मनःशांती उपनिषदातून टाळू या निंदा.. घृणा.. कंटाळा

0
251
  •  प्रा. रमेश सप्रे

 

आपल्याला कधी कधी सार्‍या वस्तूतील ईशत्वाची जाणीव होते पण बर्‍याच वेळी तो ‘भास’ असतो. त्याचा भाव उत्पन्न होऊन त्याचं अखंड भान राहून, तो बोध जर अंतःकरणात बिंबला तर मनःशांती दूर नाही. जीवनमुक्ती अशक्य नाही. यासाठी हवी निरंतर उपासना.. आराधना.. साधना!

 

 

सध्या अक्षरशः जगभर कोरोना विषाणूचं जे थैमान आणि हाहाकार सुरू आहे ते पाहिलं तर गंमतीनं म्हणावंसं वाटतं या आसुरी विषाणूचा (व्हायरसचा) समूळ संहार करण्यासाठी भगवान विष्णूंना त्यासाठी नवा अवतार घ्यावा लागेल. आज ना उद्या वैज्ञानिक त्यावर लस नि प्रभावी औषध शोधून काढतीलही. पण तोपर्यंत जे उपाय केले नि सुचवले जाताहेत त्यात एक लक्षवेधी उपाय आहे- मन शांत, प्रसन्न, आशावादी ठेवण्यासाठी योगाभ्यास नि ध्यानसाधना. संपूर्ण देश कुलूपबंद आहे म्हणून या विषयीचं मार्गदर्शन समाजमाध्यमं अन् त्याहीपेक्षा दूरचित्रवाणीच्या वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमातून दिलं जातंय.

मनःशांतीसाठी बाह्य वातावरण धूर, वर्दळ, वाहनांची रहदारी नसल्याने अनुकूल बनतंय. याची जाणीव शहरातील एरवीच्या प्रदूषित वातावरणात राहणारे लोकही घेताहेत. असं असलं तरी मनःशांतीसाठी आवश्यक ती उपासना अंतरंगीची आहे. सूक्ष्म आहे. अशा उपासनेसाठी बाह्य साधनं, उपकरणं यांची गरज नसते. सारं कसं आत, मनात, अंतरंगात!

अशा अभ्यासासाठी आवश्यक ते मार्गदर्शन प्राचीन काळी ऋषीमुनींनी केलं. आरोग्य – तनाचं, मनाचं, जनाचं, जीवनाचं – चांगलं कसं राखता येईल यासंबंधीची चर्चा नि दिग्दर्शन अनेक उपनिषदातून तसंच उपनिषदांचे उपनिषद असलेल्या भगवद्गीतेत केलं गेलंय. मग तो ग्रंथ योगवासिष्ठ, गीता, उपनिषदं यांच्यासारखा ज्ञानप्रधान असो किंवा नारदभक्तिसूत्रांसारखा भक्तिभाव वाढवणारा असो किंवा पतंजलीच्या योगसूत्रांसारखा यम-नियम-आसनं यामार्गानं ध्यान, समाधीपर्यंत नेणारा असो. चरक, सुश्रुत, नागार्जुन यांच्यासारख्या त्या काळातील विद्वान वैद्यांनी लिहिलेल्या आरोग्यविषयक विविध ग्रंथातून स्वस्थ शरीर- शांत मन- स्थिर बुद्धी नि शुद्ध चित्त यांच्या प्राप्तीसाठी स्वानुभवातून केलेलं मार्गदर्शन असो.

मनःशांती ही पूर्ण आरोग्याची, संपूर्ण स्वास्थ्याची गुरुकिल्ली आहे. या संदर्भात ईशावास्य उपनिषदात सुलभ मार्गदर्शन आहे.

 

* यस्तु सर्वाणि भूतानि एव अनुपश्यति |

सर्वभूतेषु च आत्मानं ततो न विजुगुप्सते ॥

 

या श्‍लोकाचा भावार्थ ङ्गार सुरेख आहे. जो सर्व सजीव- निर्जीवांना, चराचरांना आपल्यात पाहतो (आत्मनि एव अनुपश्यति) आणि स्वतःला सर्व पशुपक्षी, वनस्पती एवढंच नव्हे तर दगड, लाकूड, नद्या- सागर, सृष्टीतील सर्व वस्तू यांच्यामध्ये पाहतो म्हणजे अनुभवतो तो कशाचीही घृणा, निंदा करीत नाहीच, पण त्याला कशाचाही कंटाळा येत नाही, कशाचंही वावडं (ऍलर्जी) असत नाही. तो सदैव शांत, समाधानी, आनंदी असतो. असं का घडतं ते पाहू या.

एक मार्मिक प्रसंग पाहू या.. निवृत्ती- ज्ञानदेव- सोपान- मुक्ताबाई ही चार दिव्य भावंडं होती. पण संन्याशाची पोरं म्हणून समाजातील धर्ममार्तंडांनी, कर्मठ विद्वानांनी त्यांना समाजातून बहिष्कृत केलं. पावलोपावली अपमान, हाल हे त्यांच्या वाट्याला आलं. ज्या पद्धतीनं आईवडिलांनी स्वतःचं जीवन संपवून प्रायश्‍चित्त घेतलं त्याचा विचार केला तर शास्त्राच्या नावाखाली केलेला तो अमानुषपणा होता. ज्या शांतपणे कुणालाही शिव्याशाप न देता, कुणाबद्दलही मनात कटुता न ठेवता या बालमंडळींनी सार्‍या अन्यायाला तोंड दिलं. हे पाहिलं की एक तर पूर्वजन्मीच्या संस्कारांवर आपला विश्‍वास बसतो अन् दुसरं म्हणजे या सार्‍या बालमंडळींच्या विशाल अंतःकरणावर नि धैर्यशील स्वभावावर आपला विश्‍वास बसतो.

एका अर्थानं ही मंडळीही सर्वांना आपल्यात नि आपल्याला सर्वांत अनुभवत होती. तरीही त्यांची वयंच अशी होती की केव्हातरी मनाचा तोल जाणारच. एकदा घडलंही तसंच. ज्ञानोबा बाहेरून आला तो जळङ्गळतच, सर्वांच्या अपमानास्पद वागणुकीचा त्याला मनस्वी राग आला होता. धाडकन झोपडीचं दार बंद करून आत धुमसत राहिला. छोट्या मुक्ताईला आपल्या भावाची मनःस्थिती कळली नि तिनं अभंग रचून ज्ञानोबाला विचार करायला लावून दार उघडून बाहेर यायला लावलं.

‘ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा’ असं धृपद असलेले हे प्रसिद्ध अभंग आहेत. मुक्ताई म्हणते, ‘राग, घृणा अशा नकारात्मक भावना, खरं तर प्रतिक्रिया, मागे सारा. जगात जर आग लागलीय म्हणून संतांनी ती पाणी टाकून विझवली पाहिजे. सारं भूतजात, सारे प्राणिमात्र आपल्याच देहाचे अवयव नाहीत का? आपली जीभ आपल्याच दाताखाली येऊन चावली गेली तर आपण काय स्वतःचे दात पाडतो की जीभ कापून टाकतो?’ अशा उपदेशामुळे विचार करून शांत झालेले ज्ञानोबा बाहेर येतात.

ज्ञानदेवांना सारे आपल्यात नि आपण सर्वांच्यात असतो या वस्तुस्थितीचा अनुभव आला, साक्षात्कार झाला. सारा क्रोध सरला नि सर्वांकडे बघण्याची एक विशाल, उदार दृष्टी प्राप्त झाली. तशी ती त्यांना पूर्वीही होतीच. पण कधी कधी मानसिक संतुलन बिघडलं की एखादी गुरुतुल्य व्यक्ती आपल्याला सावरते.

सर्व संतांच्या जीवनाचा हा भाग ज्याला गीतेत ‘आत्मौपम्य’ असा समर्पक शब्द भगवंतानं वापरलाय तो आपल्यातही असतो. उपासनेतून मनन- ध्यान- चिंतनातून तो प्रत्यक्ष जीवनात साकारतो म्हणूनच संतमंडळींना पृथ्वीवरचे देव (भूदेव संतांसि सदा लवावे) असं म्हणतात.

एकदा गोठ्यातील गाईवासरांसाठी गवत आणायला गेलेल्या छोट्या कबीराला तो विळ्यानं गवत कापणार एवढ्यात मान हलवून अश्रू ढाळत गवताची पाती म्हणायला लागली, ‘कापू नको, कापू नको!’ प्रत्यक्ष गवत वार्‍यानं हलत होतं आणि त्याच्यावर जमलेले दवबिंदू गळून पडत होते. कबीर त्या सार्‍या दृश्याशी एवढा एकरूप झाला की तो मान हलवत, टाळ्या वाजवत, त्या डोलणार्‍या गवताच्या तालात भजन म्हणू लागला. संध्याकाळी अजून कबीर घरी का परतला नाही म्हणून शोधायला आलेल्या आईवडिलांच्या डोळ्यातून ते अपूर्व दृश्य पाहून आसवं ओघळू लागली. कबीराचा हा ‘आत्मौपम्या’चा भाव पुढे वाढतच गेला. विणकर असलेल्या कबीराला शेले विणण्यासाठी आलेल्या सुतात, ते सूत ज्यावर विणलं जात होतं त्या मागात, त्याच्या खटाक् खटाक् आवाजात, उभे आडवे धागे सांधून तयार होणार्‍या वस्त्रात सदासर्वदासर्वत्र रामच दिसत होता. तो स्वतःही त्या सार्‍या प्रक्रियेत स्वतःला पाहत होता म्हणून अत्यंत हलाखीची परिस्थिती असूनही अतीव आनंदात होता. तो स्वतःबद्दल म्हणायचा- ‘राम हमारा जप करे | हम बैठे आराम ॥ तर इतर मंडळी म्हणायची-

‘कबिराचे विणतो शेले | कौसल्येचा राम ॥ म्हणजे सदैव रामच.

जनाबाईचा कृष्ण तिची सारी कामं करायचा. दळणं- कांडणं- इतकंच काय पण शेण्याथापणंसुद्धा कृष्ण करायचा. अर्थात् विठूच्या रुपात म्हणून ज्यावेळी ती म्हणते- ‘मी खाते विठ्ठला, मी पिते विठ्ठला|’… अशा अनेक कृती मी विठ्ठलाबरोबर, विठूच्या माध्यमातून करते. शेवटी जनी म्हणते ‘मी व्यवहारिते विठ्ठला’ म्हणजे सारे व्यवहार विठू मानून करते. हेही सर्वत्र भगवंताचं अस्तित्व, भगवंताचा निवास (ईशावास्यं इदं सर्वम्) आहे याचा अनुभव जगणे.

‘राम’ शब्दाचा अर्थ आहे जो सर्वत्र रमतो नि सर्वांना रमवतो तो राम. ती ‘रम्य’ शक्ती राम! ‘कृष्ण’ शब्दाचा अर्थ- जो सर्वांना आकर्षून घेतो अन् सर्वांकडे आकर्षिला जातो तो कृष्ण. म्हणजेच ती ‘आकर्षण शक्ती’ तीच कृष्ण. राम-कृष्ण, साधुसंत, ऋषीमुनी या त्या शक्तीच्याच मूर्तिमंत जिवंत व्यक्ती.

अशी व्यक्ती कुणाचाही द्वेष करत नाही. कोणावरही रागवत नाही, कुणाचीही निंदा, घृणा (तिरस्कार) करत नाही म्हणजेच कुणाचाही कंटाळा करत नाही. कशालाही कंटाळत नाही. (न विजुगुप्सते). हल्ली मोठी माणसंच काय पण छोटी मुलंही लगेच बोअर होतात.

एक प्रसंग. एका तीन वर्षाच्या शिशूला आई ओढून शाळेत नेत होती. तो शिशू ङ्गरपटत जाताना ओरडून, रडून आईला सांगत होता, ‘ममा, आय् गेट् बोअर्ड इन स्कूल’. मनात विचार आला की तो ‘नर्सरी’तला (शिशुवाटिकेतला, बालोद्यानातला) शिशू होता की ‘कर्सरी’तला म्हणजे यातनाघरातला?’  बालवाडीतल्या त्या छोट्याला बालवाडीतली खेळणी, खेळ, गाणी, एकत्र डबा खाणं’ काहीही आवडत नव्हतं. इतकंच काय पण ‘बालवाडीतली बाई अन् तिथं नेणारी (मनाविरुद्ध) आई’ही आवडत नव्हती.

बर्‍याच ठिकाणी के.जी. (किंडर गार्टन म्हणजे बालोद्यान) तेथील कोरड्या, कठोर, यांत्रिक शिस्तीच्या वातावरणामुळे केजी (केज म्हणजे पिंजरा) बनतात, ज्यात कोवळी मुलं कृत्रिम हावभाव करत बालगीतं, बडबडगीतं (नर्सरी र्‍हाइम्स) म्हणणार्‍या पिंजर्‍यात डांबलेल्या पोपटांसारखी असतात.

खरं तर हीच वेळ नि जीवनातला हाच टप्पा मुलांसाठी सर्वत्र असलेल्या देवत्वाचा नि दिव्यत्वाचा संस्कार घडवण्यासाठी सुयोग्य असतात. सुपीक (ङ्गर्टाइल्) असतात. वही- पुस्तक- पाटी- पेन्सिल, पेन- ब्रश एवढंच नाही तर त्यांचे गणवेश, वर्ग, त्यातील बाकं, कपाटं इ. सार्‍या गोष्टींमध्ये देवी सरस्वती, गणपती, मारुती यांचा वास आहे हे पटवून दिलं तर जिवंत बाई, वर्गातील सवंगडी याच्यातला देवही नक्की जाणवेल. मग जमीनीवर पडलेल्या देवाच्या चित्राला जसं आपण तुडवत नाही तसंच पायदळी असलेल्या (पायाची घाण शोषून घेणार्‍या) पायपुसण्यातील देवही आपल्याला दिसेल. आपण त्याच्याविषयीसुद्धा कृतज्ञ राहू.

एकूण हा सारा विषय आनंदी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. हे जमणं खूप अवघड वाटलं तरी अशक्य मात्र निश्चित नाही. तसं वातावरण नि सर्व विश्‍वाला व्यापून असलेल्या परमेश्‍वराचं (विश्‍वेश्‍वराचं) अस्तित्व मुलांना सतत जाणवून द्यायला हवं नि वडील मंडळींनी निरंतर जगून दाखवायला हवं. मगच अनुभव येईल- ‘आनंदी आनंद गडे | जिकडे तिकडे चोहीकडे !’

सर्वत्र व्यापून असलेलं चैतन्य, सौंदर्य, ऐश्‍वर्य यांच्याविषयी प्रथम भाव उत्पन्न व्हायला हवा, नंतर त्याचं भान टिकायला हवं, नंतर कायमचा बोध उत्पन्न व्हायला हवा. भाव म्हणजे भक्तियोग, भान म्हणजे कर्मयोग तर बोध म्हणजे ज्ञानयोग. या तिन्ही योगांच्या त्रिवेणी संगमावर ङ्गुलतं जीवनाचं तीर्थक्षेत्र – प्रयाग!

ईशावास्य उपनिषदातील पुढच्याच श्‍लोकात असं जीवन जगणार्‍या व्यक्तीचं एक प्रत्ययकारी, मनोहर शब्दचित्र रंगवलंय.

 

* यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद् विजानतः |

तत्र को मोहः कः शोक एकत्वम् अनुपश्यतः ॥

 

ज्याला सर्व भूतजात, प्राणिमात्र स्वतःमध्ये असल्यासारखे (आत्मस्वरूप) वाटतात त्याला मोह, शोक, स्वार्थ, दुःख कुठून असणार? म्हणजे आपल्यात सर्व नि सर्वांत आपण पाहणार्‍या (अनुभवणार्‍या) व्यक्तीला दुःख, द्वेष, घृणा, निंदा, कंटाळा अशांचा त्रास कसा होणार? तो सदैव आनंदाचे डोहीच असणार. अखंड आनंदात डुंबत राहणार.

ज्ञानोबा माऊली पसायदानात म्हणते, ‘भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे’ हे केवळ बाह्य सृष्टीबद्दल किंवा अवतीभवती पसरलेल्या समष्टी (समाजा)बद्दल म्हणत नाही तर स्वतःचा जिवंत अनुभव सांगते – ‘हे विश्‍वचि माझे घर | ऐसी मती जयाची स्थिर | किंबहुना चराचर आपणचि जाहला ॥ पण अशामुळेच ज्ञानदेव प्रतिज्ञापूर्वक म्हणू शकले – ‘आनंदे भरीन तिन्ही लोक!’ तसं पाहिलं तर ही गोष्ट जमणं आजही अशक्य नाही. आपल्याला कधी कधी सार्‍या वस्तूतील ईशत्वाची जाणीव होते पण बर्‍याच वेळी तो ‘भास’ असतो. त्याचा भाव उत्पन्न होऊन त्याचं अखंड भान राहून, तो बोध जर अंतःकरणात बिंबला तर मनःशांती दूर नाही. जीवनमुक्ती अशक्य नाही. यासाठी हवी निरंतर उपासना.. आराधना.. साधना!