मडगावात नंबर प्लेटचे काम थांबवण्याचा आदेश

0
159

ठेकेदाराकडून नियमबाह्य नंबर प्लेट; जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा

उच्च सुरक्षा नंबर प्लेट चुकीच्या बनविण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्यावरून दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी काल वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांची तातडीने बैठक घेत या प्लेट बसवण्याचे काम बंद ठेवण्याचा आदेश दिला. ठेकेदाराकडून नंबर प्लेटबाबत गाडीच्या क्रमांकाची जाडी, अक्षराची जुळणी चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे. तसेच ह्या प्लेट स्क्रूने बसविल्या जातात. त्या वाहतूक नियमात बसत नसल्याने बेकायदा ठरतात. त्या तशाच वाहनांना लावल्यास वाहतूक खात्याकडून चालकांना दंड पडू शकतो अशी माहिती वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी नंबर प्लेट बनविण्याचे काम विनाविलंब बंद करण्याचा आदेश दिला. त्या अगोदर जिल्हधिकार्‍यानी मामलेदारांना वाहतूक खात्यात पाठवून माहिती मिळविली व त्यानंतर बैठक घेतली.

ठेकेदारास अटक करा : सरदेसाई
वाहनांच्या उच्च सुरक्षा नंबर प्लेट तयार करून देण्याचा ठेका दिलेल्या उत्तर प्रदेशामधील ठेकेदाराने ग्राहकांची फसवाफसवी चालविली आहे. याप्रकरणी ठेकेदाराला अटक करण्याची मागणी करत नंबर प्लेटचे काम बंद करावे असा इशारा आमदार विजय सरदेसाई यांनी वाहतूक खात्याला दिला.

लोकांच्या असंख्य तक्रारी आल्यानंतर आमदार सरदेसाई यांनी आर्ले येथील वाहतूक कार्यालयात भेट देत लोकांना होणार्‍या त्रासाची पहाणी केली. त्यावेळी असंख्य लोक सकाळपासून रांगेत उभे होते. त्यात महिला, अपंग व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. यावेळी उपस्थितांनी सरदेसाई यांच्याकडे फॉर्म मिळविण्यासाठी रांग, पैसे भरण्यासाठी रांग व त्यानंतर क्रमांक मिळविण्यासाठी रांग त्यासाठी तीन दिवस रांगेत उभे राहावे लागते अशी तक्रार केली.

आमदार सरदेसाई यांनी वाहतूक उपसंचालक आर्लेकर यांना बोलावून चर्चा केली. नंबर प्लेट या चुकीच्या असल्याच्या तक्रारी लोकांनी केल्या होत्या. नियमानुसार ठेकेदार नंबर प्लेट तयार करीत नसल्यामुळे त्या बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर उपसंचालक खोलकर व जिल्हाधिकार्‍यांशी बोलणी केली.

येथे लोकांसाठी सुविधा उपलब्ध केल्याशिवाय हे काम सुरू करू नये. ठेकेदाराने येथे उद्यापासून १० खिडक्या उघडाव्यात, येथे मंडप घालावा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, महिला, अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था करावी मगच काम सुरू करावे. तसेच न केल्यास या मतदारसंघातील लोक येथे येऊन काम बंद पाडतील असा इशाराही सरदेसाई यांनी दिला.