मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्रीपदी शपथबद्ध

0
83
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना खट्टर

मनोहर लाल खट्टर यांनी काल हरियाणाचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ६० वर्षीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून घडलेले खट्टर हे संघटन कौशल्य व स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जातात. राज्यपाल कॅप्टन सिंग सोळंकी यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. खट्टर यांच्यासोबत त्यांच्या १० जणांच्या मंत्रिमंडळानेही शपथ घेतली.कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, चार भाजप राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. रालोआ सदस्य असलेले व हरियाणात भाजपविरोधात निवडणुकीत प्रचार केलेेले शिरोमणी अकाली दलाचे नेते पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश शिंग बादल हेही उपस्थित होते.
हरियाणात पूर्ण बहुमताने भाजप निवडून आला आहे.
रॉबर्ट वढेरांच्या जमीन  व्यवहारांची चौकशी करणार
हरियाणाला भ्रष्टाचारमुक्त शासन देण्यास भाजप कटीबद्ध असल्याचे सांगताना गत कॉंग्रेस सरकारच्या काळातील सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे नव्या सरकारने जाहीर केले आहे. या घोटाळ्यात सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वढेरांच्या जमीन व्यवहाराचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.
गरज पडल्यास माजी मुख्यमंत्री भुपिंदर सिंग हुडा यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, असेही नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेले अनिल वीज यांनी सांगितले. जमीन घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे देण्याचाही विचार होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.