देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन करूनही अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला निधास करंडक टी-२० मालिकेसाठी श्रीलंका संघात स्थान मिळलेले नाही. श्रीलंकेच्या निवड समितीने काल मंगळवारी २० सदस्यीय प्राथमिक संघाची घोेषणा केली, परंतु, ३४ वर्षीय मलिंगाला यात स्थान नाकारण्यात आले.
लंकेतील देशांतर्गत टी-२० स्पर्धेला शनिवार २४ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. नॉंडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबकडून खेळताना तीन सामन्यांत १० बळी घेऊनही मलिंगाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
निवड समितीचे अध्यक्ष ग्रॅहम लेबरॉय यांनी मलिंगाला स्थान न देण्याचे समर्थन केले आहे. केवळ तीन सामन्यांतील कामगिरीच्या बळावर स्थान देणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मलिंगासाठी संघाचे दरवाजे अजूनपर्यंत बंद झालेले नसून तंदुरुस्त मलिंगा २०१९च्या विश्वचषकासाठी संघाचा भाग बनू शकतो, असे ते म्हणाले. नियमित कर्णधार अँजेलो मॅथ्यूज तंदुरुस्त नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत दिनेश चंदीमल संघाचे नेतृत्व करेल. युवा वेगावान गोलंदाज लाहिरु कुमारा याच्यासह यष्टिरक्षक फलंदाज कुशल परेरा, वेगवान गोलंदाज नुवान प्रदीप व दुष्मंथ चमीरा यांनादेखील निवडण्यात आले आहे. ६ मार्च रोजी स्पर्धेला सुरुवात होत असून भारत व बांगलादेश हे मालिकेतील इतर दोन संघ आहेत.
श्रीलंका प्राथमिक संघ ः दिनेश चंदीमल, उपुल थरंगा, दनुष्का गुणथिलका, कुशल मेंडीस, दासुन शनका, कुशल परेरा, थिसारा परेरा, जीवन मेंडीस, सुरंगा लकमल, निरोशन डिकवेला, सदीरा समरविक्रमा, इसुरु उदाना, जेफ्री वंदेरसे, अकिला धनंजया, अमिला अपोन्सो, असिता फर्नांडो, लाहिरु कुमारा, नुवान प्रदीप, दुष्मंथ चमीरा व धनंजय डीसिल्वा.