मतविभागणीचा फायदा निर्णायक ठरणार?

0
26
  • – महेश सावंत

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत दीडशे जागा जिंकून विक्रम करण्याचं ध्येय भाजपनं समोर ठेवलं आहे. यापूर्वी गुजरातमध्ये भाजपला फक्त कॉंग्रेस हाच एकमेव पर्याय होता. आता ‘आम आदमी पक्ष’ तसेच ‘एमआयएम’नेही इथल्या रणात उडी घेतली आहे. त्यामुळे भाजपला मतविभागणीचा फायदा मिळणार आहे. या पार्श्‍वभूमीवर गुजरातमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणांचं रण तापत आहे.

गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांमध्ये पार पडत आहेत. त्यापैकी पहिला टप्पा १ डिसेंबरला तर दुसरा टप्पा ५ डिसेंबरला आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या वेळी या राज्यात कॉंग्रेसने भाजपच्या नाकी नऊ आणले होते. भाजपला ९९ वर रोखण्यात आलं होतं, तर कॉंग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. आता अंधेरी विधानसभा मतदारसंघात ‘नोटा’ला मिळालेल्या मतांची चर्चा होत असली तरी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्येही ‘नोटा’ला तिसर्‍या क्रमांकाची मतं मिळाली होती. १८२ पैकी ११५ जागांवर ही स्थिती होती. याचा अर्थ भाजप नको आणि कॉंग्रेसही नको, असं म्हणणारा एक मोठा वर्ग तिथे होता. आता अशा घटकांना ‘आप’चा पर्याय स्वीकारण्याची संधी मिळत आहे. ‘आप’ची संभावना भाजपची ‘बी टीम’ अशी केली जात असली, तरी गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ज्या पद्धतीने प्रचाराची राळ उठवली आहे, ते पाहिलं तर कॉंग्रेसचं स्थान ‘आप’ हिसकावून घेईल, असं कुणालाही वाटणं स्वाभाविक आहे. परंतु तसं होण्याची शक्यता नाही. विविध वाहिन्यांनी केलेल्या मतचाचणी कलातून गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल, यात कुठलीही शंका नाही. ‘आप’ने कितीही आव आणला तरी त्याच्या जागांची संख्या तिसर्‍या क्रमांकाची असेल. इथे ‘आप’, ‘एमआयएम’ आणि कॉंग्रेस मतविभाजन करणार असल्याचा ङ्गायदा भाजपला आपसूकच होणार आहे. फा
‘आम आदमी पक्षा’ने दिल्लीची निवडणूक पहिल्यांदा जिंकली तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं. आता त्यांच्या हातात दोन राज्ये आहेत. गुजरातमध्ये मुस्लिम समाजाची ताकद कधीच विशेष नव्हती. ‘आप’ने मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. कॉंग्रेसनेही असे प्रयत्न केले नाहीत. असदुद्दीन ओवैसी यांनी इथे ‘एमआयएम’चे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मुस्लिमांची दहा टक्के मते कॉंग्रेस, एमआयएम आणि ‘आप’मध्ये विभागली जातील. गुजरात निवडणुकीत मुस्लिम मतदार कोणताही मोठा खेळ खेळण्याच्या स्थितीत नाहीत. इथे दलित मतदार मोठ्या संख्येने कॉंग्रेसला पाठिंबा देत आहेत. कॉंग्रेसचे दलित नेते मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. अशा स्थितीत दलित मतदारांमध्ये ङ्गूट पडण्याची शक्यता कमी आहे. भाजपने कॉंग्रेसच्या आदिवासी ‘व्होट बँके’ला मोठा धक्का दिला आहे. विशेषत: दक्षिण गुजरातमधून कॉंग्रेसला पाठिंबा देणारा आदिवासी मतदारांचा मोठा वर्ग यावेळी भाजपला मतदान करू शकतो. भाजपने द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवल्याचाही थोडाङ्गार परिणाम होईल. दुसरीकडे केजरीवालही आदिवासीबहुल भागात पूर्ण जोर लावत आहेत. म्हणजेच कॉंग्रेसची काही आदिवासी मतं भाजप हिसकावून घेईल. अशा स्थितीत कॉंग्रेसचा कमी होणारा मतांचा टक्का ‘आप’ऐवजी भाजपच्याच पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

ओबीसी समाज वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेला दिसतो. हार्दिक पटेल भाजपमध्ये सामील झाल्याने आणि भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री असल्याने पटेल समाज भाजपला पाठिंबा देईल. गेल्या निवडणुकीत इथे भाजपची मतांची टक्केवारी ४९ पेक्षा जास्त होती आणि दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या कॉंग्रेसची मतांची टक्केवारी ४१ पेक्षा जास्त होती. जवळपास दोन टक्के मते ‘नोटा’ला होती. गुजरातमध्ये गेल्या २७ वर्षांपासून भाजपची सत्ता असल्याने ‘अँटी इन्कम्बन्सी’ तत्त्वाआधारे भाजपचा जनाधार कमी होत चालला आहे. २०१७ च्या निवडणुकीत इथे कॉंग्रेसला २०१२ च्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या जागांच्या तुलनेत १६ जागा जास्त मिळाल्या होत्या. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं राज्य. त्यांना ते हातातून निसटून जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे तर तरुणांना रोजगार देणारं राज्य हे चित्र निवडणुकीच्या तोंडावर उभं करण्यासाठी ‘वेदांता-ङ्गॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’सह अन्य प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. त्यांनी ‘बल्क ड्रग’ प्रकल्प गुजरातमध्ये आणला आहे. मोदी हे ‘गुजराती प्राईड’ आहेत. गुजरातच्या अभिमानाची ताकद कमी होणं मध्यमवर्गीयांच्या एका गटाला आवडणार नाही; पण मध्यमवर्ग महागाईच्या चक्रात पिळून निघत आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. इंधन, वीज, महागडं शिक्षण-आरोग्य यातून त्याला दिलासा हवा आहे. त्यांना ‘आप’ने मोठी आश्‍वासनं दिली आहेत. त्यांना मोङ्गत शिक्षण, आरोग्य, वीज या आश्‍वासनांची भुरळ पडली आहे.

सद्यस्थितीत राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी असल्याने कॉंग्रेसने गुजरात निवडणूक जणू वार्‍यावर सोडली आहे. अर्थात ही यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल एक दिवस काढून गुजरातमध्ये प्रचारात सहभागी होणार आहेत. कॉंग्रेसची आदिवासी, मुस्लिम, दलितांची मतं कमी झाल्यास कोणाच्या झोळीत जातील हा प्रश्‍न आहे. भाजप आणि ‘आप’मध्ये ती विभागली जातील. या निवडणुकीत भाजपने १६० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. ते साध्य करण्यासाठी भाजप सौराष्ट्रात पूर्ण ताकद लावत आहे. पक्षासाठी सौराष्ट्र हे आव्हान कायम ठरलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने इथे भाजपचा पराभव केला होता. यावेळी भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. ‘आम आदमी पक्षा’च्या उपस्थितीचा ङ्गायदा घेत सौराष्ट्रमधल्या बहुतांश जागा जिंकण्याचा प्रयत्न भाजप करत असून त्यासाठी शहा यांनी स्थानिक नेत्यांशी दीर्घ चर्चा करून खास रणनीती तयार केली आहे. गुजरातच्या राजकारणात सौराष्ट्राला सत्तेची गुरुकिल्ली म्हटलं जातं. ज्यानं सौराष्ट्र जिंकला, त्यानं गुजरात जिंकला असं म्हणतात. सौराष्ट्रात विधानसभेच्या ४८ जागा आहेत. राज्यात एका विभागात सर्वाधिक जागा याच भागात आहेत. यासोबत कच्छचा समावेश केला तर विधानसभेच्या एकूण जागा ५४ होतात. यासंदर्भात गुजरातच्या राजकारणात सौराष्ट्र-कच्छचं महत्त्व अधिकच वाढतं. ‘आम आदमी पक्ष’ही या भागात जोरदार प्रयत्न करत आहे. भाजपसाठी ते ङ्गायदेशीर मानलं जात आहे.
२०१७ मध्ये भाजपला पाटीदार आंदोलनामुळे झटका बसला. या भागात कॉंग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला होता. पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल त्यावेळी कॉंग्रेसमध्ये होता. सौराष्ट्रात कॉंग्रेसला ४५ टक्के मतं आणि सर्वाधिक ३० जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी भाजपच्या जागांची संख्या २३ झाली. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने इथे ३५ जागा जिंकल्या होत्या. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत शहरी भागात भाजपचं तर ग्रामीण भागात कॉंग्रेसचं वर्चस्व होतं. या धक्क्यामुळे भाजप हादरला. पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपला मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे गेल्या निवडणुकीत झालेलं नुकसान भरून काढण्याचा आत्मविश्‍वास भाजपला मिळाला. तत्पूर्वी सौराष्ट्रमधल्या गुजरात कॉंग्रेसचे प्रमुख नेते इंद्रनील राजगुरू यांनी ‘आम आदमी पक्षा’त प्रवेश केला. परिणामी, विरोधी मतांचे विभाजन झाल्याने भाजपचा मोठा ङ्गायदा होईल.

विधानसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी अमित शहा यांनी सौराष्ट्रमध्ये कार्यरत असलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये सौराष्ट्रमधल्या जवळपास सर्वच जागा काबीज करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. कॉंग्रेस आणि ‘आप’ या दोन्ही पक्षांना राजकीय विरोधक म्हणून गांभीर्यानं घेतलं पाहिजे, याचा कानमंत्र देऊन त्यांनी नेत्यांना कामाला लावलं. पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कठोर परिश्रम करण्यास आणि ङ्गाजील आत्मविश्‍वास टाळण्यास सांगितलं आहे. भाजप सामाजिक समीकरणं तयार करण्यावर भर देत आहे. हार्दिक पटेल भाजपमध्ये गेल्यापासून इथल्या पाटीदार समाजाला सांभाळणं सोपं झालं आहे. कदाचित म्हणूनच गुजरात विधानसभेच्या राजकीय आखाड्यात भाजप इतिहास घडवण्याचा दावा करत आहे. त्याचवेळी कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष यांपैकी विरोधी पक्ष कोण हे ठरवण्यासाठी जणू स्पर्धा सुरू आहे. केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांच्यासह सर्व बडे नेते सातत्याने गुजरात दौर्‍यावर असून मोठमोठी आश्‍वासनं देत आहेत. भाजपची २७ वर्षांची सत्ता असतानाही ३५ ते ४२ टक्के मते मिळवणारी कॉंग्रेस गुजरातमध्ये स्वत:ला नैसर्गिक पर्याय मानत आहे. कॉंग्रेसने आपले सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हाती निवडणूक व्यवस्थापनाची धुरा सोपवली आहे. गेहलोत यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिलेले आणि राजस्थानचे ज्येष्ठ नेते रघू शर्मा हे गुजरातचे राज्य प्रभारी आहेत. ते कॉंग्रेसला किती सावरतात, हे पाहायचं.