मनोहर पर्रीकर यांचा आज प्रथम स्मृतीदिन

0
225

गोव्याचे लोकनेते बनण्याचे भाग्य लाभलेले दिवंगत मुख्यमंत्री व माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा आज प्रथम वर्ष स्मृतीदिन असून त्यानिमित्त त्यांना भाजपतर्फे सर्व मतदारसंघांत तसेच पणजी व मडगांव येथील पक्षाच्या कार्यालयात व मिरामार येथील त्यांच्या समाधीवर श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कुठेही श्रद्धांजलीसाठीचा मोठा कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले.

ज्या मनोहर पर्रीकर यांना त्यांच्या हयातीत आम्ही प्रेमाने ‘भाई’ असे म्हणत असून त्यांच्या प्रथम वर्ष स्मृतीदिनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करता येत नाही याची समस्त पक्षजनांना निश्‍चितच खंत असल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले. ‘भाई’ आमच्या हृदयात आहे व हृदयात सदैव राहणार असल्याचे ते म्हणाले. भाईनी केवळ विकासकामेच केलेली नाहीत तर वेळोवेळी आपल्या दूरदृष्टीने आम्हा पक्षजनांबरोबरच गोव्यातील जनतेला दर्शन घडवले असल्याचे ते म्हणाले. त्यांचाच वारसा पुढे नेण्याचे काम पक्षाने चालू ठेवले असल्याचे त्यानी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री पुष्पांजली वाहणार
राज्याचे मुख्यमंत्री व मनोहर पर्रीकर यांचे उत्तराधिकारी ठरलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज सकाळी मनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथील समाधी स्थळी जाऊन तेथे त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

पर्रीकरांवरील
पुस्तिकेचे प्रकाशन
पर्रीकर यांच्या प्रथम वर्ष स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला काल नवी दिल्ली येथे त्यांच्यावरील ‘अजिंक्य’ या कॉफी टेबल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तरुण विजय यांनी संपादित केलेल्या या पुस्तिकेचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गोव्याचे खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक हेही यावेळी हजर होते. यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी पर्रीकर यानी केंद्रीय संरक्षण मंत्रीपदी असताना केलेल्या कार्याचा गौरव केला. श्रीपाद नाईक यांनीही यावेळी पर्रीकर यांनी केलेल्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले.