मयुरेश वस्त ः विसरू म्हणता विसरेना…

0
154

तबलावादक, प्रतिभासंपन्न संगीतकार मयूरेश वस्त याची स्मृती जागवणारा ‘मयुरेश स्मृती विशेष’ हा कार्यक्रम सम्राट क्लब, पर्वरी आणि मयूरेशच्या मित्रमंडळीतर्फे दि. २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ३ वा. पासून कला अकादमी येथे होणार आहे. त्यानिमित्त मयूरेशचा जवळून सहवास लाभलेल्या कलाकारांनी जागविलेल्या या आठवणी…

हरहुन्नरी प्रतिभाशाली युवा कलाकार मयुरेश वस्त १२ जुलै रोजी आम्हाला एकाएकी सोडून गेला. त्याचे जाणे एवढे धक्कादायक होते की, सारे संगीत क्षेत्र हळहळले. त्याच्या अंत्यदर्शनासाठी लोटलेला जनसमुदाय त्याची साक्ष देत होता. आमच्या गोवा संगीत महाविद्यालयात १९९५ मध्ये तो तबला शिकायला म्हणून आला. त्याच्यात जन्मताच कलागुण होते व त्यामुळे तो अल्पावधीत पुढे आला.
तबलावादनात तर त्याने प्रगती केलीच; परंतु इतर गोष्टींतही आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविला. उत्कृष्ट संगीतकार म्हणूनही तो चकमला. स्पर्धेतील नाटकांना उत्कृष्ट संगीत देण्यापासून गीतांना सुयोग्य व श्रवणीय चाली देण्यात त्याचा हातखंडा होता, कारण त्याला त्याची उत्तम जाण होती. त्याच्या रक्तातच ती बीजे होती. ‘हे देवी शारदे’ या आशा मणगुतकर यांच्या ‘शारद स्तवन’ला त्याने विलक्षण, भावस्पर्शी चाल दिली. गोवा संगीत महाविद्यालयाच्या अनेक कार्यक्रमांची सुरुवात याच गीताने होत असते. पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ही चाल. अर्थात त्याच्या अनेक चाली रसिकांच्या मनामनांत रुजल्या आहेत. उत्कृष्ट संगीतकार म्हणून त्याने अनेक पुरस्कारही पटकावले आहेत.
मयुरेशचा संगीत विद्यालयाचा विद्यार्थी ते साहाय्यक प्रोफेसर पर्यंतचा प्रवास मी जवळून पाहत आलोय. तो कधीच स्वस्थ बसायचा नाही. काही ना काही त्याच्या डोक्यात सतत कल्पना असायच्या. तांत्रिक गोष्टी, प्रशासकीय काम, संयोजन सगळ्यात तो समरसून भाग घ्यायचा. कला संस्कृती संचालनालयाच्या अनेक मोठमोठ्या कार्यक्रमात त्याचा सहभाग तांत्रिक सल्लगार, संगीतकार म्हणून असायचा. अलीकडे गोवा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी राष्ट्रपती येऊन गेले. त्यांच्या दोन्ही कार्यक्रमांसाठी स्वागतगीत बसविण्याची जबाबदारी अर्थातच मयुरेशवर होती.
या सर्व गोष्टींमध्ये अविश्रांत झोकून देऊन कार्यमग्न राहिल्याने त्याचे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. अलीकडे तो थकल्यासारखा जाणवायचा. सगळे सहकारी त्याला सांगायचो की, तू तब्येतीकडे लक्ष दे. त्याला ११ जुलै रोजी एकाएकी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले तेव्हा त्याला ज्या यातना होत होत्या आणि तो तडफडत होता ते पाहवत नव्हते आणि शेवटी डॉक्टरांनी तो वाचण्याची आशा नसल्याचे सांगितले होते ते खरे ठरले. अवघ्या ४२ वर्षांचे आयुष्य अशा प्रतिभाशाली कलाकाराला लाभावे यासारखे दुर्दैव नाही. मयूरेशने संगीताच्या कारकिर्दीत ताल उत्तम सांभाळला. मात्र, जीवनाच्या प्रवासात कुठेतरी ताल सांभाळण्याकडे तो अयशस्वी ठरला ही खेदाची गोष्ट आहे.
त्याच्या जाण्याने त्याची पत्नी, छोटा मुलगा व कुटुंबावर तर दु:खाचा डोंगरच कोसळला. या वयात पत्नीचे पतीछत्र आणि मुलाचे पितृछत्र हरवणे ही किती वेदनादायी गोष्ट आहे. राहून राहून वाटते मयुरेश तू हवा होतास. तू हवा होतात…!
– नितीन कोरगावकर

संगीत क्षेत्रात अविस्मरणीय ठसा

मयुरेश वस्त गोमंतकीय संगीत क्षेत्रात आपल्या सृजनशील संगीत रचनांनी स्वत:चा अविस्मरणीय ठसा उमटवून गेलेला एक सच्चा कलाकार. गोवा संगीत महाविद्यालय १९९८-९९ मध्ये प्रथमच कला अकादमीच्या महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत सहभागी झाले होेते. गुण्या-गोविंदाने या एकांकिकेची निवड केली होती. जयेंद्रनाथ हळदणकर यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली तालमी सुरू झाल्या होत्या. मयुरेश वस्तने सुरेख संगीताचा साज या एकांकिकेतील गीतांना चढविला होता. अर्थात सर्वांच्या अथक प्रयत्नाने या एकांकिकेला, दिग्दर्शन व संगीताचेही प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
मयुरेश आमचा एक चांगला मित्र तसाच एक गुणी कलाकार होता. गोवा विद्यापीठाच्या युवा महोत्सवात ‘एड्‌स’ विषयावरील पथनाट्य संगीत महाविद्यालयातर्फे बसविले होते. त्याच्या तालमी चालू असताना मयुरेशने अल्पवेळेत त्यातील गीतांना चाली दिल्या. त्याच्या चाली वरवरच्या नव्हत्या. तर उत्तम असायच्या. त्यातून त्याची प्रतिमा ठसठशीतपणे समोर यायची. आपल्या स्नेहशील स्वभावाने त्याने अनेक माणसे जोडली.
‘सख्या हो तुमची पावले बावनखणीत वळली’ ही घाशीराम कोतवाल नाटकासाठी त्याची संगीत रचना विलक्षण ठरली. पारंपरिक लावणीचा घाट तसाच ठेवून आपल्या सृजनशीलतेने ती रचना लक्षवेधी बनविली. अनेक मराठी, कोकणी समूहगीत रचना त्याने संगीतबद्ध करून लोकप्रिय केल्या. ‘सावल्यात जगताना’ हे असेच त्याचे संगीतबद्ध केलेले गीत आमचा मित्र गजानन मेस्त उत्तम गातो. संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या रचनांवरील ‘सोहिरोबा म्हणे’ या कार्यक्रसाठी त्याने संगीतबद्ध केलेल्या रचनांमधून पारंपरिक स्वररचनेबरोबर स्वत:च्या प्रतिभांचा ठसा उमटविला. राग संगीताची उत्तम जाण, पाश्‍चात्त्य संगीताची जाण, स्वत:चा तबला विषय आणि प्रतिभा याच्या जोरावर त्याने उत्तम संगीत रचना करून स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. त्याच्या रचनांमधून त्याची स्मृती अखंड राहील.
– रुपेश गवस
प्रिय मानसबंधू

दि. १२ जुलै रोजी माझ्या प्रिय मानस भावाला मी मुकलो. अजूनही विश्‍वास बसत नाही की, तो हसता चेहरा मी पुन्हा पाहू नाही शकणार. मयूरेशला मी १९९५ पासून ओळखायचो जेव्हा तो विद्यार्थी होता आणि मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, तो माझा सहकारीही होता.
माझ्या सितार वादनासंबंधी त्याच्या अनेक सकारात्मक सूचना मी स्वीकारल्या होत्या आणि तो मला मोठा भाऊ आणि माझी पत्नी डॉ. रुपश्री दासना आपली मोठी बहीण मानायचा. आमच्या बंगाली सांस्कृतिक कार्यक्रमांचा तो एक अविभाज्य घटक बनून राहिला होता आणि बंगाली कल्चरल असोसिएशनद्वारे आयोजित दुर्गा पूजन उत्सवात त्याचा दरवर्षी विशेष सहभागही असायचा. आमच्या सर्वांच्या स्मृतीत तो कायम राहणार तसेच त्याचा चेहरा आमच्या ह्रदयात सदैव असणार आहे. अश्रू वाळल्यानंतर आणि निरोप घेतल्यानंतर केवळ त्याच्या स्मृती जपणे आमच्या हातात आहे. यामुळेच प्रिय मयूरेश आमच्या ह्रदयात आणि मनात जिवंत राहील. त्याच्या कुटुंबियांसाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. पत्नी, मुलगा, आईवडील, भावंडे आणि त्याचे प्रियजन, या सर्वांसाठी केवळ त्याच्या स्मृतीच आधाराला आहेत. ईश्‍वराकडे एकच प्रार्थना की, मयूरेशच्या आत्म्याला शांती लाभो.
– मानब दास,
प्रभारी प्राचार्य, गोवा संगीत विद्यालय