मयेतील खनिज वाहतुकीवर बंदी

0
11

मये गावातून खनिज मालाची वाहतूक करण्यावर बंदी घालण्याचा आदेश काल उच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या पुढील नोटिसीपर्यंत मये गावातून खनिज मालाची वाहतूक बंद ठेवण्यात यावी, असे न्यायालयाने आपल्या आदेशातून म्हटले आहे.
गोवा फाऊंडेशनने या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर आदेश देताना उच्च न्यायालयाने ही बंदी घातली.

मये गावातून खनिज मालाची वाहतूक करताना वायू प्रदूषण होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचे यावेळी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयात मान्य केले. तसेच खनिज मालाची वाहतूक करण्यासाठी मार्ग निश्‍चित करण्यात आला नसल्याची बाबही यावेळी न्यायालयासमोर ठेवण्यात आली. वाहतूक कोणत्या मार्गाने करावी हे माहीत नसेल, तर प्रदूषण होऊ नये यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा बसवणे शक्य नाही, ही बाबही न्यायालयाच्या नजरेस आणून देण्यात आल्याचे अर्जदार क्लॉड आल्वारिस यांनी सांगितले.