मडगाव उपनिबंधकांना घेरावामुळे महिला कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अटक

0
157

मडगाव येथील उपनिबंधकांच्या कार्यालयात जन्म नोंदणी, विवाह नोंदणीचे दाखले मिळण्यास तीन ते चार महिने लागतात व सर्वसामान्यांना त्यासाठी वारंवार हेलपाटे पडत असल्याच्या निषेधार्थ प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपनिबंधक दुमिंगो मार्टिन यांना काल घेराव घालून जाब विचारला. यावेळी प्रचंड गोंधळ झाल्यामुळे पोलिसांना पाचारण केल्यानंतर पोलिसांनी सर्वांना अटक केली. नंतर जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली.

यावेळी दाखले मिळविण्यासाठी शेंकडो महिला व पुरुषांची रांग लागली होती. अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे दाखले देण्यास विलंब होत असल्याचे दुमिंगो मार्टिन यांनी निदर्शकांना सांगितले. त्यावेळी दाखले देण्याची मागणी करून महिला कार्यकर्त्यांनी मार्टिन यांना घेराव घालून तेथेच थांबले. शेवटी दुपारी एक वाजता फातोर्डा पोलिसांना मार्टिन यांनी पाचारण करून सर्वांना अटक करायला लावली.

फातोर्डा पोलिसांनी प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह पूजा मयेकर, रेश्मा, अब्दुल रझाक सैयद, प्रिया राठोड, प्रतिभा बोरकर, रेजिना डायस, ग्रेगोरिना गामा यांना अटक केली व त्यानंतर जामिनावर सुटका केली. त्यांना अटक केल्याचे समजताच आमदार रेजिनाल्ड लोरेंस यांनी फातोर्डा पोलीस स्टेशनवर जावून त्यांची सुटका केली.