किशोरीताई आमोणकर संगीत महोत्सव शनिवारपासून

0
157

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक दिग्गज कलाकार पद्मविभूषण गानसरस्वती स्व. किशोरीताई आमोणकर अंतल्यास या एप्रिलमध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या स्मृतीस समर्पित ‘गानसरस्वती किशोरीताई आमोणकर संगीत महोत्सव’ यंदा आयोजित करण्याचा निर्णय कला अकादमीने घेतला आहे. महोत्सव येत्या शनिवार व रविवार दि. २८ व २९ एप्रिल रोजी कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात होणार आहे.

या महोत्सवात किशोरीताईंचा शिष्यवर्ग, नामवंत गायक, वादक कलाकार व गोमंतकीय कलाकारांचे सादरीकरण संगीतप्रेमी रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवातील सर्व सत्रांतील कार्यक्रम खुले आहेत. महोत्सवाच्या पूर्वारंभी कार्यक्रमात स्व. किशोरीताईंचे ज्येष्ठतम शिष्य डॉ. अरूण द्रविड हे शनिवार दि. २८ रोजी सकाळी १० वाजता ‘मितश्रुत किशोरी आमोणकर’ हा गानसरस्वतींच्या १९६० ते १९८५ या २५ वर्षांच्या कालखंडातील संगीतावर आधारीत रसग्रहणात्मक कार्यक्रम अकादमीच्या कृष्णकक्षात (ब्लॅक बॉक्स) सादर करणार आहेत. यामध्ये काही अनवट बंदिशी सप्रात्यक्षिक डॉ. अरूण द्रविड सादर करतील. तसेच किशोरीताईंच्या आता उपलब्ध नसलेल्या अनेक दुर्मिळ मैफलींतील गायनाच्या ध्वनीफिती संपादीत व संक्षिप्त स्वरूपात श्रोत्यांना ऐकविण्यात येतील.

२८ रोजी सायं. ४.३० वा. मुंबई दूरदर्शन निर्मित स्व. किशोरीताईंवरील माहितीपट दाखविण्यात येईल. सायं. ५ वा. गोव्याचे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी किशोरीताईंचे सुपुत्र निहार व बिभास आमोणकर आणि स्नुषा सौ. विवियन व सौ. भारती आमोणकर यांची खास उपस्थिती लाभणार आहे. स्व. किशोरीताईंची सुमारे ३० वर्षे साथ व सेवा करणार्‍या श्रीमती मीना वायकर यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

किशोरीताईंचे सुपुत्र बिभास आमोणकर यांनी संपादित केलेल्या ताईंच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनही अकादमीच्या फॉयर एरियात दि. २८ व २९ रोजी भरविण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभानंतर होणार्‍या सत्रात सायं. ५.३० वाजता किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर यांचे गायन होईल. त्यानंतर पं. सतीश व्यास यांचे संतूरवादन व प्रथम सत्राची सांगता विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांच्या गायन मैफलीने होणार आहे. रविवार दि. २९ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात १०.३० वाजता ताइीच्या ज्येष्ठ शिष्य श्रीमती नंदिनी बेडेकर यांचे गायन व नंतर सत्राची सांगता विदुषी श्रीमती आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने होणार आहे. दि. २९ रोजी सायंकाळचे सत्र ४.३० वाजता सुरू होईल. यात प्रारंभी कला अकादमीच्या हिंदुस्थानी संगीत विभागातील कलाकार रूपेश गावस, सचिन तेली, श्रीमती प्रचला आमोणकर, श्रीमती सम्राज्ञी आईर शास्त्रीय गायन सादर करतील. सायं. ५.४५ वाजता श्रीमती मंजिरी असनारे-केळकर यांचे गायन व संगीत महोत्सवाची सांगता पं. उल्हास कशाळकर यांच्या मैफलीने होणार आहे. यासर्व नामवंत कलाकारांना पं. विश्‍वनाथ कान्हेरे, डॉ. रवींद्र काटोरी, सुयोग कुंडलकर, दत्तराज सुर्लकर (संवादिनी), मंगेश मुळ्ये, भरत कामत, श्रीधर मांडरे, ओजस अधिया, अमर मोपकर (तबला) व सोनिक वेलींकर (बासरी) या तेवढ्याच तोलामोलाच्या वादक कलाकारांची साथसंगत लाभणार आहे.