आधी ठणठणीत व्हा!

0
141

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या लक्षावधी चाहत्यांना त्यामुळे चिंता वाटणे स्वाभाविक आहे आणि त्यांना आपल्या या प्रिय नेत्याला भेटण्यासाठी गोमेकॉकडे धाव घ्यावीशी वाटणेही साहजिक आहे. परंतु इस्पितळात दाखल असलेल्या व्यक्तीला भेटण्याचा हट्टाग्रह धरणे त्या आजारी व्यक्तीच्या दृष्टीने इष्ट नसते, त्यातून जंतूसंसर्ग पसरू शकतो याचे भानही पर्रीकर प्रेमींनी ठेवणे आवश्यक आहे. पर्रीकरांच्या आरोग्यावरील संकट दूर व्हावे यासाठी ठिकठिकाणी प्रार्थनासभा आणि पूजा, होमहवने सुरू असल्याच्या वार्ता येत आहेत. अर्थात अशा प्रकारांमागे आपली निष्ठा दाखवण्याचा सोस नसून ते लवकर बरे व्हावेत ही प्रामाणिक भावनाच अधिक असेल अशी अपेक्षा आहे. भावूक वृत्तीच्या गोवेकरांनी अशा गोष्टींमध्ये गुंतून जाणे यात नवल नाही. खरे तर गेल्या विधानसभा अधिवेशनात अर्थसंकल्प मांडायच्या दिवशी स्वतः पर्रीकर येऊन तो मांडण्याची शक्यता जेव्हा निर्माण झाली तेव्हा गोव्यामध्ये अक्षरशः आनंदाची लाट उसळली होती. पर्रीकरांचे समर्थकच नव्हे, तर विरोधक देखील त्या वार्तेने आनंदले होते. मुंबईच्या लीलावती रुग्णालयातील आपल्या रुग्णशय्येवरून उठून कधी एकदा हा लोकनेता आपल्या गोव्यात परत येतो याची उत्कंठा त्यांना लागून राहिली होती. ज्या प्रकारे विधानसभेच्या बाहेर येऊन सर्वपक्षीय आमदारांनी त्यांचे उत्साही स्वागत केले तो एक अपूर्व क्षण होता. काही प्रसंग असे असतात, जेव्हा पक्ष, विचारधारा, मतभेद यापेक्षा माणुसकी अधिक महत्त्वाची असते. उदात्त माणुसकीचे दर्शन अशा वेळी घडणे आवश्यक असते. दुर्दैवाने पर्रीकरांच्या आजारपणात त्यांच्या विरोधकांपैकी अनेकांची विकृतीही दृगोच्चर झाली. काहींनी त्यांच्याविषयी खोट्यानाट्या वावड्या उठविल्या. काहींनी तर विकृतीची परमावधी गाठली. ही बाब अतिशय गंभीर होती आणि त्याविरुद्ध कारवाईही होणे आवश्यक आहे. पर्रीकर यांनी स्वतःच्या तब्येतीची तमा न बाळगता तडक गोव्यात येऊन स्वतः अर्थसंकल्प मांडणे पसंत केले, त्याविषयीची भलतीसलती राजकीय कारणमीमांसा करण्याचा जो प्रकार काहींनी चालवलेला आहे, तोही विकृतीचाच भाग आहे. एखाद्या लोककल्याणाची आस असलेल्या नेत्याला स्वतःच्या संकल्पनेतून रात्रंदिवस खपून साकारलेला अर्थसंकल्प स्वतः जातीने येऊन मांडावासा वाटला तर त्यात गैर काय? फक्त आपल्या तब्येतीची पुरेशी काळजी पर्रीकरांनी घेणे आवश्यक होते, जी घेतली गेलेली दिसत नाही. त्यांना विधानसभेत येताना व्हिलचेअरची मदत घेता आली असती, परंतु प्रथेनुसार स्वतः अर्थसंकल्पाची बॅग हाती घेऊन नेहमीप्रमाणे तरातरा चालत आलेल्या पर्रीकरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी तमाम गोमंतकीयांना भले दिलासा दिला तरी आता पुन्हा उद्भवलेला तब्येतीचा त्रास पाहता त्यांनी घाई तर केली नाही ना अशी शंका डोकावते. त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना किमान दहा दिवस बाहेर पडू नका असा सल्ला दिला होता, परंतु तो त्यांनी मानला नाही असे सांगितले जाते. आता घरी आराम करण्याऐवजीही त्यांनी प्रशासकीय कामांचा भार उपसण्यास प्राधान्य दिले, जे टाळता आले नसते का? पर्रीकर यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे थोडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, कारण त्यांचे ठणठणीत असणे हे केवळ त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबियांसाठीच नव्हे, तर गोव्याच्या भल्यासाठी महत्त्वाचे आहे. मनोहर पर्रीकर या नेत्याविषयी कोणाचे काही मत असो, परंतु थेट जनसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचलेला असा दुसरा नेता भाऊसाहेबांनंतर तरी गोव्यात दुसरा आजवर झालेला नाही. त्यांची सर्वसामान्य गोवेकराशी जोडली गेलेली नाळ अतूट आहे आणि सामान्यांच्या चर्चेत भले त्यांच्या काही निर्णयांविषयी टीकेचे सूर कधी प्रकटत असले तरी त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी गोवेकरांच्या मनात तरी शंका नाही. त्यामुळे अशा या नेत्याने आपल्या तब्येतीची हेळसांड करू नये अशीच आज प्रत्येक गोमंतकीयाची इच्छा आहे. अर्थात, दुसर्‍याचे सल्ले ऐकून घेणार्‍यांपैकी हा माणूस नव्हे. ‘तुका खबर ना’ म्हणत सांगणार्‍यालाच फैलावर घ्यायलाही तो कमी करणार नाही, परंतु तमाम गोमंतकीयांची प्रेमभावना त्यांनी समजून घ्यावी. गोव्याला अजून अनेक वर्षे त्यांची गरज आहे. त्यांची जागा घेणारा दुसरा एकही नेता सध्या तरी दृष्टिपथात नाही. त्यांचे गोव्याच्या राजकारणातून दूर हटणे अराजकाला निमंत्रण ठरेल. पर्रीकरांच्या नुसत्या आजारपणाच्या वार्तेने अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना कशा उकळ्या फुटत होत्या ते नुकतेच दिसले. अशा लोकांच्या हाती गोव्याची सूत्रे जाता कामा नयेत. त्यामुळे त्यांनी आपल्या प्रकृतीला जपावे, ठणठणीत बरे व्हावे आणि मगच गोव्याच्या कल्याणाला वाहून घ्यावे.