केरळच्या अर्थमंत्र्यांनी विधानसभा सभागृहातच केला मुक्काम

0
116

विरोधकांकडून गदारोळानंतर लाठीमार
साक्षरतेबाबत देशात अग्रस्थानी असलेल्या केरळ राज्याच्या विधानसभेत काल अर्थसंकल्पी सत्रावेळी अभूतपूर्व गोंधळ उडाला. अर्थमंत्री के. एम. मणी अर्थसंकल्प सादर करत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ माजवला व मणी यांना धक्काबुक्कीही केली. गोंधळातच मणी यांनी आपले भाषण पूर्ण केले.अर्थमंत्री मणी यांच्यावर मद्यालय परवान्यांसाठी एक कोटी रु.ची लाच घेतल्याचा आरोप असून त्यांना अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सभागृहात प्रवेश करू न देण्याचा इशारा विरोधकांनी दिला होता. यामुळे मणी यांच्यासह ७०हून अधिक सत्ताधारी आमदारांनी गुरूवारी रात्रीपासून सभागृहातच मुक्काम केला. त्यानंतर काल सकाळी मणी यांनी अधिवेशन सुरू झाल्यानंतर गदारोळातच अर्थसंकल्प मांडण्यास प्रारंभ केला. यामुळे विरोधकांनी निदर्शने सुरू केली. तसेच सभापतींचे आसन उखडले व मणी यांना धक्काबुक्की केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. केरळात छोट्या व मध्यम हॉटेल्समध्ये मद्य विक्रीवर बंदी असून तीन ते पंचतारांकीत हॉटेल्समध्ये तशी बंदी नाही. त्यामुळे तारांकीत हॉटेल्समधील मद्य विक्री परवान्यांसाठी मणी यांनी लाच घेतल्याचा विरोधकांचा आरोप आहे.