मडकई नवदुर्गा मंदिर समिती बरखास्त करा

0
146

>> ग्रामस्थांची जाहीर सभेत मागणी

 

मडकई येथील देवी नवदुर्गा मंदिर समितीने मंदिराची सेवा खंडित केल्यामुळे उपस्थित झालेल्या गंभीर वातावरणातून मार्ग काढण्यासाठी सरकारने देवस्थान समिती बरखास्त करून त्वरित प्रशासक नेमावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. १५ ऑगस्टपर्यंत प्रशासकाची नेमणूक न झाल्यास दि. २१ ऑगस्ट रोजी मंदिराच्या मंडपात ग्रामस्थ १ दिवस उपोषण करणार असून त्यानंतर पणजी येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
हिंदू देवस्थानाना लावलेला पोर्तुगीज कायदा त्वरित रद्द करून मूर्ती संरक्षणाचा कायदा करण्यासाठी मुख्यमंत्री, राज्यपाल, सभापती व सर्व आमदारांना निवेदन देण्याचा ठराव काल झालेल्या सभेत घेण्यात आला. देवी नवदुर्गा प्रतिष्ठानतर्फे काल ग्रामपंचायत सभागृहात मंदिरातील उत्सव सेवा पूर्ववत करण्याच्या उद्देशाने आयोजन केले होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेंद्र पणजीकर, सचिव हेमंत काळे, मडकईचे सरपंच मनोज नाईक, पंच सदस्य भारत नाईक, ज्येष्ठ नागरिक व सुमारे ३०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित
होते.
देवस्थान समितीने दि. २८ मार्चपासून देवीचे सर्व धार्मिक विधी बंद ठेवले आहेत. मात्र, ग्रामस्थ, कुळावी व सेवेकरी सर्व धार्मिक विधी शांततापूर्वक पार पाडतात. मात्र, समितीने उत्सवमूर्ती व देवीचे अलंकार कुलूपबंद ठेवले असल्याने उत्सवावेळी ग्रामस्थांना अडचण निर्माण होते. त्यासाठी प्रशासक नेमून उत्सव शांततापूर्वक करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. सरकारने जर हा विषय गांभीर्याने न घेतल्यास त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होईल, असे शैलेंद्र पणजीकर यांनी
सांगितले.
पोर्तुगीज गेल्यानंतर पोर्तुगीज कायदे रद्द करण्याची गरज होती. परंतु राजकारणी लोक हा कायदा रद्द करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. येणार्‍या विधानसभा अधिवेशनात सदर प्रश्‍न चर्चेसाठी घेण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, सभापती व सर्व आमदारांना निवेदने देण्याचा ठराव हात उंचावून घेण्यात आला असल्याचे पणजीकर यांनी
सांगितले.
दि. १५ ऑगस्टपर्यंत प्रशासकाची नेमणूक न केल्यास दि. २१ रोजी मंदिरात उपोषण करण्यात येईल. तसेच आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्यासाठी तारीख त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार असल्याचे पणजीकर यांनी
सांगितले.