मयेत खाण अवलंबितांकडून खाणींसाठी मुख्यमंत्री पार्सेकरांसमोर घोषणाबाजी

0
92
मये येथे भाजपाच्या प्रचार सभेसाठी आलेले मुख्यमंत्री खाण कामगारांशी चर्चा करताना (छाया : विशांत वझे)

खाणी लवकर सुरू होण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आश्‍वासन
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री पार्सेकर, उपसभापती अनंतशेट यांच्यासमवेत मये येथे शंकर चोडणकर यांच्या प्रचारार्थ आले असता त्याठिकाणी सुमारे २०० खाण अवलंबित लोकांनी घोषणाबाजी केली.मुख्यमंत्री सभेसाठी येत असताना त्यांनी खाणी त्वरीत सुरू करण्याच्या घोषणा देण्यास प्रारंभ केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर न जाता ते थेट घोषणा देणार्‍यांसमोर आले. त्यांनी खाण कागारांना शांत रहा, बसून घ्या असे सांगितले. यावेळी खाण कामगारांनी आमच्यावर उपासमारीची पाळी आली असून खाणी कधी सुरू करणार याबाबत विचारले. ‘मी खाणी बंद केलेल्या नाहीत. परंतु खाणी सुरू करण्यासाठी आपली पूर्ण क्षमतेने तयारी सुरू असून सर्व अडथळे दूर झाले आहेत आता येत्या काही दिवसात पर्यावरणीय परवान्यांचा प्रश्‍न सुटून खाणी सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
त्यानंतर कामगार व खाण अवलंबित शांत झाले. सभेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी खाणीच्या प्रश्‍नांबाबत सरकार किती सक्रीय आहे याबाबत सविस्तर माहिती दिली व कोणत्याही क्षणी खाणी सुरू करण्याचा अडथळा दूर होणार असल्याचे सांगितले.
निवेदन सादर
यावेळी कामगारांनी मुख्यमंत्री पार्सेकर यांना निवेदन सादर केले. त्या निवेदन पर्यावरणीय दाखल्याबाबत त्वरीत निर्णय घेण्यात यावा, केंद्रातील दाखल्याबाबत त्वरीत निर्णय घेण्यात यावा, केंद्रातील ज्या गोष्टी होणे आवश्यक आहे त्याची त्वरीत पूर्तता करण्यात यावी, वेळोवेळी दिल्ली भेट देऊनही अद्याप खाण प्रश्‍न सुटलेला नाही त्याबाब तोडगा काढण्याचे आवाहन केले.