मनपासह सहा पालिकांसाठी आज मतदान

0
212

>> जिल्हा पंचायत व ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मतदान

राज्यातील पणजी महानगरपालिका, सहा नगरपालिका, साखळी नगरपालिका प्रभाग ९ पोटनिवडणूक, नावेली जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायतीच्या १८ प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी २० मार्चला सकाळी ८ ते संध्याकाळी ५ यावेळेत घेण्यात येणार्‍या निवडणूक मतदानासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून निवडणुकीसाठी नियुक्त सरकारी कर्मचार्‍यांनी मतदान केंद्राचा ताबा काल घेतला आहे.

पणजी महानगरपालिका क्षेत्रातील १ मतदान केंद्र अतिसंवेदनशील आणि ४ मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक होणार्‍या इतर भागात एकही संवेदनशील केंद्र नाही. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस आणि निवडणूक आयोगाने नियुक्त गस्ती पथकांनी विविध भागात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.

निवडणूक रिंगणात एकूण ४२३ उमेदवार आहेत. पणजी महानगरपालिका क्षेत्रात ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान घेतले जाणार आहे. सहा नगरपालिका, साखळी पालिका प्रभाग पोटनिवडणूक, नावेली जि. पंचायत पोटनिवडणुकीसाठी मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेतले जाणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रभागांची एकूण संख्या १२४ एवढी असून १ लाख २२ हजार ९९२ मतदार आहेत. निवडणूक मतदानासाठी १३२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून एकूण १९० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १४८० कर्मचारी आहेत.

पणजी मनपा ३० प्रभाग ३२,०५१ मतदार आहेत. त्यात पुरुष १५१२५ आणि महिला १६९२६ मतदारांचा समावेश आहे. ९५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ६७ मतदान केंद्रे आहेत.
पेडणे, डिचोली, वाळपई, कुंकळ्ळी, काणकोण, कुडचडे-काकोडा या सहा नगरपालिका क्षेत्रात ६४ हजार ५१६ मतदार आहेत. नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघात १५,५६६ मतदार आहेत. तर २३ मतदान केंद्र आहेत.
साखळीच्या प्रभाग ९ मध्ये ५८४ मतदार आहेत. त्यात पुरुष २८२ आणि महिला ३०२ मतदार असून एका मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
विविध पंचायतीच्या १८ प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी १०,२७५ मतदार आहेत.

केपे पालिकेच्या नवीन आरक्षण
अधिसूचनेत दुरुस्तीचे आश्वासन

केपे पालिका निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नव्याने जारी केलेल्या आरक्षण अधिसूचनेत दुरुस्ती करण्याचे आश्‍वासन नगरपालिका संचालक गुरूदास पिळर्णकर यांनी दयेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाला काल दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण प्रश्‍नी निवाड्यानंतर नगरपालिका संचालनालयाने केपेसाठी जारी केलेले आरक्षण जास्त असल्याचा आरोप माजी नगरसेवक दयेश नाईक व इतरांनी केला.
दयेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पाटो पणजी येथील नगरपालिका संचालनालयाच्या बाहेर निदर्शने केली. तसेच एका शिष्टमंडळाने नगरपालिका संचालक पिळर्णकर यांची भेट घेऊन आरक्षणातील गोंधळ दूर करण्याची विनंती केली.

पाच नगरपालिकांची
निवडणूक प्रक्रिया रद्द

राज्याचे नवनियुक्त निवडणूक आयुक्त डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांनी शुक्रवारी एका आदेशाद्वारे मडगाव, मुरगांव, म्हापसा, सांगे व केपे या चार नगरपालिकांसाठीची निवडणूक प्रक्रिया एका आदेशाद्वारे रद्दबातल ठरवली. त्याचबरोबर ज्या उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली आहे ती निवडही रद्द ठरवण्यात आली आहे. त्याचबरोबर या पालिकांसाठीची आचारसंहिताही उठवण्यात आली आहे.

गेल्या १२ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने वरील पाच पालिकांच्या निवडणुकांसंबंधीचे प्रभाग आरक्षण व प्रभाग फेररचना तसेच निवडणूक प्रक्रिया रद्दबातल करण्याचा जो आदेश दिला होता तो लक्षात घेऊन काल राज्य निवडणूक आयुक्तांनी वरील आदेश काढला. ज्या उमेदवारांना ते बिनविरोध निवडून आले असल्याची प्रमाणपत्रे देण्यात आली होती ती प्रमाणपत्रेही रद्द ठरवण्यात आली आहेत.

मतदारांना आज भरपगारी सुट्टी
दरम्यान, आज २० मार्च रोजी ज्या नगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे त्या पालिका क्षेत्रातील मतदारांना आज गोवा सरकारने भरपगारी सुटी जाहीर केली आहे. आज मतदान होणार असलेल्या डिचोली, वाळपई, पेडणे, काणकोण, कुंकळ्ळी व कुडचडे-काकोडा या सहा पालिका तसेच पणजी महापालिका आणि साखळी पालिकेच्या प्रभाग क्रमांक ९, ग्रामपंचायतींच्या १८ प्रभागांतील पोटनिवडणूक व जिल्हा पंचायतींच्या नावेली या प्रभाग १६ मधील मतदारांनाही भरपगारी सुटी मिळेल.