मलिक मेघालयाकडे, कोश्यारींनी ताबा स्वीकारला

0
333

>> सत्यपाल मलिक यांना निरोप

>> भगतसिंग कोश्यारी शपथबद्ध

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या बदलीचा आदेश आल्यानंतर काल ते मेघालयात जायला दाबोळी विमानतळावरून रवाना झाले. तर गोव्याचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राजभवनात काल शपथ देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली. गोवा पोलिसांकडून राज्यपालांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, सभापती राजेश पाटणेकर, ईडीसी अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, दामू नाईक, मुख्य सचिव परिमल राय, आयएएस, डीजीपी मुकेश कुमार मीना, आयपीएस तसेच विविध विभागांचे सचिव आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

श्री. कोश्यारी यांनी गोव्याची राजभाषा कोकणीतून शपथ घेतली. त्यामुळे सगळ्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. श्री. कोश्यारी यांना १९९७ साली उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. उत्तराखंड राज्य स्थापन झाल्यानंतर ऊर्जा, जलसिंचन, कायदा आणि विधिमंडळ कामकाज मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कोश्यारी यांनी काही वर्षे व्याख्याता म्हणून काम केले आहे. २००१-०२ मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

राज्यसभेच्या याचिकेवरील समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी वन रँक वन पेन्शन, हिमालय राज्यातील रेल्वे नेटवर्क आणि या व्यतिरिक्त इतर अनेक महत्वाच्या सामाजिक मुद्द्यांविषयी त्यांनी अहवाल सादर केला आहे.

श्री. कोश्यारी यांनी उत्तरांचल प्रदेश क्यू? आणि उत्तरांचल संघर्ष एवं समाधान अशी दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. श्री. कोश्यारी यांनी ५ सप्टेंबर रोजी महाराष्टाचे १९ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मुंबई येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री. कोश्यारी उत्तराखंड पक्षाचे प्रभारी असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा बहुमान आपल्याला मिळाल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

मलिक यांनी घेतला गोव्याचा निरोप
गोव्यातून मेघालयात बदली झालेले राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल गोव्याच्या निरोप घेतला. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, विधानसभा कामकाज मंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आदींनी राजभवनावर जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांना निरोप दिला.

दाबोळी विमानतळावर
कोश्यारी यांचे स्वागत

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची काल तडकाफडकी बदलीचा आदेश आल्यानंतर काल ते मेघालयात जायला दाबोळी विमानतळावरून रवाना झाले. तर भगतसिंग कोश्यारी यांचे काल दुपारी गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले.

सत्यपाल मलिक यांची बदली झाल्याचा आदेश आल्यानंतर त्यांनी काल सकाळी साडेआठ वाजता दाबोळी विमानतळावरील हंस तळावरून मेघालयाकडे कूच केली. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व इतर उपस्थित होते.

दरम्यान, गोव्याचे राज्यपाल म्हणून मलिक यांच्या जागी वर्णी लावलेल्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे काल दुपारी दोन वाजता दाभोळी हंस तळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.