मन की बातमध्ये मोदींकडून आरोग्य कर्मचार्‍यांचे कौतुक

0
31

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना देशातील कोरोना लसीकरणातील योगदानासाठी आरोग्य कर्मचार्‍यांचं भरभरून कौतुक केले. भारतातील लसीकरण कार्यक्रमाच्या यशातून भारताची आणि सर्वांच्या प्रयत्नांची शक्ती दिसते असे सांगून पंतप्रधानांनी आरोग्य कर्मचारी देशवासीयांच्या लसीकरणात कोणतीही उणीव ठेवणार नाही हे मला माहिती होेते, असे मत व्यक्त केले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मला माझ्या देशातील नागरिकांच्या क्षमतेची पूर्ण कल्पना आहे. आरोग्य कर्मचारी देशवासीयांच्या लसीकरणात कोणतीही उणीव ठेवणार नाही हे मला माहिती होते. येत्या रविवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची जयंती आहे. ‘मन की बात’च्या प्रत्येक श्रोत्यांच्या वतीने आणि माझ्यावतीने मी लोहपुरूषाला नमन करतो. एकतेचा संदेश देणार्‍या कोणत्या ना कोणत्या उपक्रमात सहभागी होणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही यावेळी मोदींनी नमूद केले. आज संयुक्त राष्ट्र दिवसदेखील आहे. या निमित्ताने भारताने जागतिक शांतता आणि जागतिक कल्याणासाठी दिलेलं योगदान आठवण्याची गरज आहे. भारताने कायमच जागतिक शांततेसाठी प्रयत्न केल्याचे मोदी म्हणाले. भारत योगा आणि पारंपरिक पद्धतींना अधिक लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आपल्या पृथ्वीला अधिक चांगले ठिकाण बनवण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका पार पाडेल असा विश्‍वास मोदींनी व्यक्त केला. यावेळी मोदींनी पोलीस दलात महिलांची संख्या वाढत असल्याचेही नमूद केले. नागरिकांनी स्वच्छतेची जबाबदारी स्वतःची समजली तरच याला यश येईल. त्यामुळे दिवाळीत आपल्या घरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मोदींनी केले.