इरादा काय?

0
220


अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस मुंबई पोलिसांच्या अब्रूचे आणि आजवरच्या प्रतिष्ठेचे धिंडवडे काढत चालला आहे. आजवर ‘सुपरकॉप’ म्हणून मिरवणार्‍या सचिन वाझेचा बुरखा तर यात एनआयएने पुरता फाडला आहेच, परंतु ह्या प्रकरणात त्याचे राजकीय पाठीराखे कोण हा लाखमोलाचा प्रश्नही उभा केला आहे. सचिन वाझे हा एकेकाळचा मोठा एनकाऊंटर स्पेशालिस्ट. तब्बल ६३ हत्या त्याच्या नावे नोंद आहेत. ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होऊनही त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले तेव्हा त्याचे पद निव्वळ सहायक पोलीस निरीक्षकाचे. परंतु त्याचा एकंदर थाटमाट, एकूण राहणीमान, पंचतारांकित हॉटेलातील वास्तव्य, आलिशान गाड्यांतील हिंडणे फिरणे ह्या सगळ्याचे बिंग त्याच्या गाडीत सापडलेल्या नोटा मोजण्याच्या यंत्राने फोडले आहे. आता प्रश्न एवढाच आहे की हे सगळे हे महाशय स्वतः करायचे की त्याच्याकडून हे करवून घेतले जात असे? करवून घेतले जात असेल तर ते कोणाकडून? वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांपुरतीच ती संशयाची सुई जात नाही, तर थेट सत्तेवर असलेल्या राजकारण्यांपर्यंतही जाते. त्यामुळे ह्या धमकी प्रकरणाचा मुख्य उद्देश खंडणीखोरी हा होता की त्याहून वेगळे इरादे होते हेही आता शोधावे लागणार आहे.
अंबानी यांना धमकी देण्यामागचा इरादा अजूनही पुरता स्पष्ट झालेला नाही. या सगळ्यामागचा उद्देश केवळ या प्रकरणाचा फायदा घेत स्वतःची छबी उजळवण्यापुरताच सीमित होता असे म्हणता येत नाही. तसे करायचे असते तर यापूर्वी कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामीसारखी प्रकाशझोतातील प्रकरणे वाझे यांनीच हाताळली होती. त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारची एवढी मेहेरबानी का होती ह्याचे गूढही आता उकलावे लागेल. ज्येष्ठ पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरोंनी नुकताच ‘इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये एक लेख लिहून एनकाऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकार्‍यांभोवती प्रसिद्धी माध्यमांकरवी उभ्या केल्या जाणार्‍या वलयाबाबत नापसंती व्यक्त केली आहे. अशाने पोलीस अधिकारी शेफारतात असा अनुभव त्यांनी सांगितला आहे. प्रदीप शर्मापासून सचिन वाझेपर्यंत मुंबई पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बाबतीत हेच घडले आहे हे खरे आहे. प्रसिद्धी माध्यमांनी डोक्यावर चढवून ठेवलेल्या अशा पोलीस अधिकार्‍यांची पुढील कारकीर्द तितकीच वादग्रस्त ठरत आली आहे. यामध्ये पोलीस दलातील परस्पर असूया आणि मत्सर यांचा जसा वाटा आहे, तसाच त्या संबंधित सुपरकॉपच्या काळ्या कृत्यांचाही आहे. एकमेकांची गुपिते फोडून मग ही मंडळी एकमेकांवर कुरघोडी करू लागतात आणि उघडी पडतात. वाझे प्रकरण सध्या उजेडात येण्यास कारणीभूत ठरलेली सर्व अंतर्गत माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्यातही पोलीस दलातीलच वाझे विरोधकांचा हात आहे हे उघड आहे, अन्यथा एवढी संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण माहिती थेट फडणविसांपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. फडणविसांच्या गौप्यस्फोटांमुळेच वाझे उघडे पडत गेले आणि महाराष्ट्र सरकारचेही नाक कापले गेले आहे.
पोलीस हा कायद्याचा रक्षक, परंतु तोच जेव्हा भक्षक होतो तेव्हा काय घडते याचे सचिन वाझे प्रकरण हे मासलेवाईक उदाहरण आहे. ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ अशा ब्रीदवाक्यानिशी संपूर्ण जगभरात अभिमानाने मिरवत आलेल्या मुंबई पोलीस दलाच्या वाट्याला आज जी काही नामुष्की आलेली आहे ती लाजीरवाणी आहे. काही दिवसांपूर्वी सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांवर टीकेची झोड उठली तेव्हा नुकतेच हकालपट्टी झालेले मुंबईचे पोलीस आयुक्त चवताळून उठले होते. मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा ठपका काय ठेवला जात होता, चौकशीसाठी पाचारण काय केले जात होते! आता गाडीत नोटा मोजण्याची यंत्रे घेऊन फिरणारे अधिकारी उघडे पडले तेव्हा कुठे राहिली आहे ती प्रतिष्ठा? प्रतिष्ठा धुळीला मिळवायला क्षण पुरेसा असतो. ती मिळवायला मात्र युगे लागतात!