी सरकार सांगत असले, तरी काही रुग्ण हे गोव्याची सीमा पार करून अंतर्भागात आलेले होते आणि नंतरच संशयावरून त्यांना गोमेकॉत तपासणी करून घेण्यास सांगितले गेले व ते कोरोनाबाधित आढळले हे विसरून चालणार नाही. स्वतः आरोग्यमंत्र्यांनीही ही शक्यता पूर्णपणे नाकारलेली नाही. रेल्वेप्रमाणेच रस्तामार्गे आलेल्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. होम क्वारंटाईन केलेल्यांपैकी कितीजण बाधित असतील आणि लोकांमध्ये एव्हाना मिसळले असतील हे अजून समोर यायचे आहे!
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोव्याच्या चोरवाटांचा बंदोबस्त अजूनही आपल्याला करता आलेला नाही आणि सीमांवरून राजरोस प्रवेश करणार्‍यांची होणारी नुसती थर्मल गन चाचणी देखील पुरेशी नाही. कोरोनाचे बहुतेक रुग्ण हे असिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षणविरहित असतात हे विसरले जाता कामा नये. त्यामुळे वरवर पाहता कोरोनाबाधित रुग्ण हा सर्वसामान्यांसारखाच सुदृढ दिसतो, परंतु त्याच्या शरीरामध्ये विषाणूने शिरकाव केलेला असतो आणि तो सहस्त्रपटींनी गुणिला जात असतो आणि संपर्कात येणार्‍यांमध्ये तो संक्रमित होत जातो. त्यामुळे अशा छुप्या रुग्णांपासूनचा धोका मोठा आहे. त्यामुळेच हरित विभागातील गोव्याची ही सध्या लाल विभागाकडे होत असलेली वाटचाल जनतेची चिंता वाढविणारी आहे.
गोव्याच्या सीमाबंदीची काटेकोर कार्यवाही झाली असती, रेलगाड्या सुरू झाल्या नसत्या, तर गोव्यातील सर्व दैनंदिन व्यवहार एव्हाना सुरळीत होऊ शकले असते. लोक निर्धास्तपणे कामावर जाऊ शकले असते. परंतु आज कोरोनाचे विषाणू कुठे कुठे कसकसे पसरले असतील याची धास्ती नागरिकांमध्ये असल्याने जनतेमध्ये भीतीचे सावट आहे. लपवाछपवी सोडून जनतेला सत्यस्थिती सविस्तरपणे सांगण्याचे विश्वास देण्याचे आणि आजवर झालेल्या चुका सुधारून दिलासा देण्याचे काम तरी आता राज्य सरकारने करावे.